ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचे प्रतिपादन
पत्रकारिता एक आदर्श पेशा आहे, मात्र येथे पैसे कमवायला येऊ नये. पैसा हवा असेल तर जाहिरात क्षेत्राकडे वळा असे सांगत भारतामध्ये प्रेस या शब्दाचा उगम स्वातंत्र्य संग्रामामधून झाला. भगतसिंग, नेहरू, टिळक, आंबेडकर हे खरे पत्रकार होते. त्यांनी सामान्य नागरिकांची मने जिंकली होती. आणि हेच खरे पत्रकारितेचे यश आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केले.
इन्स्टिटय़ूट ऑफ सायकॉलॉजिकल हेल्थ (आय.पी.एच) यांच्यावतीने आयोजित केलेल्या वेध या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमात रविवारी सायंकाळी ठाणे येथील शिवसमर्थ शाळेच्या पटांगणावर ते बोलत होते.
आपल्या देशातील प्रसारमध्यमांमध्ये बॉलीवूडला अधिक महत्त्व दिले जाते. परंतु गरिबी, बेरोजगारी, कृषी खाते, पाणी समस्या, प्रदूषण, लोकसंख्या यांसारख्या अनेक समस्या भेडसावत आहेत. मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. पत्रकारांनी एखाद्या विषयाची नकारात्मक बाजू मांडणे अधिक महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातच नाही तर शहरी भागातही जाती-धर्म पाळले जातात असे माझे निरीक्षण असल्याचे त्यांनी सांगितले. चेन्नई हे कांजीवरम साडय़ांसाठी प्रसिद्ध राज्य आहे. मात्र या साडय़ांचे कारागीर चेन्नई, मदुराई यांसारख्या ठिकाणी रिक्षा चालविताना दिसतात. त्यांना पुरेशा प्रमाणात मजुरी मिळत नसल्याने त्यांच्यावर ही वेळ ओढवली आहे.
तसेच भारत देशातील ग्रामीण भागात १८ करोड वस्ती आहे. या वस्तीमध्ये घरातील कर्ता पुरुष महिना ५ हजार रुपयेच कमवतो, तर शेतीच्या क्षेत्रात एका शेतकऱ्याच्या ५ जणांच्या कुटुंबांमध्ये महिन्याचे आवक फक्त ६,४२६ रुपये आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले. ग्रामीण भाग म्हणजे कलेचे माहेरघर आहे, परंतु त्यांच्याकडे अधिक लक्ष दिले जात नाही. सध्या झालेल्या चलनकल्लोळाचा फटका शेतकरी, शेतमजूर आणि दुकानदारांना बसला आहे, असे सांगताना शेतमजूर उधारीवर कामे करत असल्याचे त्यांनी नमूद केले. आपल्या स्वातंत्र्याचे बलिदान या कॉर्पोरेट जगतात मी का द्यावे असेही ते म्हणाले. पत्रकारिता एक परिवर्तनाचे साधन असले पाहिजे. तुम्ही शैक्षणिक क्षेत्रात हुशार असलात तरीदेखील आजूबाजूला काय चालले आहे याचे भान ठेवा, त्याचा अभ्यास करा, असा सल्लाही त्यांनी उपस्थितांना दिला.
लोकसत्तावरून साभार