पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याबाबत आपणही चिंतीत असून राज्यात पत्रकार संरक्षण कायदा लागू करण्याबाबत शासनाने विचार करावा, या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांना पत्र लिहणार असल्याचे आश्वासन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी आज दिले.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या एका 15 सदस्यीय शिष्टमंडळाने आज (मंगळवार दि २३) राज्यपालांची राजभवन येथे भेट घेतली, त्याप्रसंगी ते बोलत होते.
महाराष्ट्रात पत्रकारांवर होणाऱ्या हल्ल्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सन 2013 मध्ये राज्यात 71 पत्रकारांवर हल्ले झाले होते, २०१४ मध्ये हा आकडा ८२ पर्यंत वाढला. २०१५ च्या पहिल्या सहा महिन्यातच ४१ पत्रकारांवर हल्ले झाले आहेत, तर दहा वर्षातली ही संख्या ८०० पेक्षा अधिक आहे. १९८५ नंतर राज्यातील १९ पत्रकारांच्या हत्या झालेल्या आहेत तर गेल्या दहा वर्षात राज्यात माध्यमांच्या ४७ कार्यालयांवर हल्ले झाले आहेत. या घटनांतील एकाही आरोपीला शिक्षा झालेली नाही, असे समितीचे निमंत्रक एस् एम् देशमुख यांनीराज्यपालांना सांगितले.
यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष किरण नाईक, प्रफुल्ल मारपकवार, सुभाष शिर्के, प्रसाद काथे, संतोष पवार, अनिकेत जोशी, प्रविण पुरो व इतर पत्रकार उपस्थित होते.