पनवेलचा विजय फक्त ठाकूर पिता-पूत्रांचाच

0
1651

रायगड जिल्हयातील पहिली आणि एकमेव महापालिका असलेल्या पनवेल महापालिकेवर भाजपचा ध्वज फडकला आहे.पनवेलमध्ये भाजपचा जो विजय झाला आहे तो अनपेक्षित म्हणता येणार नाही.कारण पनवेल महापालिका होण्याअगोदर म्हणजे पनवेल नगरपालिका असताना ठाकूर पिता-पूत्रांच्या रूपाने तेथे अगोदर कॉग्रेसची आणि नंतर भाजपचीच सत्ता होती.याचा अर्थ जेव्हा रामशेठ ठाकूर आणि आ.प्रशांत ठाकूर हे पिता पूत्र कॉग्रेसमध्ये होते तेव्हा सत्ता कॉग्रेसची होती,आज ते भाजपमध्ये आहेत म्हणून सत्ता भाजपची आहे.सांगायचा मुद्दा असाय की,भाजपचा हा जो विजय झालेला आहे तो भाजपचा नसून रामशेठ ठाकूर यांचा आहे हे नकारता येणार नहीं रामशेठ ठाकूर हे मोठे ठेकेदार आहेत.साक्षात लक्ष्मी त्यांच्या घरी पाणी भरते.लक्ष्मी दर्शन करवून कोणतेही काम फत्ते होऊ शकते यावर त्यांचा ठाम विश्‍वास आहे.या लक्ष्मीच्या बळावरच ते पनवेलवर हुकमत गाजवत असतात.ते नसीबवान असे की ते राजकारणात आले आणि थेट खासदार झाले.शेकापच्या मार्गानं त्याचं राजकारण सुरू झालं.दोन वेळा तेथे ते खासदार झाले.नतर त्यांना तिथलं राजकारण मानवलं नाही म्हणा किंवा व्यावसायिक अडचणी येऊ लागल्या म्हणा त्यांनी अलगत त्यावेळचा सत्ताधारी पक्ष असलेल्या कॉग्रेसमध्ये प्रवेश केला.पक्षात असताना त्यानी थेट राहूल गांधींपर्यंत संपर्क वाढविला.राहूल ब्रिगेडचे म्हणून जे काही तरूण चेहरे तेव्हा महाराष्ट्रात होते त्यात आ.प्रशांत ठाकूर यांचाही समावेश होता.ठाकूर पिता-पुत्रांना राजकारणातील बदलांची चाहूल ओगदरच लागते असं म्हणतात.कॉगे्रसला बुरे दिन येऊ लागले आहेत आपल्याला अच्छे दिन पहायचे असतील तर भाजपला जवळ करा असा विचार करून त्यांनी  निवडणुकांच्या तोंडावर भाजपमध्ये उडी घेतली.त्यांच्याबरोबर पनवेलमधील सारी कॉग्रेस भाजपत गेली.रायगडमध्ये अगोदरच कॉ्रग्रेसची वाताहत झाली होती.उरली सुरली कॉग्रेस रामशेठ ठाकूर यांनी भाजपत नेली.त्यामुळं कॉग्रेस जवळपास अस्तित्वहीन झाली.रामशेठ ठाकूर भाजपमध्ये येण्यापुर्वी जिल्हयात भाजपचे नामोनिशान नव्हतं.उरणमध्ये नगरपालिकेत काही काळ भाजपचा नगराध्यक्ष होता हे जरी खरं असलं तरी ते तेवढंच.अन्यत्र भाजप नावालाही  नव्हता.अलिबाग,रोहा,महाड किंवा अन्य नगरपालिका असतील किंवा जिल्हा परिषद असेल किंवा अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमळ कुठे दिसत नव्हतं.मात्र रामशेठ ठाकूर भाजपमध्ये गेले आणि  रायगड जिल्हयाच्या राजकारणात भाजप हा दखलपात्र पक्ष झाला.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकातही भाजपला पाच-सहा जागा मिळाल्या आहेत.त्यामुळं जिल्हयात भाजपचा बोलबाला सुरू झाला.या पार्श्‍वभूमीवर पनवेलमध्ये काय घडते याकडं जिल्हयाचं लक्ष लागलं होतं.रामशेठ ठाकूर यांच्यासाठी ही निवडणूक केवळ प्रतिष्ठेचीच नव्हती तर अस्तित्वाचीही होती.कारण पनवेल महापालिकेत काय होतंय यावर पनवेल आणि उरणच्या विधानसभेचं भवितव्य अवलंबून होतं.त्यामुळं रामशेठ ठाकूर यांनी सर्वशक्तीपणाला लावून ही निवडणूक लढविली। ती त्यांनी मोठया कष्टानं मिळविली याबद्दल दुमत असू शकत नाही.विजयाबद्दल ठाकूर पिता-पूत्र अभिनंदनास पात्र आहेत.कारण एकीकडं महाआघाडी आणि त्यांचा आक्रमक प्रचार आणि दुसरीकडे शिवसेनाही साथीला नाही अशा स्थितीत ठाकूर पिता-पूत्र एकाकी लढत होते हे सर्वांनीच पाहिले आहे.

रायगडमध्ये शेकाप सध्या अस्तित्वासाठी धडपडतो आहे.त्यासाठी अगम्य वाटणार्‍या राजकीय तडजोडी आ.जयंत पाटील यांना कराव्या लागत आहेत.सुनील तटकरे आणि शेकाप नेते यांचे संबंध जगजाहीर आहेत.रायगड जिल्हा परिषदेच्या राजकारणावरून एकदा सुनील तटकरे यांना आपल्या मंत्रीपदावर पाणी सोडावे लागले होते.त्यानंतरही सुनील तटकरे आणि जयंत पाटील हे दोन्ही नेते परस्परांना पाण्यात पहात होते.मात्र राजकारणात काहीच अशक्य नसते आणि सोय गैरसोय पाहून कोण मित्र कोण शत्रू हे ठरत असते,या तत्वानुसार हे दोन्ही पक्ष केव्हा शत्रूचे मित्र झाले हे त्यांनाही कळले नाही.दोघांनी एकत्र येणे ही दोन्ही पक्षांची राजकीय मजबुरी होती.कारण दक्षिण रायगडमध्ये शिवसेनेने मुसंडी मारली होती आणि उत्तर रायगडमध्ये म्हणजे पनवेल,उरणमध्ये रामशेठ ठाकूर यांनी भाजपच्या रूपानं राष्ट्रवादी -शेकापला नाकीदम आणला होता.शिवाय संपूर्ण रायगडमधील तीनही पक्षांचा जनाधार सातत्यानं घटत चालला होता.ज्यांचे पालक शेकापमध्ये आहेत त्यांची मुलं शिवसेना किंवा भाजपकडं आकृष्ठ होत होती.या सर्वच पक्षाला लागलेली ओहोटी थांबता थांबत नव्हती.अनेक शिलेदार पक्ष सोडून पळते झाले होते.अशा स्थितीत या दोन्ही पक्षांनी नगरपालिका आणि जिल्हा परिषदा एकत्र लढल्या.जिल्हा परिषदेत थोडा फायदा दोन्हीकडं झाला.मात्र नगरपालिकेत फार फायदा झाला नाही.माथेरान नगरपालिका राष्ट्रवादीनं गमविली आणि खुद्द रोह्यातही सुनील तटकरे यांचा उमदेवार एका अपक्षाच्या समोर केवळ सहा मतांनी निवडणून आला.राजकीय बदलाची ही चाहूल दोन्ही नेत्यांना लागल्यानंतर पुर्वीचे सारे वैर विसरत या पक्षांनी दोन्ही बाजुंच्या कार्यकर्त्यांना न आवडणार्‍या राजकीय तडजोडी केल्या.जिल्हा परिषदेत सर्वाधिक जागा शेकापनं जिंकल्यानंतरही केवळ बारा जागा जिंकलेल्या राष्ट्रवादीला जिल्हा परिषद अध्यक्षपद दिलं गेलं.याच्या बदल्यात विधान परिषदेसाठी राष्ट्रवादीने जयंत पाटील यांना मदत करावी असा सौदा ठरल्याचं सांगितलं जातंय.बाळाराम पाटील यांना विधान परिषदेवर पाठविण्यासाठीही काही तडजोडी केल्या गेल्या.पनवेलमध्येही सर्वाधिक जागा शेकापन लढण्यास कॉग्रेस आणि राष्ट्रवादीने संमती दिली ती देखील तडजोडीचाच भाग होती.कॉग्रेसची अडचण अशी होती की,गेल्या पन्नास वर्षांचा त्यांचा शत्रू शेकापच होता.मात्र नव्या बलाढय शत्रूला शह देण्यासाठी ही मंडळी देखील राष्ट्रवादी आणि शेकापच्या कळपात दाखल झाली .कॉग्रेस ,राष्ट्रावादी आणि शेकापवर अशी वेळ का आली हा स्वतंत्रपणे लिहिण्याचा विषय आहे.मात्र आपण एकत्र आलो नाही तर जिल्हयात निभाव लागणार नाही हे ओळखूनच तीनही पक्ष पनवेलमध्ये एकत्र आले.तरीही जे यश त्याना अपेक्षित होतं ते मिळालंच नाही.शेकापला 23 जागा आणि दोन्ही कॉग्रेसला मिळून चार जागा मिळाल्या आहेत.सत्तेपासून हे पक्ष कित्येक मैल दूरवरच उभे राहिले..खरं तर पनवेल हा शेकापचा अलिबागनंतरचा दुसरा बालेकिल्ला .महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर सलग बारा वेळा पनवेल विधानसभेत  शेकाप विजयी झाला होता.असा चमत्कार करणारा केवळ शेकाप हा एकच पक्ष होता.मात्र प्रशांत ठाकूर यांचा उदय झाला आणि शेकापची पनवेलमधील सद्दी संपली.पनवेल प्रशांत ठाकूर यांच्या रूपानं अगोदर कॉग्रेसकडं आणि आता भाजपकडं गेला. पनवेल आज कॉस्मोपॉलिटीयन सिटी म्हणून ओळखले जाते.देशभरातून हजारो लोक पनवेलमध्ये आले आहेत.त्यांना शेकापही माहिती नाही  आणि राष्ट्रवादीही माहिती नाही.त्यामुळं त्यांची मतं मिळणार नाहीत हे शेकापला माहिती होते.त्यामुळं त्यांची सारी मदार जो ग्रामीण भाग पनवेल महापालिकेला जोडला गेला त्यावरच होती.अगोदर ही 30-35 गावं जिल्हा परिषदेत होती आणि ती हमखास शेकापची होती.त्यामुळं या गावांचा महापालिकेत समावेश करू नये म्हणून शेकापनं भरपूर प्रयत्न केले.त्यात त्याना यश आलं नाही.पण  आजचे निकाल पाहिल्यानंतर ही गावं पनवेलमध्ये आली ते बरं झालं असंच त्यांना वाटत असेल .कारण शेकापनं ज्या 23 जागा मिळविल्या आहेत त्यातील बहुतेक जागा या गावांमधील आहेत.ही गावं नसती तर शेकापला आज किती जागा मिळाल्या असत्या सांगता येत नाही.कॉग्रेस आणि राष्ट्रवादीला मिळालेल्या जागांच्या तुलनेत शेकापला मिळालेल्या जागा नक्कीच मोठया असल्याने भविष्यात या दोन्ही पक्षांना आपल्याबरोबर फरफटत नेत राहणार यात शंकाच नाही.

 पनवेलची लढाई ही दिसायला शेकाप-राष्ट्रवादी- कॉग्रेस विरूध्द भाजप अशी होती पत्यक्षात  ती तशी नव्हती.ती महाआघाडी विरूध्द रामशेठ ठाकूर अशीच होती.कारण महाआघाडीच्या नेत्यांनी गद्दार( आमदार जयंत पाटिल यांचा लड़का शब्द )  रामशेठ ठाकूर यांनाच लक्ष्य करीत त्यांच्यावर वार केले .शेकापनं भाजपला टार्गेट केलंच नाही.त्यांचा मारा ठाकूर अ‍ॅन्ड ठाकूर कंपनीवर होता.ठाकूर कंपनी खालसा करा असाच नारा शेकापचे नेते देत होते.भाजपवर हल्ला बोल करण्याऐवजी व्यक्तीगत हल्ले सुरू होते.शेकापकडं कृषीवल आणि कर्नाळा ही दोन मुखपत्रे आहेत तर रामशेठ ठाकूर यांच्याकडं रामप्रहर आहे.पत्रकारिता कशी नसावी यांचे उत्तम नमुने दोन्ही बाजुने या काळात पेश केले गेले.ही पत्रे आणि दोन्हीकडची चॅनल्स किती लोक वाचत आणि बघत असतील माहिती नाही पण शेकाप आणि रामशेठ ठाकूर यांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप करण्यासाठीच या पत्रांचा पुरेपूर वापर केला आहे.या सर्व तंत्रात आज रामशेठ वरचठ ठरले.त्यानी पनवेल महापालिका जिंकली.विवेक पाटील आणि आ. जयंत पाटील यांच्या नाकावर टिच्चून रामशेठ यांनी अनेकदा असे विजय संपादन केले आहेत.पनवेलमध्ये भाजपन  जिंकल्यापेक्षा रामशेठ जिंकले याचं जास्त शल्य विवेक पाटील आणि जयंत पाटील याना आहे.अर्थात रामशेठचे पक्षांतर्गत विरोधकही आहेतच.या विजयाचं शिल्पकार रामशेठ ठाकूर आहेत हे त्याना मान्य नाही.व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो हे सूत्र सांगत पक्ष जिंकल्याचे ढोल पिटले जात आहेत.अभिनंदन कार्यकर्त्याचंच केलं जात आहे,मुख्यमंत्र्यांच केलं जात आहे.रामशेठ ठाकूर यांचं अभिनंदन केल्याचं व्टिट अजून कोणी केल्याचं वाचनात नाही.हे होतच असतं.मात्र कोणी काहीही म्हटलं तरी पनवेलच्या जनतेलाही हे मान्य करावं लागेल की,विजय भाजपचा नसून रामशेठ ठाकूर यांचाच आहे,हे नाकारणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास केल्यासारखं आहे.अन्य पक्षातील मंडळी आपल्याकडे घेऊन भाजप  नेते हा आपलाच विजय समजत असतात। ही त्यांची स्टाइल आहे  काही हरकत नाही पण ते खरं नाही.पनवेलमध्ये तरी हेच दिसले.. उद्या भाजपचे दिवस फिरले आणि हे ठाकूर पिता-पूत्र अन्य पक्षात गेले तर पनवेलमध्ये भाजप नावालाही शिल्लक राहणार नाही हे नक्की.

SMDESHMUKH

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here