चेन्नई – राजभवनातील पत्रकार परिषदेदरम्यान, एका महिला पत्रकाराच्या गालाला हात लावल्यावरून पेटलेल्या वादानंतर तामिळनाडूचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी सदर महिला पत्रकाराची माफी मागितली आहे. सदर महिला पत्रकाराने राज्यपालांचे गालाला हात लावतानाचे छायाचित्र ट्विटरवर पोस्ट केले होते. त्यानंतर वादाला तोंड फुटले होते.
बनवारीलाल पुरोहित यांनी महिला पत्रकार लक्ष्मी सुब्रह्मण्यम यांना पाठवलेल्या आपल्या माफीनाम्यात म्हटले आहे की, मी तुम्हाला माझ्या नातीसमान मानून गालाला हात लावला होता. मी पत्रकार म्हणून तुमचे कौतुक करण्याच्या इराद्याने असे केले होते. कारण मी स्वत: 40 वर्षे पत्रकार म्हणून काम केले आहे. या प्रकरणी लक्ष्मी यांनी माफीनामा स्वीकार केला असला तरी बनवारीलाल पुरोहित यांनी त्या कृतीमागे मांडलेला तर्क अमान्य केला आहे.
परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी मदुराई कामराज विद्यापीठातील वरिष्ठांशी लैंगिक संबंध ठेवावे लागतील, अशी ‘ऑफर’ विरुधुनगर महाविद्यालयाच्या सहाय्यक प्राध्यापिका निर्मला देवी यांनी चार विद्यार्थिनींना दिली होती. याबद्दलची ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं आणि याप्रकरणाचा संबंध थेट राज्यपालांशी असल्यानं तामिळनाडूत एकच खळबळ उडाली. त्यामुळेच याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेतली होती. मात्र या परिषदेत त्यांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला. त्यामुळे पुरोहित पुन्हा एकदा वादात सापडले.
सेक्स फॉर डिग्री प्रकरणाशी माझा कोणताही संबंध नाही, असा दावा राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी पत्रकार परिषदेत केला. राज भवनात ही पत्रकार परिषद झाली. मात्र याठिकाणी राज्यपालांनी एका महिला पत्रकाराला तिच्या संमतीविना स्पर्श केला. यानंतर महिला पत्रकाराने ट्विट करत याबद्दल संताप व्यक्त केला. ‘पत्रकार परिषद संपताना मी तामिळनाडूच्या राज्यपालांना प्रश्न विचारला. मात्र उत्तर देण्याऐवजी त्यांनी माझ्या संमतीविना माझ्या गालाला स्पर्श केला,’ असं महिला पत्रकारानं ट्विटमध्ये म्हटले होते.