मुंबई -गोवा महामार्गापाठोपाठ अलिबाग ते वडखळ या मार्गाचे चौपदरीकरणाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्याचबरोबर आता अलिबागला रेल्वेने जोडण्याचे रायगडकरांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याची माहिती केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी दिली आहे. ते अलिबाग येथे पत्रकारांशी बोलत होते.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे या रेल्वेमार्गाबाबत सकारात्मक आहेत. मध्य रेल्वेने याबाबत तयार केलेल्या प्रस्तावाला रेल्वे मंत्रालयाने मंजुरी दिली आहे. आता आरसीएफ कंपनीनेही त्यांचा सध्या अस्तित्वात असलेल्या रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक करण्यास मंजुरी दिली.
त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च कमी होण्यास मदत होणार आहे. या शिवाय भूसंपादनाची गरज भासणार नाही. चोंढी येथे रेल्वे स्थानक करून रेल्वे सेवा तातडीने सुरू करता येऊ शकेल.
अलिबाग वडखळ रस्त्यालगत २८ किलोमीटरचा नवीन रेल्वे मार्ग टाकल्यास त्यासाठी भूसंपादन करावे लागेल. भूसंपादनानंतर रेल्वे मार्गाचे काम सुरू होऊ शकेल. यासाठी जवळपास पावणेचारशे कोटी रुपये खर्च येईल. तर आरसीएफ कंपनीच्या विद्यमान रेल्वे मार्गाचा वापर केल्यास प्रकल्पाचा खर्च आणि वेळ वाचवता येऊ शकेल.
रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या मार्गाची पाहणी करून तो प्रवासी रेल्वे वाहतुकीसाठी योग्य आहे का आणि त्यावर प्रवासी वाहतूक सुरू करायची झाल्यास किती खर्च यईल याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना मध्य रेल्वेला दिल्या आहेत, असेही गीते यांनी सांगीतले.
कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाच्या कामाचा शुभारंभ ३१ ऑक्टोबर रोजी रोहा येथून केला जाणार आहे. याशिवाय या रेल्वे मार्गावर वसई-रत्नागिरी ही नवीन पॅसेंजर सुरू केली जाणार आहे. तर रायगड जिल्ह्य़ातील इंदापूर व गोरगाव ही दोन स्थानके नवीन बांधण्यात येणार आहेत, अशी माहिती गीते यांनी दिली. रायगड जिल्ह्य़ातील पेण रेल्वे स्थानकात जलद गाडय़ा थांबत नसल्यामुळे प्रवाशांची गरसोय होते. पेण रेल्वे स्थानकात काही जलद गाडय़ा थांबाव्यात यासाठी मी प्रयत्न करणार आहे, असे केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांनी या वेळी सांगितले.