पाटण दिनांक 20 ( प्रतिनिधी ) सातारा जिल्हयातील पाटण येथे येत्या रविवारी होणार्या मराठी पत्रकार परिषदेच्या तालुका अध्यक्षांचा मेळावा आणि पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी झाली असून मेळावा यशस्वी करण्यासाठी पाटण तालुका पत्रकार संघ आणि सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहेत.
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,विश्वस्त किरण नाईक,कोषाध्यक्ष शरद पाबळे,सुनिल वाळुंज,सातारा जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिष पाटणे,कार्याध्यक्ष शरद काटकर,सरचिटणीस दीपक प्रभावळकर यांनी आज पाटण येथे जाऊन स्थानिक पदाधिकाऱी आणि इतरांशी चर्चा करून तयारीची माहिती घेतली.पाटणनजिक म्हावसा नाका येथील मल्टीपर्पज हॉलमध्ये मेळावा संपन्न होत आहे.तेथे एक हजार पत्रकार बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येत आहे.भव्य-दिव्य असा हॉल असून तेथेच 23 तारखेला रात्री येणार्या पत्रकारांची निवास व्यवस्था करण्यात आली आहे.23 तारखेला येणार्या परिषदेच्या पदाधिकार्यांची व्यवस्थाही तेथेच करण्यात आली आहे.नास्ता आणि भोजन व्यवस्था देखील हॉलमध्येच असल्याने पत्रकारांना कोणतीच अडचण येणार नाही.हॉल परिसरात 200च्यावर गाडया बसू शकतील एवढी भव्य पार्किंग व्यवस्था आहे.
विदर्भ-मराठवाड्यातून 23 च्या पहाटे रेल्वेने अनेक पत्रकार येत आहेत.कराड येथे उतरणार्या पत्रकारांसाठी पहाटे 2 पासून कराड रेल्वे स्थानक ते पाटण या दरम्यान वाहतूक व्यवस्था करण्यात आली आहे.ही व्यवस्था सकाळी 6 वाजेपर्यंत असणार आहे.जे पत्रकार सकाळी येतील त्यांची फ्रेश होण्याची व्यवस्थाही हॉलमध्येच केली गेली आहे.साधारणतः 700 पत्रकार मेळाव्यास येतील असा अंदाज करून तयारी करण्यात आली आहे.
सकाळी नास्त्याची व्यवस्था असून दुपारी उद्दघाटनाचे सत्र संपल्यानंतर भोजनची व्यवस्था केली गेली आहे.बुफे पध्दतीची ही व्यवस्था असणार आहे.
येणार्या पत्रकारांनी प्रत्येकी शंभर रूपये भरून नोंदणी कक्षात आपली नोंदणी कराव लागेल.तेथे पत्रकारांना फोल्डर आणि जेवणाचे कुपन दिले जाईल.हे कुपण असणारांनासाठीच भोजन दिले जाईल याची नोंद घ्यावी.दुपारी 4.30 वाजता कार्यक्रम संपावा असे नियोजन आहे.त्यामुळं 24 तारखेची रात्रीची निवास किंवा भोजनाची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही याची नोंद पत्रकारांनी घ्यावी.सिक्कीमचे राज्यपाल महामहिम डॉ.श्रीनिवास पाटील,अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यासह नियोजित सर्व पाहुणे कार्यक्रमास उपस्थित राहतील.सर्व कार्यक्रम वेळेत सुरू होणार असल्याची माहिती पाटण तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर मोहिते यांनी दिली आहे.आदर्श तालुका आणि जिल्हा पत्रकार संघाना दिल्या जाणार्या पुरस्कारांचे वितरण सकाळच्या सत्रात राज्यपाल महोदयांच्या हस्तेच केले जाणार असून बिहार प्रेस बिलाच्या विरोधात तुरूंगवास भोगलेल्या परिषदेच्या शिलेदारांचा सन्मान समारोप समारंभात होणार आहे.