मराठी पत्रकार परिषदेच्या 3 डिसेंबर रोजी होणार्या पुरस्कार वितरण कार्यक्रमास मोडता घालण्यासाठीच माहिती आणि जनसंपर्क विभागातील काही कारस्थानी अधिकार्यांनी 1 डिसेंबर रोजी सरकारी पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला असल्याचा आरोप मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने कऱण्यात आला आहे.या संबंधीच्या तीव्र भावना व्यक्त करणारे पत्र आज मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
3 डिसेंबर रोजी मराठी पत्रकार परिषदेचा ७७ वा वर्धापन दिन आहे.या दिनाचे औचित्या साधून मराठी पत्रकार परिषदेने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम मुंबईत घेण्याचे नक्की केले होते.पुरस्कारांची घोषणा करतानाच एक महिन्यापुर्वीच कार्यक्रमाची तारीख आणि स्थळही निश्चित कऱण्यात आलं होतं..त्यानुसार हॉलचंही बुकींग करण्यात आलं होतं.मुख्यमंत्र्याशी संपर्क साधून त्याना कार्यक्रमास येण्याची विनंती केली होती आणि ती त्यांनी मान्यही केली होती.हे माहिती आणि जनसंपर्क विभागातील प्रत्येकाला माहिती होते.असे असतानाही केवळ मराठी पत्रकार परिषदेबद्दल वाटणार्या असुयेतून माहिती विभागातील काही अधिकार्यांनी जाणीवपूर्वक सरकारी पुरस्कारांची तारीख 1 डिसेंबर नक्की केली आहे.3 डिसेंबर रोजीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री पत्रकार संरक्षण कायदा आणि पेन्शन संदर्भात काही घोषणा कऱण्याची शक्यता होती.त्यामुळेच त्या अगोदरच कार्यक्रमाचे आयोजन करून परिषदेच्या कार्यक्रमाचं महत्व कमी करण्याचा प्रयत्न केला गेला आहे.3 डिसेंबर रोजी परिषदेच्यावतीने दिनू रणदिवे आणि अन्य अकरा ज्येष्ठ,श्रेष्ठ पत्रकारांचा सत्कार करण्यात येणार होता.हा सर्व प्रकार मुख्यमंत्र्याच्या कानी घालण्यात आला असून माहिती विभागातील काही पाताळयंत्री अधिकार्र्यांना आवरले नाही तर त्याचा सरकारी प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो ही गोष्टही पत्राच्या माध्यमातून मुख्यमत्र्यांच्या कानावर घातली गेली आहे.
दरम्यान या सार्या घडामोडी लक्षात घेऊन मराठी पत्रकार परिषदेने पुरस्कार वितऱणाचा आपला कार्यक्रम लांबणीवर टाकला असून पुरस्कार वितरणाची नवीन तारीख आणि स्थळ लवकरच जाहीर करण्यात येईल अशी माहिती एस.एम.देशमुख ,किऱण नाईक,परिषदेचे कार्याध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,सरचिटणीस यशवंत पवार,कोषाध्यक्ष मिलिंद अष्टीवकर यांनी दिली आहे.–