विद्यापीठाचे वावडे क? 

0
1007

80च्या दशकात कोकणात शिक्षणाच्या बाबतीत साराच आनंदी आनंद होता.अनेक शहरात कला वाणिज्य विषय शिकविणारी कॉलेजेसही नव्हती तर मेडिकल,इंजिनिअरिंगसारख्या उच्च शिक्षणाच्या सुविधांचा प्रश्नच नव्हता. कोकणात दापोलीला सुरू झालेल्या कृषी विद्यापीठाचा ( कृषी विद्यापीठ 18 मे 1972 रोजी सुरू झाले होते ) अपवाद वगळता शिक्षणाच्या बाबतीत कोकण फारच मागे होता. मुलांना इंजिनिअरिंग किंवा मेडिकलसाठी पुण्या-मुंबईचा रस्ता पकडावा लागायचा.अनेकांकडे गुणवत्ता असतानाही आर्थिक स्थिती चांगली नसल्यान उच्च शिक्षण घेणं शक्य नव्हतं.बॅऱिस्ट ए.आर.अंतुले जमुख्यमंत्री झाल्यानंतर ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली आणि लोणेरे येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर याच्यानावाने तंत्रशास्त्र विद्यापीठ सुरू कऱण्याचा निर्णय त्यांनी घेतला.त्यानुसार 1989 मध्ये हे विद्यापीठ सुरूही झाले.हे विद्यापीठ सुरू करतानाच कल्पना अशी होती की,राज्यातील सारी अभियांत्रिकी महाविद्यालय या विद्यापीठाच्या छत्राखाली एकत्र आणायची.त्यासाठी सुसज्ज इमारती बांधण्यात आल्या आणि सव्वापाचशे एकरचा नयनरम्य परिसरही  निवडला गेला.मुंबई-गोवा महामार्गापासून दोन-तीन किलो मिटर अंतरावर , हे विद्यापीठ सुरू झाले.मात्र दुदैर्वानं या विद्यापीठाची आरंभापासूनच उपेक्षा झाली.विद्यापीठाचं महत्व ,पत,आणि शैक्षणिक प्रतिष्ठा वाढणार नाही याचीही काळजी सर्वच पातळ्यांवर  घेतली गेली.नंतर पुरेसा निधीही दिला जाईनासा झाला.आर्थिक संकटात आलेले हे विद्यापीठ साऱ्याच बाबतीत मग मागे पडले.मुख्य शहरापासून थोडं दूर अंतरावर असल्यानं चांगली शिक्षक वर्गही विद्यापीठाला उपलब्ध होईनासा झाला.त्यातून हे विद्यापीठ अडगळीत पडल्यासारखे झाले.तरीही विद्यापीठ सुरू होते.अभियांत्रिकीचे सात विषय येथे शिकविले जात होते.पदवी आणि पदव्युत्तर शिक्षणाचीही व्यवस्था येथे होती आणि आहे.गेल्या पंचवीस वर्षात याचा फायदा कोकणातील अक्षरशः हजारो मुलांना झाला आहे.जे स्वप्नातही इंजिनिअर होणे शक्य नव्हते अशी असंख्य गरीब मुलं डॉ.बाबासाहेब आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठामुळं इंजिनिअऱ झाली.त्यामुळं अनेकांसाठी हे विद्यापीठ आपुलकीचा, भावनेचा विषय बनलेले आहे.

अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले तेव्हा अभियांत्रिकी विद्यापीठ औरंगाबादला सुरू कऱण्याची मागणी पुढं आली.अशोकरावांनीही त्यासाठी अनुकुलता दाखविली.मात्र राज्यात लोणेरेत अभियांत्रिकी विद्यापीठ असताना, त्यावर सरकारनं आतापर्यत कोट्यवधी रूपये खर्च केलेले असताना नवे विद्यापीठ सुरू करून सरकार पैश्याची उधळपट्टी का करतंय असा सुर व्यक्त होऊ लागला.त्यावरून मोठा वादही झाला.पृथ्वीराज चव्हाण मुख्यमत्री झाल्यानंतर आणखी एक अभियांत्रिकी विद्यापीठ सुरू कऱण्याचा विषय मागे पडला आणि राज्यातील  सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयं लोणेरे विद्यापीठाशी जोडण्याचा निर्णय घेतला गेला.तशी सक्ती महाविद्यालयांना करण्यात आली होती.मात्र यामध्ये एक मेख अशी मारून ठेवली होती की,ही सक्ती नव्या महाविद्यालयांसाठीच असेल जुन्या महाविद्यालायंाना ही सक्ती असणार नाही.

मात्र ही पळवाट आता बंद कऱण्याची भूमिका घेतली जात असताना पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी जोडल्या गेलेल्या काही बडया शिक्षण संस्थाचालकांनी लोणेरे येथील आंबेडकर अभियांत्रिकी विद्यापीठाला जोडण्यास पुन्हा विरोध केला आहे.त्यासाठी जी कारणं दिली आहेत ती हास्यास्पद आहेत.पायाभूत सुविधा नाहीत हे एक कारण आहे.गोंधळ उडेल हे दुसरं कारण,पारंपारिक विद्यापीठाचं आर्थिक नुकसान होईल हे तिसरं कारण.

मुळातच ही कारणं तकलादू आणि वास्तवाच्या निकषावर न टिकणारी आहेत.सुविधांचा अभाव हे कारण पटण्यासारखं नाही.गेल्यावर्षी सरकारनं काही नवी महाविद्यालंय जोडण्याचा निर्णय़ घेतल्यानंतर 15 कोटींचं अनुदान विद्यापीठाला दिलं होतं.त्यातून अनेक गोष्टींची सोय झालेली आहे.स्टाफ इमारती नव्यानं उभ्या राहिल्या आहेत.अन्य विद्यापीठात ज्या गोष्टी आहेत त्या इथं आहेतच आहेत.गोंधळाचं म्हणाल तर असा गोंधळ कोणत्या विद्यापीठात नाही.पुणे विद्यापीठानं एमबीएची सीइटी घेतली त्यातही गोंधळ झालेला आहे.अभियांत्रिकीचे निकाल वेळेवर न लागणे,निकालात गोंधळ हे पुणे विद्यापीठाचं खास वैशिष्टय झालेलं आहे.अशा स्थितीत गोंधळ हा मुद्दाही तकलादू ठरतो.पुणे विद्यापीठाचं आर्थिक नुकसान होणार असेल तर ते भरून देण्याची मागणी योग्य ठरू शकते पण तसे न करता लोणेरे विद्यापीठास जोडायलाच विरोध करायचा हे योग्य नाही. बरं हा विरोध नागपूरच्या,नांदेडच्या लोकांनी केला तर आपण समजू शकतो पण विरोध कोण करतंय तर लोणेरे पासून केवळ शंभर-सव्वाशे  किलो मिटर अतंरावर असलेले पुणेकर शिक्षण संस्थाचालक. केवळ सबबी सागून पळ काढण्याचा त्यांचा हा प्रय़त्न आहे तो सरकारनं हाणून पाडला पाहिजे.

कोकणाकडं बघण्याचा एक खास दृष्टीकोन आहे.कोकणातील कोणतेच प्रश्न सोडवायचे नाहीत ही देखील खास मानसिकता आहे.सर्व रस्ते झाले तरी मुंबई-गोवा हा महामार्ग चौपदरी होत नसेल तर कोकणाचा व्देष हीच त्यामागची मानसिकता असू शकते .लोणेरे येथील आंबेडकर विद्यापीठाचा असा तिरस्कार करण्यामागंही कोकणाबद्दलचा हाच नकारात्मक दृष्टीकोन कारणीभूत आहे.या विरोधात कोकणातील लोकप्रतिनिधींनी संघटीतपणे आवाज उठविण्याची गरज असताना तसे होताना दिसत नाही.त्यामुळं कोकणाचा अनुशेष कधी भरून येईल असे वाटतच नाही.कोकणात उद्योग आले.त्यात काम करणारे मात्र सारेच बाहेरचे.कारण आधुनिक उद्योगांसाठी लागणारी मनुष्यबळ कोकणात तयार केलं गेलंच नाही.त्यामुळं स्थानिक तरूण शिपाई,माळी,छोटे-मोठे ठेकेदार यावरच समाधान मानताना दिसतात.ही स्थिती बदलता कामाच नये,कोकणाचा शैक्षणिक विकासही होता कामा नये असाच दृष्टीकोन लोणेरे विद्यापीठाची उपेक्षा कऱण्यामागे आहे तो संतापजनक नक्कीच आहे.कोकणी माणसंानंच याविरोधातआवाज उठविला पाहिजे.( एस.एम,)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here