पाकिस्तानात पत्रकारावर हल्ला
जगातील सर्वात मोठा लोकशाही देश असा टेंभा मिरविणार्या भारतात जिथं मिडियाकर्मी सुरक्षित नाहीत तिथं हुकुमशाही पाकिस्तामध्ये माध्यमांची अवस्था काय असेल याची कल्पना केलेली बरी.भारताप्रमाणेच खोटे गुन्हे दाखल करून पत्रकारांना अटक करणे ,पत्रकारावर हल्ले करणे अशा घटना पाकिस्तानमध्ये सर्रास घडताहेत.कालच एका पत्रकारावर हल्ला झाला आहे.म्हणजे तिकडं पत्रकारांना बुरे दिन आहेत.
पाकिस्तानची राजधानी असलेल्या इस्लामाबादमध्ये सहा अज्ञात हल्लेखोरांनी ‘पाकिस्तान डेली न्यूज’चे वरिष्ठ पत्रकार अहमद नुरानी यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्लेखोरांनी नुरानी यांच्यावर चाकूने वार केले तसेच डोक्याला लोखंडी रॉडने मारले. गंभीर जखमी झालेल्या नुरानी यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नुरानी त्यांच्या कारच्या दिशेने जात होते त्यावेळी दोन-तीन बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी त्यांची वाट अडवली आणि हल्ला केला. हल्लेखोरांनी नुरानी यांच्या कारच्या चालकावरही हल्ला केला. सध्या जखमी असलेल्या पत्रकार अहमद नुरानी आणि त्यांच्या चालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
‘पनामा पेपर्स’ प्रकरणामुळे पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ आणि त्यांचे कुटुंब अडचणीत सापडले आहे. याच प्रकरणाचे वार्तांकन नुरानी करत होते.