प्रिय श्रेयलाटू
मुंबई : न केलेल्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणारे केवळ राजकारणातच आहेत असं नाही, असे महाभाग पत्रकारितेत देखील आहेत..चार – दोन जणांची संघटना स्थापन करायची, लेटर पॅड छापायचे आणि पत्रकारितेत जे काही चांगलं घडतंय ते आपल्या मुळेच अशी मिसाज मिरवत स्वतःची टिमकी वाजवायची..
सरकारच्या वतीने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेच्या नावाने राज्यातील ज्येष्ठ पत्रकारांना पेन्शन दिली जाते.. अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना वर्षावर आम्ही त्यांची भेट घेतली आणि पत्रकारांच्या आरोग्यासाठी एखादी योजना सुरू करावी अशी मागणी केली.. त्यानुसार त्यांनी “स्व. शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधी” ची स्थापना करून त्यामध्ये दोन कोटी रूपये फिक्स डीपॉझिटमध्ये ठेवले.. त्या व्याजातून पत्रकारांना आरोग्य विषयक मदत केली जाऊ लागली.. मात्र हा निधी अपुरा पडू लागल्याने आम्ही पुन्हा नंतरचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली आणि निधी पाच कोटी झाला.. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात हा निधी २५ कोटी झाला.. दरम्यानच्या काळात पत्रकारांना पेन्शन देण्याचा निर्णय भाजप सरकारने घेतला.. त्यानुसार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजना सुरू करून शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीतील ठेवीतून पत्रकार पेन्शन दिली जाऊ लागली.. तरीही अनेक पात्र पत्रकारांना पेन्शनचा लाभ मिळत नाही असे दिसल्यावर निधीतील ठेव रक्कम किमान ५० कोटी करावी अशी मागणी आम्ही वारंवार केली.. सरकारने १० कोटी मंजूर केले.. अर्थ मंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात तशी घोषणा केली होती..
त्यानंतर १० कोटींचा हा निधी काल शंकरराव चव्हाण सुवर्ण महोत्सवी पत्रकार कल्याण निधीकडे वर्ग करण्यात आला.. मात्र हे आमच्यामुळेच घडले अशी टीमकी काही श्रेय लाटू मंडळी वाजवू लागली.. “बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण निधी” अशा नावाची कोणतीही व्यवस्था नसताना सरकारने बाळशास्त्री जांभेकर पत्रकार कल्याण निधीत दहा कोटीची रक्कम जमा केल्याचे सांगितले जाते आहे.. बघा ज्यांना निधी कोणत्या व्यवस्थेत जमा झाला ते देखील माहिती नाही अशी मंडळी आमच्यामुळेच दहा कोटी जमा झाले असे सांगत आहे तशा बातम्या “अनेक झूट” मध्ये छापत आहेत..
अरे महाभागांनो, श्रेय लाटताना किमान पुरेसा अभ्यास तरी करा, जीआर तरी नीट वाचा.. पण जीआर नीट न वाचणारे दहा कोटी आमच्यामुळेच जमा झाले अशा थापा मारत आहेत.. अशा भूलथापांना कोणी बळी पडत नाही हा भाग वेगळा.. कारण राज्यातील पत्रकारांना हे पक्के माहिती आहे की, काम करणारे कोण आहेत आणि फुकटचे श्रेय लाटणारे कोण आहेत ते…