तामिळनाडूच्या शिक्षण क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाहीय. विनाकारण आपले नाव यामध्ये गोवले जातेय, हे सांगण्यासाठी तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंगळवारी संध्याकाळी पत्रकार परिषद घेतली. पण ही पत्रकार परिषदेत संपवताना त्यांनी एक विचित्र कृती केली त्यामुळे ते नव्या वादात सापडले आहेत. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांना त्यांच्याजवळ उभ्या असलेल्या एका महिला पत्रकराने प्रश्न विचारला.
त्यावेळी राज्यपालांनी प्रश्नाला उत्तर देण्याऐवजी त्या महिला पत्रकाराच्या संमतीविना तिच्या गालाला स्पर्श केला व गाल थोपटले. राज भवनात बोलवलेली ही पत्रकार परिषद आटोपून ते निघत असताना ही घटना घडली. यावेळी त्यांच्याभोवती पत्रकारांचा गराडा होता. लक्ष्मी सुब्रमण्यम असे या महिला पत्रकाराचे नाव असून त्या ‘द वीक’मध्ये काम करतात. मी बनवारीलाल पुरोहित यांना प्रश्न विचारला त्यावर त्यांनी उत्तर देणे अपेक्षित होते. पण त्यांनी उत्तर देण्याऐवजी माझे गाल थोपटले.
दरम्यान सोमवारी तामिळनाडूच्या अरुप्पूकोट्टई येथील खासगी कॉलेजमध्ये शिकवणाऱ्या निर्मला देवी या महिला प्राध्यापिकेला अटक करण्यात आली आहे. निर्मला देवी तिच्या कॉलेजमधील चार विद्यार्थीनींना मदुराई कामाराज विद्यापीठाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत लैंगिक संबंध ठेवायला सांगत होती. त्या बदल्यात चांगले मार्क आणि पैसे मिळतील अशी ऑफर तिने दिली होती. या प्रकरणात राज्यपालाचे नाव ओढले गेल्याने त्यांनी पत्रकार परिषद बोलावली होती.{सौजन्य लोकसत्ता ऑनलाइन}