पेण को-ऑप. अर्बन बँक अवसायानात काढण्याची घाई करणारे राज्य शासन, सहकार विभाग व उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांची अंमलबजावणी करण्यात दिरंगाई करणारे रायगड जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन यांचा निषेध व धिक्कार करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर आज सुमारे तीन हजार ठेवीदार, खातेदारांनी सहकुटुंब काढलेल्या मोर्चाने जिल्हा प्रशासन हादरून गेले.
ठेवीदार खातेदार संघर्ष समिती अध्यक्ष आमदार धैर्यशील पाटील व कार्यवाह नरेन जाधव यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाबरोबर झालेल्या चर्चेअंती दीड महिन्यात ३५ बोगस कर्जदारांच्या मालमत्तेच्या लिलावाची प्रक्रिया येत्या १७ मे रोजी सुरू करण्यात येणार आहे. पहिल्या मालमत्तेचा लिलाव करून पैसे बँकेत जमा करण्यास प्रारंभ केला जाईल तर १२८ बोगस कर्ज प्रकरणांबाबत सहकार खात्याकडून नियुक्त सहा विशेष लेखापरीक्षकांच्या पथकाचा अहवाल प्राप्त होताच, या बोगस कर्जदारांविरुद्ध फौजदारी कारवाईस प्रारंभ करण्यात येईल, असे ठोस आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी दिले आहे. जिल्हाधिकार्यांचे प्रतिनिधी म्हणून निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल आणि मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये ३५ बोगस कर्ज प्रकरणांतील तारण जमिनींचा लिलाव करण्याकरिता शासन प्राधिकृत अधिकारी तथा अलिबाग उपविभागीय महसूल अधिकारी दीपक क्षीरसागर यांनी मोर्चाच्या शिष्टमंडळाशी चर्चा केला.