पासपोर्ट नूतनीकरण पडताळणीसाठी आलेल्या पोलीस उपनिरीक्षकाने आपल्याबरोबर अश्लील कृती करुन जबरदस्तीने मिठी मारली असा आरोप गाझियबादमध्ये राहणाऱ्या एका महिला पत्रकाराने केला आहे. महिला पत्रकाराने एका पाठोपाठ एक टि्वट करुन आरोप केल्यानंतर टि्वटर युझर्सनी उत्तर प्रदेश पोलिसांच्या टि्वटर हँडलवर संताप व्यक्त केला. त्यानंतर सरकारने या घटनेची दखल घेऊन पोलीस उपनिरीक्षक देवेंदर सिंहला निलंबित केले असून डीजीपींनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
पासपोर्टच्या माहितीची खातरजमा करण्यासाठी आलेल्या पोलिसाच्या अशा वागण्यामुळे मी अस्वस्थ झाले होते. एका टप्प्यावर त्याने मला म्हटले कि, मी तुझे काम केले, आता तू मला काय देणार ? असा आरोप महिला पत्रकाराने केला आहे. सदर तरुणीचे वय २० ते २५ च्या आसपास असून ती एका आघाडीच्या इंग्रजी दैनिकात पत्रकार आहे. गाझियाबाद पोलिसांनी या महिला पत्रकाराला तक्रार दाखल करायला सांगितली आहे.
मी मूळची गुवहाटीची असल्याचे सांगितल्यानंतर विषयाला वेगळे वळण मिळाले. आपणही गुवहाटीमध्ये काम केले आहे असे त्या पोलिसाने सांगितले व माझ्या मांडीवर हात ठेऊन आपण मित्र आहोत असे तो म्हणाला. त्याच्या अशा वागण्यामुळे मी अस्वस्थ झाले आणि उठून किचनमध्ये गेले. माझ्या घरात काम करणाऱ्या हेल्परला मी तो पोलीस उपनिरीक्षक जात नाही तो पर्यंत घरातच थांबायला सांगितले. माझ्याकडे घरभाडयाची पावती नसल्यामुळे मी त्याला घराबाहेर जाण्यास सांगू शकत नव्हते.
पासपोर्ट पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर निघताना त्याने मला तू काय देणार ? अशी विचारणा केली. तो निघताना मला मिठी मारण्याचा प्रयत्न करत होता पण मी विरोध करत होते. अखेर त्याने हस्तांदोलनासाठी हात पुढे केला मी सुद्धा हस्तांदोलनासाठी हात पुढे करताच त्याने मला जबरदस्तीने खेचून घेतले व मिठी मारली असे महिला पत्रकाराने सांगितले. आरोपात तथ्य आढळले तर देवेंदर सिंहविरोधात कठोर कारवाई केली जाईल असे उत्तर प्रदेश पोलिसांनी स्पष्ट केले आहे.