कोकणातील विधायक पत्रकारितेतला
खळाळता ‘प्रवाह’ थांबला ..
कोकणचा चालता-बोलता इतिहास म्हणून ज्यांचा उल्लेख करता येईल असे निशिकांत उर्फ नाना जोशी आज आपल्यामध्ये नाहीत यावर खरंच विश्वास बसत नाही.ते आजारी होते हे माहिती होते,मध्यंतरी त्यांच्याशी बोलतानाही ते थकल्याचे जाणवत होते,पण हा आजार एवढया टोकाला गेला असेल याची कल्पना नव्हती.त्यामुळं आज जेव्हा त्यांच्या निधनाची बातमी आली तेव्हा मोठा धक्का बसला.त्यांच्या निधनानं मागच्या पिढीतला एक महत्वाचा दुवा निखळला.कोकणची पत्रकारिता पोरकी झाली हे नक्की.
नानांचा पिंड हा पत्रकारांचा असला आणि तो वसा त्यांनी आयुष्यभर निष्ठेनं तेवढाच आनंदानं जपला असला तरी त्यांनी सामाजिक,राजकीय,सास्कृतिक,शैक्षणिक ,धार्मिक क्षेत्रातही मुसाफिरी केली.नाना जेथे जेथे गेले तेथे तेथे त्यानी आपल्या कार्यातून ठसा उमटविला .ते राजकारणात गेले तेथे आमदार झाले.सामाजिक क्षेत्रात कार्य करताना त्यांनी विविध सामाजिक संस्था निर्माण केल्या आणि अनेक संस्थांना मदतही केली.नाना लोटे परशूराम येथील परशूराम देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष होते.या देवस्थानचा कायापालट करून टाकण्याचं मोठं काम त्यांनी केलं.सरकारी निधी मिळावा यासाठी सातत्यानं सरकार-दरबारी पाठपुरावा केला आणि मंदीराचा जिर्णोध्दार केला.त्यामुळं त्यांच्या जाण्यानं केवळ सागर आणि कोकणातली पत्रकारिताच पोरकी झाली असं नव्हे तर त्यांच्या जाण्याचा फटका इतर क्षेत्रांनाही नक्कीच बसला आहे.
आरंभीच्या काळात मुंबईच्या काही वर्तमानपत्रांमधून पत्रकारिता करीत असतानच नानांनी पन्नास वर्षापूर्वी सागर सुरू करण्याचा निर्णय घेतला.तो काळ असा होता की,वर्तमानपत्र सुरू करणं आणि ते ही कोकणात मोठे धाडसाचं काम होतं.दळणवळणाच्या साधनांपासून अनेक गोष्टींची वानवा होती.चांगला स्टाफही कोकणात मिळणं दुरापास्त असायचं.विजेचा खेळखंडोबा,पीटीआय,युएनआयच्या मशिनमध्ये येणार्या अडचणी आणि छपाई मशिनमध्ये काही बिघाड झाला तर त्याचे तज्ज्ञही मुंबईहून बोलवावे लागत.हे सारं कटकटीचं तेवढंच त्रासदायक होतं.तरीही त्यांचा निर्धार पक्का होता आणि जिद्दही होती.त्यातून चिपळूण सारख्या एका तालुक्याच्या ठिकणी नानांनी सागर सुरू केला आणि पन्नास वर्षे सागरच्या माध्यमातून नानांनी कोकणच्या विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले.लोकाभिमुख आणि सामाजिक बांधिलकी जपणार्या सागरनं सकारात्मक आणि विधायक पत्रकारिता करीत वाचकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे,म्हणूनच चिपळूण सारख्या तालुक्याच्या ठिकाणी सुरू झालेला सागर वरती अलिबाग आणि खाली सावंतवाडीपर्यंत विस्तारत गेला.याचं काऱण कोकणचं खरं प्रतिबिंब त्यात उमटलेलं असायचं.कोकणात आज बाजारू पत्रकारिता करणारी काही पत्रे आहेत.सणसणाटी आणि विध्वंसक पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न ही वर्तमानपेत्रे करीत असतात..त्यातून विक्री आणि धंदा वाढविण्याचाही अशा पत्रांचा प्रयत्न असतो.नानांना याची कधी गरज वाटली नाही.विधायक पत्रकारितेचा वसा त्यांनी घेतला आणि शेवटपर्यंत तो निष्ठेनं निभावला.त्यामुळं सागरसमोर विश्वासार्हतेचा प्रश्न कधी उभा राहिला नाही की,कधी सागरमधील बातमीबद्दल कोणी शंका घेतली नाही.काळानुरूप सागर रंगीत झाला,पानं वाढत गेली पण सामाजिक बांधिलकी जपणारी सागरची भूमिका कधी बदलली नाही,किंवा सागर गल्लाभरू पत्रकारितेच्या मागं कधी लागला नाही.एक तटस्थ,निर्भिड,निःपक्ष पेपर ही सागरची ओळख आजही कायम आहे.आज संपादक म्हणून मालकांची नावं अंकावर छापली जातात.हे संपादक एक ओळही कधी लिहू शकत नाहीत.नाना मालक जरूर होते पण त्याअगोदर ते लिहिणारे संपादक होते.नानांचे अग्रलेख आणि त्यांचं प्रवाह हे साप्ताहिक सदर हे गोविंदराव तळवळकर , अनंत भालेराव यांच्या लेखणीचं स्मरण करून देणारं असायचं.समाजाबद्दलचा जिव्हाळा,प्रश्नांबद्दल वाटणारी तळमळ नानांच्या शब्दाशब्दातून व्यक्त व्हायची.त्यामुळं हल्ली अग्रलेखाला कोणी वाचक नसला तरी नानांचे अग्रलेख मुद्दाम वाचले जायचे.नानांचे माहितीपूर्ण अग्रलेक,स्पष्ट आणि रोखठोक प्रवाह यामुळं सागरची लोकप्रियता एवढी होती की,सागर हे कोकणचं मुखपत्र बनलं होतं.बाहेरून येणार्या मोठ्या आणि साखळी वर्तमानपत्रांच्या स्पर्धेतही सागरनं आपलं वेगळेपण टिकवत सारा कोकण व्यापून टाकला होता.प्रभावी लेखणीबरोबरच नानांचे कष्टही त्यामागे होते हे नाकारता येत नाही. .सागर वाढविताना नानाींची मोलाची साथही त्यांना मिळाली हे महत्वाचं आहे.कारण नानाना आर्थिक गणित कधी जमलं नाही.जाहिरात वसुली,अंकांची वसुली हया विषयात त्याना गती नव्हती.त्यांना अनेकांनी टोपी लावली.पण नंतर नानींनी हे विषय हाती घेतली आणि सागरचा आर्थिक डोलारा ढासळणार नाही याची काळजी घेतली.राज्यातील अऩेक प्रादेशिक आणि जिल्हा वर्तमानपत्रे डबघाईस आलेली असताना सागर सुस्थितीत आहे याचं काऱण नानींचं सुनियोजित व्यवस्थापन.त्यामुळं स्पर्धेतही सागर टिकून राहिला.
नानांना कोकणाची खडानखडा माहिती तर होतीच त्याच बरोबर कोकणावर त्यांचं स्वाभाविकपणे जीवापाड प्रेमही होतं.ते त्यांच्या अग्रलेखातून आणि प्रवाह या साप्ताहिक सदरातून दिसत असायचं.कोकणातले प्रश्न ते एवढ्या आक्रमकपणे आणि पोटतिडकणी मांडत की,राज्यकर्त्यांना सागरची दखल घेणे भाग पडायचे.मिश्किलपणा हा त्यांच्या लिखाणाचा एक पैलू होता..त्यामुळं टीका करताना अंगावर ओरखडे ओढले गेले नाहीत तरी समोरची व्यक्ती घायळ होत असे.कोकणातले प्रश्न त्यांनी ज्या तडफेनं मांडले त्याच आपलेपणानं कोकणात वेगळं काम करणार्यांना बळ देण्याचं काम नानांनी केलं आहे.त्यामुळ अनेक माणसं मोठी झाली,जगासमोर आली.आज सोशल मिडिया प्रभावी असला तरी तो काळ तसा नव्हता.मुंबईची वर्तमानपत्रे कोकणातील बातम्यांना केवळ पूर,आपत्तीपुरतेच स्थान द्यायची.अशा स्थितीत सामांन्य माणसांना सागरचाच आधार वाटायचा.आपली दुःख,आपल्या वेदना,आपल्या समस्या घेऊन लोक नानांकडं जायचे आणि नानाही त्याना लेखणीच्या माध्यमातून न्याय मिळवून द्यायचे.हे गेली पन्नास वर्षे सलगपणे सुरू होतं.
नानांचा स्वभाव गोष्टीवेल्हाळ.गप्पा मारताना किती बोलू आणि किती नाही असं त्यांना व्हायचं.अगदी फोनवर बोलतानाही किमान तासभर नानांशी संवाद चालत असे.त्यांच्याशी गप्पा मारणं हे मोठं आनंद देणारं असायचं बोलताना कोकणातील साामाजिक ,राजकीय ,भौगोलिक माहिती मिळायची.त्यांच्या अशा स्वभावामुळं कोकणातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातही त्यांचा मोठा चाहता वर्ग निर्माण झालेला आहे.राजकारणातही शरद पवारापासून अनेक नेत्यांशी त्यांचे जवळकीचे संबंध होते.मात्र ना याचा त्यांनी कधी लाभ उठविला ना या संबंधांचं भांडवल करीत स्वतःचा लाभ करून घेतला.जे पटलं नाही ते त्यांनी भिडमुर्वत न ठेवता मांडलं.सुनील तटकरे देखील त्यांचे मित्र होते मात्र त्यांच्यावर प्रहार करताना त्यांनी आपले संबंध कधी त्याआड येऊ दिले नाहीत.निर्भिड पत्रकारिता कश्याला म्हणतात हे त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं.नाना माझे ज्येष्ठ मित्रच होते असं नव्हे तर गुरूस्थानी होते.कोकणावर मला काही लिहायचं असेल तर मी बिनदिक्कत नानांना फोन करायचो आणि तेही तासंतास मला सारी माहिती द्यायचे.माझा एखादा कटाक्ष आवडला तर फोन करून जसे सांगत तसेच काही संदर्भ चुकले तर त्याबद्दलही मला बोलत.अलिबागला असताना असंख्य वेळा आम्ही भेटलो.मी देखील चिपळूणला गेलोय आणि नानांना न भेटता आलोय असं कधी झालं नाही.हा जिव्हाळा शेवटपर्यंत कायम होता..नानांचं माझ्यावर विशेष प्रेम होतं.खरं तर कृषीवल आणि सागरची रायगडात स्पर्धा होती पण मी आणि नाना सच्चे मित्र होतो.माझ्या कामाचे ते प्रसंशक होते.मला आठवतंय,मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी माझ्या पुढाकारानं कोकणातील पत्रकारांचं मोठं आंदोलन उभं राहिलं होतं.नानांचा या आंदोलनात सहभागही असायचा आणि पाठिंबाही.आमची मागणी मान्य झाल्यानंतर जेव्हा प्रत्यक्ष काम सुरू झालं त्या दिवशी नानांनी सागरमध्ये माझा दोन कॉलम फोटो टाकून ‘मराठवाडयातून आलेल्या एका पत्रकाराने कोकणात मोठं काम केलं’ असं शिर्षक देऊन पानभर मजकूर लिहिला होता तो अंक मी आजही जपून ठेवलेला आहे.एखादयाची तारीफ करताना नानांनी कधी कोकणी कंजुषपणा दाखविला नाही.ते भरभरून लिहित.मला अनेकदा हा अनुभव आलेला आहे.त्यामुळेच मी अलिबाग सोडल्यानंतरही त्यांचा माझा संपर्क आणि स्नेहही कायम होता.मागच्या महिन्यात रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघानं आमचा सत्कार केला.तो सत्कार नानांच्या हस्ते करायचं ठरलं होतं.मात्र त्यांची प्रकृत्ती ठीक नसल्यानं तो योग आला नाही.त्याची रूखरूख मला कायम राहणार . परतीच्या प्रवासात आम्ही चिपळूणला त्यांच्या घरी गेलो पण ते झापलेले असल्यानं त्यांची भेट होऊ शकली नाही.आज त्यांच्या निधनाची बातमी आली.ती नानांवर प्रेम कऱणार्या माझ्यासाऱखया अनेकांना शोकसागरात डुबवून टाकणारी आहे हे नक्की.कोकणात सकारात्मक पत्रकारिता कऱणारा.किमान साधनशुचिता पाळणारा,एक हाडाचा पत्रकार आपल्यातून निघून गेलाय.त्याच्या जाण्यानं कोकणच्या पत्रकारितेत निर्माण झालेली पोकळी कदापिही भरून येणारी नाही .नानांच्या जाण्यानं सकारात्मक पत्रकारितेचा एक कायम खळाळता प्रवाह थांबला हे नक्की.
नानांना विनम्र आदरांजली.–
एस.एम.देशमुख