विषय एका वयोवृध्द पत्रकाराने पत्रकारितेसाठी केलेल्या त्यागाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा होता,विषय चांगुलपणाला बळ देण्याचा होता आणि विषय आमच्या प्रतिष्ठेचाही होता.त्यामुळे वाटेत अनेक काटे पसरविले गेले तरी आम्ही जिद्दीनं कार्यक्रम केला आणि ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. दिनू रणदिवेंना 91 हजाराची थैली अर्पण करण्याचा आम्ही संकल्प सोडला तेव्हापासूनच विरोध सुरू झाला होता. याची काही गरज नसल्याचं सूचविलं गेलं. .परंतू जगात चांगूलपणा,तत्वनिष्ठा टिकावी असं जर वाटत असेल तर सत्प्रवृत्तीना बळ दिलं पाहिजे असं माझं मत आहे.एकीकडं ध्येयवादी,तत्वनिष्ठ पत्रकार शिल्लक नसल्याबद्दल गळे काढायचे आणि दुसरीकडे ज्यांनी केवळ समाजाच्या भल्यासाठी व्यक्तीगत सुख-दुःखावर पाणी सोडत सचोटीनं पत्रकारिता केली त्यांची वृध्दापकाळी उपेक्षा करायची हे थोतांड किमान आम्हाला मान्य नाही.पत्रकारितेतील चांगूलपण टिकवायचं असेल तर ज्यांनी ते जपलंय त्यांची काळजी घेत,तुमच्या सांजवेळी आम्ही तुमच्याकडं दुर्लक्ष करणार नाही असा संदेश मिळाला पाहिजे.दिनू रणदिवेंना पैश्याची गरज आहे की,नाही हा मुद्दा गौण आहे.त्यांच्या कार्याचा गौरव करणं महत्वाचं होतं. दिनू रणदिवेंना थैली अर्पण करण्यामागे आमची हीच भावना आणि धाऱणा होती.म्हणून आम्ही जिद्दीनं कामाला लागलो होतो.सुदैवानं आम्ही त्यात यशस्वी झालो.समाजात काही मंडळी अशी असते की,ती कायम नकारात्मक भूमिका घेऊन वावरत असते.अशा व्यक्तींनी आमच्या कार्यक्रमास विरोध करणे आम्ही समजू शकतो.हा विरोध करणार्यांनी आपण कुणाच्या सत्काराला अपशकून करतो आहोत हे तरी ध्यानी घ्यायला पाहिजे होते.उध्दव ठाकरे ,अरूण टिकेकर आले नसते,त्यांच्या ह्स्ते रणदिवेंचा सत्कार झाला नसता विरोध करणार्या नाठाळालांना आसुरी आनंदाशिवाय काही मिळाले नसते.दिनू रणदिवे हे नावचं एवढे मोठे होते की,उध्दव ठाकरे आले आणि त्यानी रणदिवेच्या कार्याचा गौरव करीत त्यांचा सपत्नीक सत्कार केला.त्यानी येऊ नये म्हणून आटापिटा कऱणारे तोंडावर आपटले.मी आयुष्यभर सकारात्मक पत्रकारिता केली.सकारात्मक भूमिका घेऊनच कामही करतो.ज्यांना काहीच करायचं नाही ते असे अडथळे आणतात.मात्र मी पुन्हा एकदा येथे स्पष्ट करू इच्छितो की,कोणाला काहीही वाटो,कोणी कितीही काव काव करोत पत्रकारांचं हित आणि पत्रकाराच्या हक्काची लढाई मी चालूच ठेवणार आहे.त्यासाठी मी यापुर्वी मोठी किंमत मोजली आहे,पुढेही ती मोजण्याची माझी तयारी आहे..कोणतीही खोट माझ्या मनात नसल्यानं मी कोणत्याही कटकारस्थानांना भीक घालणार नाही हे मित्रानी लक्षात असू द्यावं.उध्दव ठाकरेंनी कोणत्याही थापांना भीक न घालता एक ऋुषीतुल्य पत्रकाराचा सन्मान केला,त्याबद्दलआम्ही त्यांचे मनापासून आभारी आहोत.किमान पत्रकारितेतील अशा चांगूलपणाला बळ मिळावं यासाठी काही भरीव कऱण्याची योजना आहे.पत्रकारितेचं शुध्दीकरण अशक्य असलं तरी ज्या सत्तप्रवृत्ती आहेत त्यांना बळ देता आलं तरी पुरेसं आहे.या कार्यात पत्रकारितेवर प्रेम कऱणारे नक्कीच आपल्याबरोबर असतील यात शंकाच नाही. एसेम—