मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांची एक संघटना असली तरी ती आता पत्रकारांच्या चळवळीत परिवर्तीत झाली आहे.मराठी पत्रकार परिषदेनं गेल्या काही वर्षात पत्रकारांच्या हक्काचे लढे तर उभारलेच पण त्याचबरोबर पत्रकारांना स्वत्वाची जाणीव करून दिली,इतरांसाठी
पोटतिडकीनं लिहिणार्या पत्रकारांना आपल्या हक्कासाठी लढण्याचीही हिंमत दिली,एकीचं महत्व पटवून देत आता राज्यातील एकही पत्रकार एकाकी नाही,आम्ही सारेच एकमेकांच्या पाठिशी आहोत हा नवा विश्वास दिला.,पत्रकारितेत चांगलं काम करणार्यांच्या पाठिवर शाबासकीची थाप मारण्याचे काम तर परिषद करीत आहेच त्याचबरोबर आता सामुहिकरित्या सामाजिक बांधिलकी जपत काम करणार्या पत्रकार संघांच्या कार्यालयालाही जगाच्या वेशीवर आणण्याचं काम परिषद करीत आहे.चौथ्या स्तंभाला खिळखिळं करून टाकण्यासाठी अनेक घटक सातत्यानं प्रयत्न करीत असतात त्यांना वठणीवर आणण्यासाठी ही परिषद कोणाचीही पर्वा न करता लढते आहे.हे सारं करताना परस्पर विश्वास,परस्पर बंधुभावाचं संगोपनही परिषदनं केल्याचं कालच्या पाटणच्या मेळाव्यात दिसून आलं.परिषदेच्या मेळाव्याचं प्रयोजन काय होतं ? असा प्रश्न कोणाला पडण्याचं कारण नाही.कारण परिषदेचा प्रत्येक कार्यक्रम उपस्थितांना नवी प्रेरणा,नवा उत्साह,नवी शक्ती देणारा असतो.पाटणच्या मेळाव्यातूनही याचा प्रत्यय आला.पुरस्कार वितरण हे तर एक निमित्त होतंच पण चळवळ पुढं नेण्यासाठी सातत्यानं एकत्र जमणं,सुसंवाद साधणं,विचारांची देवाण-घेवाण करणं,नव्या कल्पना मांडणं,हे सारं आवश्यक असतं.ते काळच्या पाटण मेळाव्यात घडलं असं आम्हाला वाटतं.
परिषद येत्या 3 डिसेंबर रोजी 80 वर्षांची होत आहे.या 80 वर्षाच्या कालात तालुका अध्यक्षांना एकत्र बोलावून त्यांच्याशी हितगुज करणं,संवाद साधणं,त्यांच्या भावना समजून घेणं असा प्रयोग आणि प्रयत्न यापुर्वी झाला नाही.खरं तर तेव्हा त्याची गरजही नव्हती.कारण प्रत्येक तालुक्यात चार-दोन पत्रकार असायचे आणि ते जिल्हा संघांच्या माध्यमातून परिषदेच्या संपर्कात असायचे.मात्र प्रिन्ट आणि इलेक्टॉनिक मिडियाची व्याप्ती वाढत गेली आणि तालुक्यातील पत्रकारांची संख्याही नजरेत भरावी एवढी वाढली.प्रत्येक तालुक्यात आज पन्नासचयावरती पत्रकार आहेत,काही मोठ्या तालुक्यात ही संख्या शंभरावर आहे.ग्रामीण भागात वास्तव्य करून पत्रकारिता जगणार्या आणि लोकांच्या प्रश्नांची प्रामाणिक सोडवणूक कऱण्याचा प्रयत्न करणार्या या पत्रकारांना चळवळीपासून दूर ठेवणं योग्य नव्हतं.नाही.त्यांच्याशी संवाद साधणं आणि त्यांना चळवळीचं महत्व पटवून देणंही तेवढंच अगत्याचं होतं.ही प्रक्रिया पाटण मेळाव्यापासून सुरू झाली आहे असं आम्हाला वाटतं.तालुक्यांचे जे पदाधिकारी आहेत त्यांचे व्हॉटसअॅप नंबर,आणि इ-मेल आम्ही नोंदवून घेतले आहेत.त्यामुळं आता परिषद ते तालुका संघ यांच्यातील संवादाची प्रक्रिया अधिक सुलभ आणि व्यापक होईल यात शंका नाही.आजपर्यंत परिषद काय करतेय हे तालुका संघांना कळायचं नाही आणि तालुका संघांच्या अडचणी,त्यांचे प्रश्न परिषदेपर्यंत यायचे नाही.त्यामुळं जो विचारांचा,परस्पर विश्वासाचा पूल तयार व्हायला हवा होता तो होत नव्हता..ते दिवस आता इतिहास जमा झाले आहेत असं म्हणायला हरकत नाही.सारी मांडणी आता नव्यानं करायची आहे.त्यामध्ये शेवटच्या तालुक्यातील पत्रकारही परिषदेशी आणि पर्यायानं पत्रकार चळवळीशी जोडला जाईल याची काळजी घेतली जाणार आहे.आपण सारे एकाच कुटुंबाचे घटक आहोत मात्र पाटणच्या मेळाव्यानं आपल्यातलं हे नातं अधिक घट्ट केलं आहे असं ठामपणे म्हणता येईल.त्या अर्थानं पाटणचा मेळावा ऐतिहासिक, परिषदेच्या चळवळीला वेगळी दिशा देणारा ठरला यात शंकाच नाही.
एक महत्वाचा निर्णय आपण पाटणला घेतला आहे.पोर्टल,युट्यूब चॅनल्स,वेबसाईटचा हा जमाना आहे.पुढच्या काळात हाच मिडिया असणार आहे.वार्याच्या बदलाची दिशा ओळखून मराठी पत्रकार परिषदेने ऑनलाईन मिडियात कार्यरत असलेल्या पत्रकारांनाही आपल्याबरोबर घेण्याची भूमिका स्वीकारली आहे.त्यामुळंच ऑनलाईन मिडियाचा एक सेल आपण लवकरच स्थापन करतो आहोत.त्यांचे प्रश्न,त्यांच्या अडचणी या नव्या व्यासपीठावरून सोडविण्याचा प्रयत्न पुढील काळात परिषद करणार आहे.आपले जे प्रश्न आहेत त्यासाठीची लढाई आता अधिक व्यापक आणि रस्त्यावर उतरून करावी लागेल असं दिसतंय कारण पत्रकारांच्या या चळवळीकडं सरकार हेतूतः दुर्लक्ष करतंय असं म्हणावं लागेलं.त्यामुळंच आश्वासनंही देऊनही पत्रकारांचे प्रश्न सोडविले जात नाहीत.असं दिसतंय की,पत्रकारांची मोठ्या कष्टानं उभी राहिलेली ही चळवळ मोडून काढण्यासाठी काही शक्ती सक्रीय झालेल्या आहेत.त्याासाठी आपल्यामधीलच काहींचा वापर केला जात आहे.मराठी पत्रकार परिषदेला हे सारं नवं नसलं तरी सर्वांनाच सर्व पातळ्यांवर दक्ष राहावं लागेल.प्रस्थापित आणि व्यवस्थेच्या विरोधात केलेलं भाष्य कोणालाच चालत नाही.आपण आपल्या हक्कासाठी रोखठोक व्यवस्थेलाच आव्हान देत आहोत.अशा स्थितीत व्यवस्था आणि प्रस्थापित गप्प बसतील अशा भ्रमात राहण्यातही अर्थ नाही.ते चळवळीचं नुकसान करण्याचा प्रयत्न करतीलच ..म्हणूनच आपल्याला सावध राहावं लागेल.महाराष्ट्रातील तमाम पत्रकारांची निष्ठा,विश्वास परिषदेवर आहेच त्यामुळं अशी कोणतीही मात्र चालणार नाही हे उघडच आहेत.कारण विरोधकांनी एकच लक्षात ठेवावं..महाराष्ट्रातील पत्रकार परिषदेला आपली मातृसंस्था..आई मानतात..आईच्या विरोधातले कोणतेही कट-कारस्थान राज्यातील पत्रकार खपवून घेणार नाहीत हे संबंधितांनी लक्षात ठेवावं.
पाटण तालुका पत्रकार संघ आणि साताारा जिल्हा मराठी पत्रकार संघ याचे आम्ही आभारी आहोत.हा मेळावा यशस्वी करून दाखवत या दोन्ही संघाने पत्रकारांची ही चळवळ पुढे नेण्यासाठी मोलाचं योगदान दिलं आहे.पाटण आणि सातारकरांचे परिषद कायम ऋुणी असेल.मेळाव्यास उपस्थित सर्वांना धन्यवाद..परिषदेनं हाक द्यावी आणि आपण भरल्या पावसातही उपस्थित राहावं हे पुन्हा एकदा आपण सर्वांनी दाखवून दिलंत.
एस.एम.देशमुख