बाबा भांड यांची नियुक्ती नियमबाह्य़

0
1397

शिफारस प्रस्तावांत नावाचा उल्लेखही नाही

 नेमाडे, डहाके, मोरे, ढेरे यांना डावलून निवड

साक्षरता अभियानात भ्रष्टाचाराचे आरोप असलेले लेखक-प्रकाशक बाबा भांड यांची राज्य साहित्य-संस्कृती मंडळाच्या अध्यक्षपदी झालेली निवड नियमबाह्य़ आहे. या पदासाठी साहित्य-संस्कृती मंडळाकडून पाठविण्यात आलेल्या प्रस्तावांत त्यांचे नावही नव्हते. एवढेच नव्हे, तर डॉ. भालचंद्र नेमाडे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. अरुणा ढेरे आणि वसंत आबाजी डहाके या ज्येष्ठ साहित्यिकांची नावे मागे सारून भांड यांच्याकडे ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली, असे आता स्पष्ट झाले आहे.
साहित्य संस्कृती मंडळाच्या अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी कोणतेही ठोस निकष वा नियम नाहीत. मात्र त्या निवडीची एक प्रक्रिया ठरलेली आहे. त्यानुसार साहित्य-संस्कृती मंडळाकडून प्रस्ताव मागविले जातात. त्याशिवाय या क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती वा प्रतिष्ठित संस्था यांच्याकडूनही नावांच्या शिफारसी येतात. हे सर्व प्रस्ताव अंतिम निर्णयासाठी मुख्यमंत्र्यांकडे सादर केले जातात आणि मुख्यमंत्री त्यावर निर्णय घेतात, असे सांस्कृतिक कार्यविभागातील वरिष्ठ सूत्रांकडून सांगण्यात आले.
या प्रक्रियेनुसार, ६ फेब्रुवारी २०१५ रोजी राज्य साहित्य व संस्कृती मंडळाने एका प्रस्तावाद्वारे १४ नावे सुचविली होती. त्यात प्रा. चंद्रकुमार नलगे, प्रा. पुरुषोत्तम नागपुरे, भारत सासणे, डॉ. रवींद्र शोभणे, डॉ. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, डॉ. गो. मा. पवार, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, प्रा. वसंत आबाजी डहाके, डॉ. रमेश आवलगावकर, डॉ. आनंद पाटील, प्रा. रतनलाल सोनाग्रा, रावसाहेब खंदारे, डॉ. अक्षयकुमार काळे यांचा समावेश होता. मात्र हा प्रस्ताव पुढे पाठविण्यातच आला नाही. त्यानंतर २२ जून २०१५ रोजी मंडळाने अध्यक्षपदासाठी चार नावे सुचविली. त्यात वसंत आबाजी डहाके व डॉ. सदानंद मोरे ही नावे कायम होती, तर डॉ. अरुणा ढेरे व भालचंद्र नेमाडे या नावांची त्यात भर टाकण्यात आली. हा प्रस्ताव शासनाला सादर करण्यात आला होता, असे माहिती अधिकार कायद्याखाली अभय कोलारकर यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात सांगण्यात आले. मंडळाने सुचविलेली नावे पूर्णपणे वगळून भांड यांचे नाव पुढे आले आणि तेच निश्चित केले गेले, असे त्या कागदपत्रांवरून स्पष्ट झाले आहे.
या दोन्ही प्रस्तावांत भांड यांचा उल्लेखही नसताना, ते नाव पुढे कोणी आणले, शासनाच्या योजनेत गैरव्यवहार केल्याचा आरोप असतानाही त्यांच्या नावाचा अध्यक्षपदासाठी कसा विचार झाला, त्यासाठी कोणती प्रक्रिया राबविण्यात आली, असे प्रश्न आता साहित्य वर्तुळात फेर धरून उभे आहेत. या संदर्भात सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्याशी संपर्क साधला असता ते प्रतिक्रियेसाठी उपलब्ध झाले नाहीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here