सिंधुदुर्गः आद्य मराठी पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे भव्य स्मारक त्यांची जन्मभूमी असलेल्या सिंधुदुर्गात व्हावं ही महाराष्ट्रातील पत्रकारांची जुनी मागणी आहे.मराठी पत्रकार परिषद आणि सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ त्यासाठी गेली वीस वर्षे पाठपुरावा करतो आहे.या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आणि विद्यमान सरकारनं बाळशास्त्री यांच्या स्मारकासाठी साडेपाच कोटी रूपयांची तरतूद बजेटमध्ये 2017 मध्ये केली.तरतूद तर झाली पण गेली वर्षे दीड वर्षे पाठपुरावा करूनही ही रक्कम अद्याप मिळालेली नसल्यानं स्मारकाचं काम सुरू होऊ शकलं नाही.त्याबद्दल पत्रकारांमध्ये मोठी नाराजीची भावना आहे.काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जेव्हा सिंधुदुर्गात आले तेव्हा परिषदेचे कार्याध्यक्ष गजानन नाईक आणि त्यांच्या सहकार्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन आपल्या संतप्त भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि स्मारकाचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याची विनंती त्यांच्याकडं केली.मुख्यमंत्र्यांनी तातडीने हा निधी उपलब्ध करून दिला जाईल असे आश्वासन दिले आहे.अपेक्षा अशी आहे की,कायद्याच्या अंमलबजावणीप्रमाणे स्मारकासाठी तरी सरकार राज्यातील पत्रकारांना प्रतिक्षेत ठेवणार नाही..-बाळशास्त्री जांभेकर यांनी 1832 मध्ये दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र सुरू केले आणि मराठी वृत्तपत्रसृष्टीचा पाया घातला..या घटनेला आज 186 वर्षे उलटून गेली आहेत.मात्र सरकारला त्याचं स्मारक उभारून त्यांना अभिवादन करण्याची सुबुध्दी सुचत नाही.त्यामुळं बाळशास्त्री जांभेकर यांना न्याय कधी मिळणार असा प्रश्न राज्यातील शेकडो पत्रकारांना सतावतो आहे.–