माध्यमांनी नेहमीच विरोधी पक्षाच्या भूमिकेत असलं पाहिजे किंवा जनतेचा वकील म्हणून मिडियानं जनतेच्या प्रश्नांची सरकारकडं वकालत केली पाहिजे अशी जनतेची अपेक्षा असते.ती रास्तही असते.मात्र आज असं होत नाही.मिडियावर पूर्णपणे भांडवलदारांनी नियंत्रण मिळविलं आहे.त्यामुळं मिडिया केवळ सत्तेची भाषा बोलताना दिसत आहे किंवा मिडिया सरकारचा किंवा सत्तेचा प्रवक्ता बनला आहे.त्यामुळं सत्तेची सुंदर चित्र रंगविण्यातच मेन स्ट्रीम मिडिया मश्गुल आहे.लोकांचे जीनव मरणाचे प्रश्न मिडियात येत नाहीत अशी सार्वत्रिक तक्रार आहे.असं करणं मिडियाला शक्यही नाही कारण तसं केलं तर सरकार अडचणीत येऊ शकते.मिडियाच्या या बदलल्या भूमिकेवर भाष्य कऱणारं एक व्यंगचित्र सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालतंय..ते सोबत देत आहे.
महाराष्ट्रातील 324 छोटया वर्तमानपत्रांच्या जाहिराती बंद केल्यानं ज्यांना आनंदाच्या उकळ्या फुटल्या आहेत त्यांच्यासाठी हे कार्टुन डोळ्यात अंजन घालणारं आहे.देशातील छोटी वर्तमानपत्रं बंद करून सारा मिडिया ठराविक भांडवलदारांच्या दावणीला बांधण्याचं सरकारी धोरण आहे.माध्यमांचं हे एकाधिकारशाहीकरण देशाला फारच महागात पडणार आहे.त्यासाठी अगोदर छोटया पत्रांच्या नरडीला नख लावलं जात आहे.या मागचा सरकारी डाव लक्षात न घेता हे छोटी पत्रे किती वाईट आहेत यावर प्रवचन झोडत आपण आनंद व्यक्त करतो आहोत…असं करून आपण सरकारच्या धोरणाला अप्रत्यक्ष हातभारच लावतो आहोत ..ते भारतीय लोकशाहीसाठी घातक ठरणार आहे.