“प्रचारक(?) पत्रकार”
निवडणुका रंगात आलेल्या आहेत. एका बाजुला भक्त आणि दुसरया बाजुला साहेबांच्या शिष्यांच्या टोळ्या समाजमाध्यमांवर थैमान घालत आहेत.. मैदानात नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस किंवा राहूल गांधी, शरद पवार नसून आपणच आहोत अशा आविर्भावात परस्परांवर सपासप शाब्दिक वार केले जात आहेत.. त्यांना ते शोभून यासाठी दिसते की, त्यांनी सारासार विवेक सोडलेला आहे, अथवा कोणाचे तरी वैचारिक मांडलिकत्व स्वीकारलेले आहे.. पण पत्रकारांचे काय?
पत्रकारांनी तटस्थ असावे, नि:पक्ष असावे, पूर्वग्रहदूषित नसावे असं जर्नालिझमच्या अभ्यासक्रमात शिकविले जाते.. समाजाची देखील पत्रकारांकडून अशीच अपेक्षा असते.. पत्रकारांनी पक्षपाती भूमिका न घेता घटनेचं तटस्थ विश्लेषण करावं असंही समाजाला अपेक्षित असतं. असं करताना चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणण्याची हिंमतही पत्रकारांनी दाखविली पाहिजे.. त्याबद्दलही कोणाचं दुमत नाही.. मराठी पत्रकारितेची परंपरा अशीच आहे.. महाराष्ट्रातील बहुसंख्य पत्रकार ही सारी पथ्ये आजही पाळतात देखील.. अशा सर्व पत्रकारांचा नक्कीच अभिमान वाटतो..
मात्र वसुंधरा काशीकर यांची आज एक फेसबुक पोस्ट पाहून अस्वस्थ झालो.. निवडणुका चालू असताना काही पत्रकारांना काही नेत्यांच्या प्रेमाचे एवढे भरते आलेले आहे की, हे लिखाण ज्येष्ठ पत्रकारांचे आहे की, कार्यकर्ता पत्रकारांचे आहे असा प्रश्न वसुंधरा काशीकर यांना जसा पडला तसाच तो मलाही पडला आहे..
राजकारणात आणि समाजकारणात असलेले अनेकजण समाजातील वेगवेगळ्या घटकांना प्रसंगानुरूप मदत करीत असतात.. मराठी पत्रकार परिषद आणि परिषदेशी संलग्न जिल्हा संघांनी देखील गेल्या दोन वर्षांत अनेक पत्रकारांना जवळपास 30 लाखांचे अर्थसहाय्य केलं आहे.. यामध्ये दोन पत्रकार कॅन्सरग्रस्त देखील होते.. कर्तव्य भावनेतून ही मदत दिली जाते.. तरीही जेव्हा ही मदत दिली जाते तेव्हा त्याचं कौतूक म्हणा, संबंधित व्यक्ती अथवा संघटनेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली गेली पाहिजे.. माध्यमांचं ते यासाठी कर्तव्य असते की, समाजातील चांगुलपणा संपलेला नाही हे समाजमनावर बिंबले पाहिजे आणि त्यातून लोकांच्या मनात आपण एकटे नाहीत ही भावना वृध्दींगत झाली पाहिजे.. महाराष्ट्रातील माध्यमांनी हे कर्तव्य वेळोवेळी समर्थपणे पार पाडलेले आहे याबद्दल शंकाच नाही.. मात्र दहा बारा वर्षांपूर्वी एखाद्या नेत्यांनं एखाद्या कॅन्सर पिडित रूग्णाला केलेली मदत किंवा एखाद्या गरजू मुलीला दिलेला आधार हा विषय आज बातमीचा, लेखाचा कसा काय होऊ शकतो? जेव्हा ही मदत दिली गेली तेव्हा माध्यमांनी त्याची दखल घेत त्या बातम्यांना योग्य तो न्याय दिल्याचे उल्लेख संबंधित पोस्टमध्ये आहेत.. मग तीच बातमी पुन्हा फेसबुकच्या माध्यमातून प्रकाशित करण्याचं प्रयोजन काय असू शकतं? दहा – बारा वर्षांपूर्वीची ऊदाहरणं देऊन तो नेता किती समाजहितदक्ष आहे, हाकेला धावून जाणारा आहे, दातृतववान आहे याचं गुणगाण गाणयाचंही आज काही कारण नाही.. ते ही निवडणूक प्रचार टिपेला पोहोचलेला असताना? यावर मी भाष्य करण्याची गरज नाही वाचक अशा बातमयांमागची बातमी बरोबर शोधत असतात आणि अशा बातम्या, कथा का पेरल्या जातात याची चपखल कारणमीमांसा देखील ते करीत असतात.. पुर्वी ठीक होतं, पत्रकारांची मक्तेदारी होती, आम्ही जे खरडू ते वाचकांनी गुमानं वाचलं पाहिजे असा पत्रकारांचा दंडक होता.. आलेले खुलासे त्याचं पुरतं विच्छेदन करून छापण्याची सवय आम्हाला होती आणि तशी दक्षताही आम्ही घेत असू. आज समाजमाध्यमामुळं प्रत्येक व्यक्तीच पत्रकार बनली आहे.. ती आपल्या भावना व्यक्त करू शकते हे आम्ही पत्रकार बरयाचदा विसरतो..त्यामुळं पत्रकार एककल्ली बातम्या देत असतील तर अशा पत्रकारावर देखील वाचक टिकेचे वार करीत असतात.. प्रसंग नसताना नेत्याचं गुणगाण करणारया पोस्ट जेव्हा दोन तीन ज्येष्ठ पत्रकारांकडून पडल्या तेव्हा त्या पोस्टींचा हेतू देखील लोकांच्या नजरेतून निसटला नाही..आणि वाचकांची नाराजी देखील लपून राहिलेली नाही..
प्रसंग असेल, वाढदिवस असेल तर नेत्यांच्या मोठेपणाचे पोवाडे गायला माझी काय कोणाचीच हरकत नाही.. पण आज माहोल निवडणुकांचा असल्यानं असं लिहिलं गेलेलं लिखाण मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी केलेलं लिखाण आहे असं लोकांना वाटतं.. अगोदरच पत्रकार कोणाच्या तरी हातचे बाहुले बनलेले अाहेत, समाजहिताची भूमिका घेताना माध्यमं मुकी झालेली आहेत, माध्यमं विकली गेलेली आहेत असे आरोप अलिकडं सर्रास होत आहेत.. अशा अवेळीच्या लिखाणामुळे समाजाला वाटणारया शंकांना बळकटी मिळते..मी पत्रकार संघटनेचा पदाधिकारी आहे, पत्रकाराच्या विरोधात कोणी बोलले तर संबंधितावर मी तुटून पडतो, अनेकदा शत्रूत्वही घेतो, त्यातून झालेल्या किंवा होणारया नुकसानीची खंत किंवा पर्वाही मला नसते.. कारण पत्रकार आणि पत्रकारिता कोणत्या अवस्थेतून जात आहे हे मी अनुभवलेलं आहे, अनुभवतो आहे.. म्हणूनच मी आणि माझी संघटना पत्रकारांच्या हक्कासाठी, हितासाठी लढत असते.. तरीही एेननिवडणकीत प्रचारकी थाटाच्या ज्या पोस्ट पत्रकारांनी लिहिल्या त्या मला मान्य नाहीत..वसुंधरा काशीकर यांनी या विरोधात स्पष्टपणे सर्वप्रथम आपलं मत व्यक्त केलं, हा विषय चर्चेसाठी लोकांच्या समोर मांडला त्याबद्दल त्यांचे आभार..
SMDeshmukh