पुन्हा दोन दिवस चर्चा होईल,आरोप होतील,सारे सोपस्कार पार पडतील..मग कसं शांत शांत होईल..निसर्गाला दोषी धरले जाईल .खरे गुन्हेगार नामानिराळे राहतील.नेहमीच होतं हे..यावेळेसही असंच होणार आहे.अकरा जणांचे बळी गेले,कित्येकांचे संसार रस्त्यावर आले.स्वतःला शहराचे कारभारी समजणार्‍यांना यांचं काहीच वाटत नाही.काही दिवसांपुर्वी एक भिंत कोसळून असेच मृत्यूनं तांडव केलं होतं.दोन दिवस चर्चा झाली.पुढं त्या बिल्डरचं काय झालं ? कोणालाच याद नाही.यावेळंसही नवं काही घडेल असं नाही.’पन्नास वर्षात झाला नाही एवढा पाऊस झाला.आपत्तीचं कारण ते आहे’ असं पोपट बोलायला लागलेत.पावसानं किती पडायचं,हे काय या पोपटांना विचारून त्यानं ठऱवायला हवं.? .निसर्ग आपल्या पध्दतीनं चालत असतो.दोष निसर्गाला कसा देता येईल? आपणच निसर्गचक्र अडविण्याचा प्रयत्न करतो आहोत.त्याचं दुष्पपरिणामयत हे..पुणे शहरातून वाहणारे नाले अडविले गेले.दोन्ही बाजुंनी अतिक्रमणं झाली.हे नाले कचर्‍यानं आणि प्लॅस्टिकनं गच्च भरले.पाण्याचा निचरा व्हायला जागाच ठेवली नाही आम्ही..परिणामतः पाणी सैरभैर सुटणार..तसं झालं काल रात्री.याला निसर्ग जबाबदार नाही.बिल्डर्स,अधिकारी आणि पुढारी यांची भ्रष्टयुती जबाबदार आहे.यापैकी कोणालाच काही होणार नाही.सारे सहिसलामत बाहेर येणार..बिचारा निसर्ग उगीच बदनाम होणार..ज्यांचे नुकसान झाले ,त्यांना मदत दिली की,ही सारी धेंडं नामानिराळी होणार..असं कोणालाच का कधी वाटत नाही की,काल रात्री जे पुण्यात घडलं ते भोग पुणेकरांच्या वाटयाला परत येणार नाहीत म्हणून..पुन्हा असं होणार नाही पुण्यात असं आश्‍वासन कोणी देत नाही..वचनही देत नाही..शब्दही नाही..काहीच नाही..पुणेकरांना आता अशा गोष्टींची सवय करावी लागेल हा संदेशच रात्रीच्या घटनेतून मिळाला आहे.पुर्वी अशा घटना मुंबईत घडायच्या,पावसाळ्यात माणसं मरायची.पुणं सुरक्षित होतं.आता पुणेकरांसाठी देखील पाऊस कवितेतल्यासारखा रम्य राहिलेला नाही..तो संकटं घेऊन येणारा ठरतो आहे..पुणे तिथं आता सारचं उणं असं म्हणण्याची वेळ पुण्याच्या सर्वपक्षीय कारभार्‍यांनी पुणेकरांवर आणली हे मात्र नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here