प्रश्न विचारणे पडले महागात..आणखी एका पत्रकाराची गच्छंती
प्रश्न विचारणं हे पत्रकाराचं काम आहे.विचारले जाणारे प्रश्न ज्यांना प्रश्न विचारायचे असतात त्यांना आवडलेच पाहिजेत असं नाही.मात्र हल्ली अडचणीचे प्रश्न विचारलेलं कोणालाच आवडत नाही.अगोदर प्रश्न तयार करायचे ,ते ज्यांची मुलाखत घ्यायची त्यांना दाखवायचे आणि त्यांनी हो म्हटल्यावर कॅमेर्यासमोर तेच प्रश्न विचारायचे अशीच बहुतेक चॅनलची आजही पत्रकारिता आहे.हे जे करीत नाहीत त्यांना घरचा रस्ता पकडावा लागतो.काही दिवसांपुर्वी एका मराठी चॅनलच्या संपादकांनी महाराष्ट्रातील एका नेत्याला काही अडचणीचे प्रश्न विचारले अन काही मिनिटांत या पत्रकाराला नोकरी सोडावी लागली.वरिष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांच्यावरही अशीच वेळ आली आहे.पुण्यप्रसून आजतकमध्ये वरिष्ठ पत्रकार होते.दसतक हा त्यांचा लोकप्रिय कार्यक्रम.काही दिवसांपुर्वी रामदेव बाबा यांची मुलाखत घेण्याची वेळ त्यांच्यावर आली.या मुलाखती दरम्यान बाबांना वाजपेयी यांनी काही कठिण प्रश्न विचारले.ते बाबांना रूचले नाहीत.त्यांनी आजतक व्यवस्थापनाकडं तक्रार केली.वाजपेयींचा बंदोबस्त केला नाही तर पतंजलीच्या सर्व जाहिराती बंद करण्याची धमकी त्यांनी मॅनेजमेंटला दिली.मॅनेजमेंटनं मग अशी चाल चलली की,वाजपेयींनी स्वतःहून राजीनामा द्यावा.दस्तकचा वेळ कमी केला गेला..कार्यालयात असं वातावरण तयार केलं गेलं की,कोणताही स्वाभिमानी पत्रकार तिथं काम करू शकणार नाही.अखेर मॅनेजमेंटला हवं तेच घडलं वाजपेयी यांनी राजीनामा दिला.सहारा झी-न्यूज करून वाजपेयी दुसर्यांदा आजतकमध्ये आले होते.आता पुन्हा ते नव्या शोधात आहेत…परखड मुलाखत घेतलेली व्यवस्थापनाला चालत नाही..मुळमुळीत प्रश्न विचारलेले प्रेक्षक मान्य करीत नाहीत अशा कोंडीत सारे पत्रकार आहेत.चार दिवसांपुर्वी एका मराठी वाहिनीवर एका नेत्याची मुलाखत पाहिली..मुलाखत कशी नसावी याचा तो उत्तम नमुना होता.मुलाखतकार पत्रकार एकाही प्रश्नाचा पाठपुरावा करीत नव्हता.नोकरी टिकवायची तर हेच करावं लागतं असं आज सांगितलं जातंय.–