हिंदी पत्रकारितेचे भिष्माचार्य
बाबुराव पराडकर आणि खास मराठी करंटेपणा
पराड.मालवण तालुक्यातलं छोटसं खेडं.कोकणातील इतर खेडयासारखंच.निसर्गाचा वरदहस्त लाभलेलं पण सरकारी अनास्थेचा बळी ठरलेलं.विकास काय असतो याचा पत्ता गावाला नाही.गाव कुठं आहे हे देखील जगाला माहिती नाही.कणकवलीपासून पश्चिमेला पंधरा-वीस किलो मिटरवर आडवळणावर असलेलं हे गाव बाबुराव पराडकर याचं नसतं तर या गावाची ओळखही जगाला व्हायचं काही कारण नव्हतं. 450च्या आसपास लोकसंख्या असलेल्या पराडला ग्रामपंचायत नाही. पेडूरला ग्रुप ग्रामपंचाय आहे.शाळाही चौथीपर्यंतच.शेती शिवाय उत्पन्नाचं कोणतंच साधन नसलेल्या या गावातील तरूण रोजगाराच्या शोधात गाव सोडतात.हा शिरस्ता अनेक वषांपासून सुरू आहे.नक्की माहिती नाही पण पराडकरांच्या कुटुंबांनी देखील रोजगारासाठीच पराड सोडलेलं असावं.खरं म्हणजे पराडकर कुटुंबं मोठं जमिनदार.आजही पराडगावच्या पश्चिमेला नजर पोहोचेल तिथंपर्यंतची जमिन पराडकरांचीच.तरीही त्यांच्या पैकी आज गावात कोणीच नाही.पराडकरांची काही घरं तिथं आहेत.पण ती बंद आहेत.पराडकरांच्या या प्रॉपर्टीचे रक्षण करण्याचं काम प्रवीण वसंत सामंत करतात.ते सांगतात,”पराडकरांची काही कुटुंबं वाशीत आहेत.काही अन्यत्र आहेत.देवीच्या दर्शनासाठी पराडकर अधुन-मधुन गावी येत असतात”.पराडकरांचा आज गावाशी तसा नित्याचा संबंध नसला तरी पराड गावातील ग्रामस्थ मात्र पराडकरांबद्दल नक्कीच कृतज्ञ आहेत.पराडकर कुटुंबं आमच्या गावाची ओळख आहे असं ते मानतात.”हिंदी पत्रकारितेचे भिष्माचार्य अशी ओळख लाभलेले बाबुराव पराडकर याचं गावात भव्य स्मारक झालं पाहिजे” अशी ग्रामस्थांची प्रामाणिक तळमळ आहे.गावातील लवू सहदेव पाटकर,बासुदेव देवूजी जबडे हुसेन शेख,प्रवीण सामंत आदि नागरिक भेटले.त्यांनी सांगितलं “1994 पासून आम्ही बाबुरावांच्या स्मारकासाठी प्रयत्न करीत आहोत.तत्कालिन मुख्यमंत्र्यांनाही आम्ही निवेदनं दिली होती.मात्र सरकार दाद देत नाही”.मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर याच्या स्मारकासाठी सरकारनं आता साडेचार कोटी रूपये मंजूर केले आहेत.आपल्या अलौकीक बुध्दीमत्तेनं आणि अफाट कतृत्वानं हिंदी पत्रकारितेत आपल्या नावाचा अमिट ठसा उमटविणार्या बाबुराव पराडकराचंही भव्य स्मारक त्यांच्या पराड या गावी झालं पाहिजे असा आग्रह सारेच ग्रामस्थ करताना दिसले.कोकणात अशी असंख्या गावं आहेत की,त्या गावांनी देशाला मोठी माणसं दिली.मात्र बाहेर अफाट कर्तृत्व गाजविलेली ही माणसं आपल्याच गावात अनोळखी असल्याचा प्रत्यय अनेकदा येतो.या पार्श्वभूमीवर पराडमधील ग्रामस्थाचं बाबुरावांच्या प्रती असलेलं आकर्षण आणि आदर निश्चितपणे कौतुकास्पद आहे.मात्र सरकारकडून त्यांना फारसा प्रतिसाद मिळत नाही हे दुर्दैव्य आहे.उत्तर भारतात बाबुरावांचे अनक ठिकाणी स्मारकं आहेत.पुतळे आहेत.मात्र त्यांच्या मुळ गावी काहीच होत नाही याची खंत गावकर्यांमध्ये दिसली.
कोण आहेत हे बाबुराव पराडकर?
मराठी पत्रकारितेचे जनक बाळशास्त्री जांभेकर देवगड तालुक्यातील पोंभुर्ले गावचे.हिंदी पत्रकारितेचे भिष्माचार्य अशी ओळख असलेले बाबुराव पराडकर हे मालवण तालुक्यातील पराड गावचे.सिंधुदुर्गातील या दोन्ही सपुत्रांनी अनुक्रमे मराठी आणि हिंदी पत्रकारितेचा पाया घातला आणि पत्रकारिता समृध्द करण्यासाठी आपलं आयुष्य वेचलं.बाबुरावांची मातृभूमी पराड असली तरी त्यांची जन्मभूमी आणि कर्मभूमी उत्तर प्रदेशातील काशी होती.पंडित विष्णुशास्त्री पराडकर आणि अन्नपुर्णाबाई यांच्या पोटी बाबुरावांचा जन्म 16 नोव्हेंबर 1883 रोजी काशी येथेच झाला.विष्णुशास्त्री केव्हा काशीला गेले याची माहिती मिळत नसली तरी ते काशीत स्थायीक झाले होते.सदाशिव हे बाबुरावाचं खरं नाव.मात्र वडिल कौतुकानं बाबुराव म्हणत.पुढं बाबुराव हेच नाव रूढ झालं.विष्णुशास्त्री हे संस्कृतचे पंडित.त्यामुळं वेद आणि वेदांगांचे अध्ययन त्यांनी केले.मात्र वडिलांच्या सातत्यानं बदल्या होत असल्यानं त्यांचं शिक्षणही वेगवेगळ्या ठिकाणी झालं.छपराला येथे वडिलांची नियुक्ती झाल्यानंतर पराडकरांना रोमन अक्षरांचा परिचय घडला.मुंगेर आणि नंतर बनारसमध्ये त्यांनी अभ्यासाला सुरूवात केली.1900 मध्ये त्यांनी भागलपूर येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केली.मात्र याच काळात वडिलांचे निधन झाल्यानं त्यांना इंटरमिजिएट मध्येच शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.1903 मध्ये ते विवाहबध्द झाले.सुप्रसिध्द बंगाली पत्रकार सखाराम गेणेश देऊसकर ( हे देखील कोकणातीलच) हे बाबुरावांचे मामा.वडिलांच छत्र हरपल्यानं बाबुराव 1906 च्या सुमारास कोलकत्याला मामांकडं गेले.तेथे त्यानी केसरीच्या वाचनाची सुरूवात केली.या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच ओढग्रस्त झाली होती.शिकवण्याकरून ते संसाराचा गाढा कसा तरी हाकत असतं.पोस्टात नोकरी मिळविण्यासाठीही त्यांचा खटाटोप सुरू होता.मात्र याच काळात मामांच्या मदतीने त्यांना हिंदी बंगवासी या दैनिकांत नोकरी मिळाली.तेथेच त्यांच्या पत्रकारितेचा पाया घातला गेला. .हिंदी बंगवासीतील ही उमेदवारी त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारी ठरली.कारण तेथे त्यांचा अंबिकाप्रसाद वाजपेयी,बद्रीनारायण चौधरी,प्रेमधन यांच्या सारख्या साहित्यिकांशी आणि रासबिहारी घोष तसेच अरविंद घोष यांच्या सारख्या क्रांतीकारकांशी संपर्क आला.हिंदी बंगवासीमध्ये त्यांना 25 रूपये महिना वेतन मिळत असे.नोकरी करीत असतानाच त्यांनी इम्पीरियल लायब्ररीत बसून आपला व्यासंग वाढविला.नारायण मिश्र,पंडित दुर्गाप्रसाद मिश्र यांच्या सारख्या विद्वनांच्या सान्निध्यामुळे त्यांच्या व्यासंगाला धार आली. हिंदी बंगवासीमध्ये त्यांनी आपल्या कामाची चमक दाखविली.मात्र हिंदी बंगवासी हे कट्टर कॉग्रेस विरोधी पत्र होते.बाबुरावांवर टिळकांचा प्रभाव असल्याने त्यांनी सहा महिन्यातच हिंदी बंगवासी सोडले आणि हितवार्ता या साप्ताहिकात ते संपादक म्हणून काम करू लागले.याच काळात बंगाल नॅशनल कॉलेजमध्ये त्यांचे हिंदी आणि मराठीचे अध्ययनही सुरू होते.हितमित्रनंतर त्यांनी भारतमित्रमध्ये संयुक्त संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली.हा 1911चा काळ होता.पत्रकार म्हणून बाबूराव दमदारपणे एकएक पाऊल पुढे टाकत असतानाच 1912 मध्ये त्यांच्या पत्नीचे निधन झाले.त्यांच्यावर झालेला तो एक मोठा आघात होता.
भारतमित्र साप्ताहिकाला आकार देण्यासाठी ते सर्वांगसुंदर आणि लोकप्रिय करण्यासाठी बाबुरावांनी अपार परिश्रम केले.हितवार्तात असतानाच राजकीय विषयांवर ंगंभीर प्रकारचे टीका लेखन करून त्यांनी हिंदी पत्रकारितेत एक नवी परंपरा सुरू केली होती.त्याचाही उपयोग भारतमित्र लोकप्रिय कऱण्यासाठी झाला.पत्रकारिता आणि राजकाऱण हे दोन्ही क्षेत्रं परस्पर पुरक आहेत.तो काळ तर असा होती की,बहुतेक राजकीय नेत्यांनी स्वतःची पत्रं सुरू करून आपल्या मतांचा प्रचार करण्यास सुरूवात केलेली होती.बाबुरावही राजकारणापासून फार काळ अलिप्त राहू शकले नाहीत.देशप्रेम आणि राष्टसेवेचे बाळकडू त्यांना घरातूनच मिळालेले असल्याने क्रातीकारकांच्या गटात सहभागी होताना त्यांना कोणतीच अडचण आली नाही.हातात गीता आणि पिस्तुल घेऊन दीक्षा घेतलेल्या बाबुरावांचे वृत्तपत्रातून अहिंसेचे समर्थन करीत करीतच क्रांतीकारकाचे कार्यही सुरू होते.मात्र त्यांच्या कारवायांचा सुगावा पोलिसांना लागलाच.1916 च्या सुमारास डेप्युटी पोलिस सुपरिटेंण्डन वसंतकुमार यांच्या खुनाचा आळ त्यांच्यावर आला आणि त्यांना अटक केली गेली.प्रत्यक्ष पुरावा पोलिसांना मिळाला नसला तरी तब्बल अडिच वर्षे त्यांना नजरकैदेत घालवावी लागली.1920 मध्ये नजरकैदेतून मुक्त होताच ते परत वारानसीला आले.याच सुमारास जगाची सफऱ करून परतलेल्या बाबू शिवप्रसाद गुप्तांनी लंडन टाइम्सच्या धर्तीवर हिंदीत दैनिक प्रकाशित करण्याची योजना आखली होती.डॉ.भगवानदास गुप्ता,श्रीप्रकाश आणि बाबूराव यांनी प्रस्तावित दैनिकाचे आज हे नामकरण केले.आजच्या संपादकपदाची जबाबदारी स्वाभाविकपणे बाबुरावांवरच सोपविण्यात आली.1920च्या सुमारास बाबुराव पुण्याला येऊन लोकमान्य टिळकांना भेटल्याचे संदर्भ सापडतात.या भेटीत त्यांनी आजबद्दल चर्चा केली आणि टिळकांचे मार्गदर्शन घेतले.5 सप्टेंबर 1920 रोजी आज चा पहिला अंक प्रकाशित झाला.1924 ते 1955 असा तब्बल 31 वर्षे बाबुरावांचा आजशी संबंध राहिला.हिंदीतील अग्रगण्य पत्र म्हणून आजला उच्च स्थान प्राप्त करून देण्याचे आणि आजला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे श्रेय बाबुरावांनाच जाते.आजच्या माध्यमातून त्यांनी केलेले हिंदी भाषेच्या विकासाचे आणि राष्ट्रजागृतीचे कार्य चिरंतन स्वरूपाचे आहे.आज हिंदी भाषेत प्रचलित असलेले राष्टपति,नोकरशाही,वायुमण्डल,कारवाई यासारख्या शब्दाबरोबरच मुद्रस्थिती सारखे अर्थशास्त्रातले शेकडो शब्द रूढ करण्याचे श्रेयही निर्विवादपणे बाबुरावांकडेच जाते.आज मधील असंख्य अग्रलेख वाचनीय आणि संग्राहय ठरले आहेत.स्पष्ट भूमिका,रोखठोक मांडणी,आणि राष्ट्रप्रेमानं ओतप्रोत भरलेले बाबुरावांचे अग्रलेख वाचकांचा ठाव घेत.विश्वशांतीका अग्रदुत यासाऱखे अनेक अग्रलेख आजही वाचकांच्या स्मरणात आहेत.पत्रकार आणि साहित्यिक असलेल्या बाबुरावांना 1925 मध्ये वृदांवन येथे भरलेल्या हिंदी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषविण्याची संधी मिळाली.ते देखील उचितच होते.सिमला येथे 1931 मध्ये भरलेल्या साहित्य संमेलनाचे देखील ते अध्यक्ष झाले..या संमेलनात साहित्य वाचस्पती ही उपाधी देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.काशीच्या तत्कालिन संयुक्त प्रांताच्या चौथ्या समेलनाचे स्वागताध्यक्षपद ( 9 फेब्रुवारी 1947) तेहतीसाव्या मराठी साहित्या संमेलनाच्या वृत्तपत्र वाडःमय परिषदेचे अध्यक्षपद ( 15 मे 1950) आणि राष्ट्रभाषा प्रचार समितीने वर्धा यांनी पाचव्या साहित्या समेंलनात दिलेला महात्मा गांधी पुरस्कार ( 19 नोव्हेंबर 1950 ) त्यांच्याकडं चालत आला.रणभेरी,संसार ही पत्रेही बाबुरावांच्या लेखणीनं गाजलेली आहेत.
बाबुरावांच्या नावावर विविध ग्रंथ नोंदविले गेलेले आहेत.बंगालीतील दशेरा कथा या देऊसकरांच्या प्रसिध्द ग्रंथाचा त्यांनी देश की बात या मथळ्याखाली हिंदीत अनुवाद केलेला आहे.स्वातंत्र्य चळवळीत सक्रीय सहभाग घेणार्या आणि लोकमान्यांचे शिष्यत्व पत्करणार्या बाबुरावांनी गीतेवर टीका लिहावी आणि 1924 मध्ये पुस्तक रूपात अनुवादासह प्रसिध्द करावी हे ही स्वाभाविकच होते.या पुस्तकातल्या आतप्रायी,अश्वत्थ यासारख्या शब्दांवरच्या टीका बाबुरावांच्या व्यासंगाची आणि मार्मिकतेची साक्ष पटविणार्या आहेत.कॉग्रेसच्या कार्याला पाठबळ दण्यासाठी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्याही अनेक आवृत्या प्रकाशित झाल्या आङेत.त्यांचे हे सारे लेखन हिंदी लेखकांच्या दृष्टीने प्रेरणादायक ठरले आहे. हिंदी साहित्य आणि हिंदी पत्रकारितेमध्ये त्यानी जे योगदान दिले आहे त्याची नोंद घेत भारत सरकारने त्यांच्यावर एक पोस्टाचे तिकीटही काढले आहे. बाबुराव पराडकर केवळ बोलके सुधारक नव्हते तर कर्ते सुधारक होते.21 जून 1926 रोजी त्यांनी 41 लोकांच्या उपस्थितीत ग्वाल्हेरच्या श्रीमती सरस्वतीबाई या बालविधवेशी तिसरा विवाह केला होता.ही घटना आजच्या घडीला फार महत्वाची वाटत नसली तरी तेव्हाचय रूढी-परंपरा झुगारून बाबुरावांनी केलेले लग्न नक्कीच चर्चेचा आणि टिकेचा विषय ठरले असणार यात शंका नाही,बाबुराव पराडकरांचे निधन 12 जानेवारी 1955 रोजी झाले.
स्वातंत्र्य संग्रामातील क्रांतिकारक नेते, हिंदी भाषा आणि साहित्याचे महारथी,आणि संपुर्ण जगताला आधुनिक पत्रकारितेचा नवा आदर्श घालून देणारे वृतस्थ पत्रकर म्हणून बाबुरावांचे कार्य अविस्मरणीय आहे.एका मराठी माणसाने उत्तर भारतात जाऊन साहित्य,राजकारण आणि पत्रकारितेत ते मोलाचे योगदान दिले त्याला तोड नाही.त्यामुळेच उत्तर प्रदेशात बाबुराव पराडकरांचे नाव साहित्यिक,राजकारणी आदराने घेतात.पत्रकारांच्या दृष्टीने तर मराठी पत्रकारितेत टिळकांना जे स्थान आहे तसेच हिंदी पत्रकारितेत बाबुरावांच्या नावाचा दबदबा आहे.त्यामुळेच युपीत अनेक ठिकाणी बाबुरावांची स्मारकं दिसतात.मात्र त्यांचं मुळ आणि कुळ ज्या कोकणातल्या पराडचं आहे तेथे मात्र बाबुरावाचं स्मारक नसावं हे मराठी माणसाच्या करंटेपणाचं लक्षण समजावं लागेल.युपी सरकार पराडमध्ये स्मारक कऱण्यासाठी काही प्रयत्न करीत असल्याचे कळते.तसे झालेच तर महाराष्ट्र शासनाला लगावलेली ती सणसणीत चपराक ठरेल.आपल्या माणसाचं मोठेपण आपल्याला दिसत नाही हा मराठी माणसाचा दोष आहे.त्यामुळं कोकणात आभाळा एवढ्या उंचीची माणसं झाली पण तिथं कुणाचीच स्मारकं उभारावीत असं सरकारला वाटत नाही.ओरोसला आता बाळशास्त्रींचे स्मारक होत आङे.सिंधुदुर्ग जिल्हा मराठी पत्रकार संघ आणि त्याचे अध्यक्ष गजानन नाईक यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळं ते शक्य होतंय.महाराष्ट्र सरकारनं युपी सरकारानं पराडला येऊन काही कऱण्याअगोदर पराडमध्ये बाबुरावांचं स्मारक उभारावं अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे. त्यासाठीच मराठी पत्रकार परिषदेच्या एका शिष्टमंडळाने पराडला भेट देऊन माहिती घेतली.त्यानंतर एस.एम.देशमुख,किरण नाईक,समीर देशपांडे मिलिंद अष्टीवकर तसेच गजानन नाईक आणि त्यांच्या सहकार्यांसह शिष्टमंडळाने जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्राम प्रभुगावकर तसेच माजी अध्यक्ष गोटया सावंत आदिंची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली.त्यांनीही पराडकरांच्या स्मारकासाठी अनुकुलता दर्शविली असून जिल्हा परिषदेच्या ताब्यातील काही जागा स्मारकासाठी देऊ केलेली आहे.बॉल आता महाराष्ट्र सरकारच्या कोर्टात आहे.एक मराठी माणूस काशीला जाऊन प्रत्येक मराठी माणसाला अभिमान वाटावे असे कार्य करतो त्या माणसांचं स्मारक त्यांच्या गावी झालं तर तो त्यांच्या कार्याचा यथार्थ गौरव ठरणार आहे.मराठी पत्रकार परिषद यासाठी महाराष्ट्र सरकार आणि युपी सरकारकडं पाठपुरावा कऱणार आहेच.माहिती आणि जनसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉक्टर गणेश मुळे यांनी बाबुराव पराडकरांवर एक सुंदर पुस्तक लिहिले आहे.त्यामुळं बाबुरावांच्या कार्याची ओळख मराठी पत्रकारांना होण्यास मदत झाली आहे.
एस.एम.देशमुख
आधार
विश्वकोश खंड 9 आणि मराठी विश्वचरित्र कोश खं
सर, पराडकरांचे कार्यकर्तृत्व नव्याने प्रकाशात आणल्याबद्दल आपले मनापासून आभार! आपल्या लढवय्या स्वभावाप्रमाणे हा प्रश्नही आपण मार्गी लावाल, याचा विश्वास आहे.
आलोकजी,धन्यवाद.मध्यंतरी मी पराडला मुद्दाम जाऊन आलो.त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारशी पत्रव्यवहार केला.मला अशी माहिती मिळाली आहे की,काशी पत्रकार संघ तेथे स्मारक बांधणार आहे.खरं तर हे काम महाराष्ट्र सरकारनं करावं असं माझं मत होतं पण ते शक्य होईल असं वाटत नाही.बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मारकासाठी परिषद आणि सिधुदुर्ग जिल्हा पत्रकार संघानं पाठपुरावा केल्यानंतर साडेचार कोटी रूपये मंजूर झाले आहेत.पुढील महिन्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन होईल.पराडकरांच्या स्मारकासाठीही प्रयत्न करतो आहोत.