नवी दिल्ली– ‘फेक न्यूज’ देणा-या पत्रकारांची अधिस्वीकृती कायमस्वरूपी रद्द करण्याच्या प्रकरणावरून सर्वच स्तरातून टीका झाल्यानंतर अवघ्या 16 तासात हा निर्णय मागे घ्यावा लागला आहे. मात्र, या निर्णयाबाबत ज्येष्ठ पत्रकार, संपादक व नवनिर्वाचित खासदार कुमार केतकर यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. केतकर यांनी आज सकाळी राज्यसभेत सदस्यत्वाची शपथ घेतली. यानंतर संसदेबाहेर पत्रकारांशी बोलताना त्यांनी फेकन्यूज प्रकरणावर भाजप व संघपरिवाराला लक्ष्य केले.
कुमार केतकर म्हणाले, भाजप व संघ परिवाराने 2012 पासून सुमारे 1 हजारांहून अधिक गट फेक न्यूज तयार करत आहेत. यातील काही गट तर अमेरिकेतून चालवले जात आहेत. कोणताही पत्रकार फेक न्यूज तयार करत नाही. फार फार तर तो लाईक करतो, शेयर करतो. मात्र, खुद्द भाजप व संघ परिवाराच फेक न्यूज तयार करून सोशल मिडियात स्प्रेड करतो. त्यामुळे केंद्र सरकारने पत्रकारांवर कारवाई करण्याआधी ‘फेक न्यूज’चे कारखाने बंद करावेत.