व्यथा एका ज्येष्ठ पत्रकाराची ( भाग पाचवा )
पुन्हा तेच आणि तेच कारण..
देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशी म्हणजे 15 ऑगस्ट 1947 रोजी सुभाष पाटील यांचा जन्म झाला.ते आज 74 वर्षांचे आहेत.ते हाडाचे पत्रकार तर आहेतच त्याच बरोबर ते उत्तम साहित्यिक आणि कवी देखील आहेत.पत्रकारिता करतानाच त्यांची 9 पुस्तकं प्रसिध्द झाली.. काही चित्रपटासाठी गीत लेखन देखील केलय.गेली तीस वर्षे अधिस्वीकृतीधारक असलेले सुभाष पाटील राज्य सरकारच्या तेव्हाच्या विकास वार्ता पुरस्काराबरोबरच विविध पुरस्काराने सन्मानित झालेले आहेत.ऐन उमेदीच्या काळात त्यांना मोठा अपघात झाला. त्यात त्यांचा हात आणि पाय कायमचा अधू झाला.ते 75 टक्के अपंग आहेत.अपघात झाला तेव्हा त्यांची सारी पुंजी दवाखान्यावर खर्च झाली.तरीही त्यांनी पत्रकारिता सोडली नाही.लेखनही सोडलं नाही.लोकमत,सकाळ,आपला महाराष्ट्र आणि तत्सम वर्तमानपत्रांसाठी ते लिखाण करीत राहिले आणि आपला महाराष्ट्र आणि जनशक्तीसाठी बातमीदारी देखील करीत राहिले.त्यामुळे वेळोवेळी त्यांच्या अधिस्वीकृतीचे नूतनीकरण केले गेले.शंकरराव चव्हाण आरोग्य योजनेचा लाभ देखील त्यांना मिळाला..हा लाभ घेणारे कदाचित ते पहिले पत्रकार असतील.मात्र आता पेन्शन द्यायची वेळ आली तेव्हा त्यांना सागितलं जातंय की,तुमची पत्रकारिता केवळ 25 वर्षांचीच आहे.अधिकारी सांगतात ते खरं असेल तर मग सुभाष पाटील यांच्याकडे जे अधिस्वीकृतीपत्र आहे ते बोगस आहे काय ? ..बोगस असेल तर त्यांच्यावर लगेच कारवाई करा अन ते खरे असेल तर त्यांना जास्त न छळता पेन्शन सुरू करा..यापुर्वीच्या पत्रकारांप्रमाणेच आयुष्यभर लेखन करून गुजराण करणार्या सुभाष पाटील यांच्याकडे आज उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही..’पेन्शन सुरू झाली तर आम्ही आमचे उर्वरित आयुष्य सुखानं जगू शकू’ असं सुभाष पाटलांचं म्हणणं आहे..
धुळ्यात 6 जानेवारीला 13 पत्रकार उपोषणास बसले होते.सर्वांची व्यथा सारखीच.उपोषण झाले ..दखल मात्र कोणीच घेतली नाही.’काय केलं म्हणजे सरकार आमचा हक्क आम्हाला देईल’? हा सुभाष पाटील यांचा सवाल मनाला अस्वस्थ करून गेला.ज्या पत्रकारांनी आयुष्याची सत्तरी पार केली आहे त्यांची अशी छळवणूक करून अधिकार्यांना काय साधायचं आहे ते समजत नाही.चुकीच्या लोकांची शिफारस आम्हीच करणार नाही.उलटपक्षी ज्या चुकीच्या लोकांनी अधिकार्यांशी संगनमत करून पेन्शन लाटली आहे,अशा सर्वांची पेन्शन रद्द करून दिलेली रक्कम त्यांच्याकडून वसूल करावी आणि गरजू आणि पात्र पत्रकारांना पेन्शन सुरू करावी अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे. (क्रमशः) .
ReplyForward |