बळीराजा संतापला,संपावर गेला

0
1358

जळगाव जिल्हयातील सात गावातील 200 शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी संपावर गेल्याची बातमी झी-24 तासनं दिलीय.साऱ्यांना डोळे विस्फारायला लावणारी ही बातमी आहे,असंघटीत,देशभर विखुरलेला शेतकरी संपावर जाऊ शकत नाही हे मस्तवाल राजकारण्यांना माहित असतं पण जळगावात एक ठिणगी पडलीय,सरकारचं धोरण असंच राहिलं तर त्याचा वडवाणळ व्हायला वेळ लागणार नाही.तेव्हा सत्ताधाऱ्यांोन डोळे उघडा असंच म्हणावं लागेल.

मात्र जळगावमधील शेतकऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं असलं तरी  हा काही शेतकऱ्यांचा पहिलाच संप नाही.यापुर्वी जवळपास 80 वर्षांपूर्वी रायगड जिल्हयातील ( अलिबाग तालुका ) चरी येथील सहा गावातील शेतक़ऱ्यांनी संप पुकारला होता याची आठवण होते.त्याकाळी जमिनदार आपल्या जमिनी खंडानं शेतकऱ्यांना कसायला देत.मात्र वर्षभर शेतात राब,राब राबूनही शेतकऱ्यांच्या हाती काहीच राहायचं नाही कारण सारा माल जमिनदारच आोरबडून घ्यायचा.उत्पन्नाच्या जवळपास 75 टक्के हिस्सा जमिनदाराला मिळायचा.या जाचाला चरी परिसरातील शेतकरी कंटाळले आणि कोणाही जमिनदारीच जमिन वाहायची नाही,संपावर जायचं असा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आणि 27 ऑक्टोबर 1933 रोजी चरी परिसरातील शेतकऱ्यांनी संप पुकारला.हा संप थोडा थोडका नाही तब्बल 6 वर्षे चालला.संपानं शेतकऱ्याला उध्दवस्थ केलं खरं शेतकऱ्यानं माघार घेतली नाही.अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर,मोरारजी देसाई यांच्या मध्यस्थीनं या संपात सन्माननिय तोडगा काढला गेला.शेतक़ऱ्यांच्या या संपाचं नेतृत्व केलं होतं. शेतकऱ्यांचा सर्वाधिक काळ चाललेला जगातील एकमेव संप अशी चरीच्या संपाची इतिहासात नोंद केली गेलीय.शेतकरी नेते नारायण नागू पाटील यांनी.चरीच्या संपाचं नेतृत्व केलं होतं  चरीच्या संपाला 75 वर्षे झाली तेव्हा दत्ता पाटील यांनी चरीत शेतकऱ्यांचा मोठा मेळावा घेऊन तिथं एक स्मारकही उभं केलं आहे.या संपाचं उदाहरण इ थॅं एवढ्यासाठीच दिलंय की,शेतकरी एकदा जिद्दीला पेटला की मग तो मागं पुढं पहात नाही.जळगावच्या शेतकऱ्याचा सरकारने जास्त अंत न बघता त्यांच्या मागण्या तातडीने पूर्ण केल्या पाहिजेत

झी-24तासनं दिलेली बातमी खालील प्रमाणं

जळगाव : जळगाव जिल्ह्यातले हजारो शेतकरी संपावर गेलेत. हो तुम्ही अगदी बरोबर ऐकलंत.. आपले अन्नदाते शेतकरी संपावर गेलेत. समाजातले अनेक नोकरदार संपावर गेलेले तुम्ही पाहीलं अनुभवलं असेल… पण, शेतकरी संपावर गेल्याचं कधी ऐकलंय… नाही ना…? पण हा प्रकार घडलाय. आपला अन्नदाता शेतकरी संपावर गेला तर काय होईल याचा विचारही करवत नाही ना…?

दुष्काळ पडतो, गारपीट होते, अवकाळी पाऊस पडतो… कधी नको इतका पाऊस पडतो.. प्रत्येक वेळी बळी जातो तो बळीराजा.. मग कागदी घोडे नाचतात… पॅकेजेसचं गाजर दाखवलं जातं… पंचनामे होतात.. शेतकऱ्याला मात्र यातून काहीच मिळत नाही. अस्मानी संकटापेक्षाही सुलतानी संकट भयानक असतं.. पाणी असून वीज नाही, पिकांना हमीभाव नाही, गारपिटीच्या नुकसानीचे बोगस पंचनामे, पंचनाम्यातले भ्रष्टाचार.. शेतकऱ्यांचा कोणताही विचार न करणारं सरकारी धोरण… या सगळ्यालाच कंटाळलेल्या जळगाव जिल्ह्यातल्या 200 शेतकऱ्यांनी अखेर संपावर जाण्याचा निर्णय घेतला.
या संपाचं लोण आता सात गावांत पसरलंय. 200 वरून संपावर गेलेल्या शेतकऱ्यांची संख्या हजारावर गेलीय. पण, या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत तरी काय… टाकुयात एक नजर…
–    नुकसान झाल्यास त्याच दिवशी पंचनामे करावेत.
–    शेतकऱ्यांची दखल न घेणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी
–    पीक नुकसान भरपाई त्वरित द्यावी
–    ठिबक सिंचन अनुदान सहा महिन्यात मिळावे, त्याची तपासणी दोन महिन्यात व्हावी
–    बाजारभाव कमी असल्यास हमी भावाने शेतमालाची खरेदी करावी
–    नद्यांवर लहान लहान बंधारे बांधून अवैध वाळू उपसा थांबवावा
–    शेतकऱ्यांना पेन्शन योजना लागू करावी
–    पीक विम्याबाबत स्वतंत्र विभाग सुरु करावा.

शेतकऱ्यांच्या या मागण्या अजिबातच अवास्तव नाहीत. सरकारनं थोडीशी इच्छाशक्ती दाखवली तर त्या सहज पूर्ण होऊ शकतात. पण मुद्दा इच्छाशक्तीचा आहे. बळीराजाला जगवण्याची सरकारची खरच इच्छा आहे का? हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे. जळगाव जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी संप सुरू करून सरकारला आपल्या एकीच्या बळाची जाणीव करून दिलीय. तातडीने त्यांची दखल घ्या…  नाही तर हे लोण राज्यभर पसरलं तर आपल्या दोन वेळच्या जेवणाचे वांदे होतील लक्षात ठेवा… ( झी 24तासवरून साभार)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here