4 ऑगस्ट 2010 रोजी पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची स्थापना झाली.या घटनेला पार्श्वभूमी होती ती,अंबाजोगाई येथील पत्रकार दत्ता अंबेकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याची.राज्यातील पत्रकारांवर होणार्या हल्ल्यानं सारेच चिंतातूर होते.हल्ले थांबवायचे तर त्यासाठी राज्यात एक सक्षम आणि पत्रकारांसाठी स्वतंत्र कायदा हवा यावर सर्वांचेच एकमत होते. सर्वांनी एकत्र येऊन सरकारवर दबाव आणणे आवश्यक होते.त्यासाठी विद्यमान पत्रकार संघटनांऐवजी एक स्वतंत्र व्यासपीठ तयार करावे असा निर्णय घेतला गेला. राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांच्या पदाधिकार्यांची एक बैठक 4 ऑगस्ट 2010 रोजी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात झाली.सोळा संघटनांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.सर्व संघटनांनी एकत्र येण्याचा प्रयोग प्रथमच होत असल्यानं या घटनेला चांगली प्रसिध्दी मिळाली.या बैठकीत काही महत्वाचे निर्णय घेतले गेले.
1) पत्रकार संरक्षण कायद्याच्या मागणीसाठी सरकारकडं पाठपुरावा करायचा.
2) त्यासाठी एक व्यासपीठ तयार करायचे
3) पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती असं या नव्या संघटनेचं नाव असावं असंही ठरलं.
4) पदावरून वाद होतात हा अनुभव लक्षात घेऊन समितीत अध्यक्ष,उपाध्यक्ष अशी पदं ठेवायची नाहीत असंही नक्की झाले .निमंत्रक हे एकच पद असावं असं ठरलं
5) एस.एम.देशमुख हे समितीचे निमंत्रक असतील असं एकमतानं ठरलं.
6) समितीच्या खर्चासाठी कोणाकडं निधी मागायचा नाही नाही .समितीतील सर्व संघटनांनी समितीच्या खर्चासाठी प्रत्येकी 2000 रूपये प्रतिवर्षी द्यायचे ( दुदैर्वानं शशिकांत सांडभोर टीव्हीजेयूचे अध्यक्ष असताना त्यांनी दिलेले 2000 रूपये सोडले तर अन्य एकाही संघटनेनं समितीला काही आर्थिक मदत केली नाही.सारा भार मराठी पत्रकार परिषदेला उचलावा लागला.नंतर नंतर तर मुंबई मराठी पत्रकार संघानं बैठकांसाठी जागा उपलब्ध करून द्यायलाही नकार दिला )असंही ठरविलं गेलं होतं.
7)केवळ पत्रकार संरक्षण कायदा ही एकच मागणी घेऊन लढा लढायचा आणि ती मागणी मान्य होताच पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती बरखास्त करायची असंही ठरलं.
पहिल्या बैठकीत ठरल्याप्रमाणे आता पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे.मुंबईत समितीचा एक शेवटचा कार्यक्रम घेऊन ही समिती बरखास्त होईल.
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीची ऐतिहासिक कामगिरी केलं आहे.त्यामुळं अनेकांना असं वाटतं की,पत्रकारांमधील एकजूट कायम ठेवण्यासाठी समिती बरखास्त करू नये.काहींनी असं मत नोंदविलं आहे की,ठरल्याप्रमाणं समिती विसर्जित करावी.
या पार्श्वभूमीवर समिताला गेली सहा वर्षे विविध मार्गानं मदत करणार्या आमच्या पत्रकार मित्रांना काय वाटतं हे जाणून घेणं महत्वाचं आहे.या संदर्भातली आपली मतं नोंदवावीत ही विनंती.