ठाणे जिल्हयाचे विभाजन होऊन पालघर जिल्हा नव्याने अस्तित्वात आला.सारा आदिवासी पट्टा.त्यातच ठाणे जिल्हयातील पत्रकारांचे संघटन विशिष्ट लोकांनी आपल्या हातात ठेवल्याने संघटनात्मक वाढ झालीच नाही. संघटना तर वाढल्या परंतू त्या लेटरपॅड आणि व्हिजिटींग कार्ड छापण्यापुरत्याच मर्यादित राहिल्या.याची खंत सातत्यानं होती.मुबईच्या जवळच्या या टापूत पत्रकारिता तर समृध्द आणि परिपक्व तसेच लोकाभिमुख होती पण संघटन भक्कम नव्हते.त्यासाठी ठाण्यापासून सुरूवात केली.ठाणे जिल्हयातली विस्कटलेली घडी बसविली गेली.संजय पितळे यांच्या नेतृत्वाखाली नव्याने संघटन मजबूत झाले.परिषदेचा पुरस्कार वितऱण समारंभ ज्यांनी अनुभवला त्यांच्या ही गोष्ट लक्षात आली असेल की.ठाण्यात आता बदल झालेला आहे आणि पत्रकार मराठी पत्रकार परिषदेच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकत्र आले आहेत.ठाण्याचा विषय मार्गी लागला होता पण पालघरमध्ये पुढाकार कोणी घेत नव्हतं.परवा अचानक संजय जोशी यांचा फोन आला.त्यांच्याशी फोनवर चर्चा झाली आणि शनिवारी पालघरला जायचं ठरलं.मी,किरण नाईक,कोषाध्यक्ष मिलिद अष्टीवकर आणि कोकण विभागीय सचिव धनश्री पालांडे असे आम्ही सारे मनोर नाक्यावर गेलो.जिल्हयाच्या वेगवेगळ्या भागातून आलेले पन्नास पत्रकार बैठकीस उपस्थित होते.आनंदाची बाब असे की,ही सारी सक्रीय पत्रकारिता करणारी मंडळी होती.त्यात केवळ इतर संघटना निर्माण होतात म्हणून आपण संघटीत झालं पाहिजे असाही कोणाचा दृष्टीकोन नव्हता.मराठी पत्रकार परिषद आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या नेतृत्वाखाली राज्यात पत्रकारांच्या हक्काची जी चळवळ सुरू आहे त्याला बळ आणि पाठिंबा देण्यासाठी आणि स्थानिक पातळीवर लोकहितासाठी एक दबावगट निर्माण करण्याच्या इराध्यानं ही सारी तरूण मंडळी संघटीत व्हायला मागत होती.जे अगोदरपासूनच माझ्या चळवळीशी परिचित होते त्यांना तर मराठी पत्रकार परिषदेची ओळख होतीच.मात्र नव्यांना परिषदेची फारशी माहिती नव्हती.त्यामुळं परिषदेच्या स्थापनेपासून थोडं विस्तारानं मी माहिती दिली.आज परिषद कश्या स्वरूपाचे काम करतेय हे देखील उदाहरणांसह स्पष्ट केलं.पत्रकार आरोग्य सेवा कक्ष या परिषदेच्या उपक्रमाची माहितीही दिली आणि कारभार पारदर्शक कसा चालतो हे सांगताना परिषदेचा मासिक जमा खर्च ऑनलाईन बघायला मिळतो हे ही साईट ओपन करून दाखवून दिलं.त्यासाठी आपण सर्वांनी परिषदेच्या व्यासपीठावर एकत्र यावं असं आवाहनही केलं.त्यानुसार एकमतानं परिषदेची शाखा पालघरमध्ये सुरू करण्याचा निर्णय बैठकीत घेतला गेला.महाराष्ठ्रात अशा पद्दतीनचा पहिला प्रयोग होत आहे.आजपर्यंत जिल्हा पत्रकार संघ हेच परिषदेशी संलग्न असायचे.मात्र यापुढे नवीन ठिकाणी मराठी पत्रकार परिषदेच्या शाखाच सुरू करायचा प्रयत्न केला जाणार आहे.त्यामुळे परिषदेचा ब्रॅन्ड अधिक प्रभावीपणे पत्रकारांसमोर यायला मदत होईल.पालघरपासून ती सुरूवात झाली आहे.काल मराठी पत्रकार परिषद पालघरची नवी कार्यकारिणी देखील अस्तित्वात आली.दीपक मोहिते हे अध्यक्ष,संजीव जोशी कार्याध्यक्ष आणि हर्षल पाटील सरचिटणीस झाले आहेत.ही सारी कमिटमेंट पाळणारी मंडळी आहे.पालघरमधील पत्रकारांचे संघटन मजबूत झालं पाहिजे आणि पत्रकारांचे प्रश्न मार्गी लागले पाहिजेत ही भूमिका घेत सकारात्मक पध्दतीनं काम कऱणारे हे सारे पत्रकार आहेत.अन्य संघटनांशी आमची स्पर्धा नाही,त्यांना विरोधही नाही अशी रास्त भूमिका ही मंडळी घेताना पाहून नक्कीच आनंद वाटला.सर्वांचे प्रश्न एकच असतील.पेन्शन सर्वच पत्रकारांना हवे असेल,हल्लेखोर संघटनात्मक भेद न पाळता हल्ले करीत असतील तर हा या संघटनेचा तो दुसर्या संघटनेचा असा पक्तीभेद करण्याचं कारण नाही अशी समंजस भूमिका पालघर पत्रकारांची होती.ती स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे.पत्रकार संघटना कोणाची खासगी पाापर्टी नाही त्यामुळे दर दोन वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजेत,तरूण पत्रकारांना नेतृत्व करण्याची संधी मिळाली पाहिजे हा संजीव जोशी ,निरज राऊत आणि त्यांच्या सहकार्यांचा दृष्टीकोनही स्वागतार्ह वाटला.थोडक्यात पालघरमध्ये आम्हाला हवे तशी मंडळी परिषदेशी जोडली गेली आहे.याचा नक्कीच आनंद आहे.मराठी पत्रकार परिषद हा राज्यातील पत्रकारांचा परिवार आहे असं आम्ही मानतो.या परिवाराती आणखी एक जिल्हा सहभागी होत आहे.त्याबरोबरच आठ दहा तालुकेही सहभागी होत आहेत.त्यामुळे आता परिषदेबरोबर असलेल्या जिल्हयांची संख्या 35 झाली आणि तालुक्यांची संख्या 350 झाली आहे.मुंबई शाखा देखील लवकरच सुरू होत आहे.मुंबईच्या भोवतीचे रायगड,ठाणे,पुणे,नाशिक,पालघर हे जिल्हे परिषदेचे बालेकिल्ले झाले असल्याने सरकारवर दबाव आणण्यासाठी आणि पत्रकारांचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्याचा नक्कीच उपयोग होणार आहे.मराठी पत्रकार परिषदेच्या कुटुंबात पालघर जिल्हयातील पत्रकारांचे मनापासून स्वागत आहे.(SM )