पत्रकार संघाच्या खुर्चीसाठी ठेचण्याची भाषा

0
1025
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उद्या, शनिवारी मतदान होत असून मतदानाला अवघे काही तास शिल्लक असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या वेगवेगळ्या गटांकडून एकमेकाला ठेचण्याची भाषा केली जात असून एरवी राजकारण्यांच्या भ्रष्टाचाराची चर्चा करणाऱ्या सर्वसामान्य पत्रकारांमध्ये आपल्याच सहकाऱ्यांच्या घोटाळ्यांची चर्चा रंगली आहे.
तब्बल ७५ वर्षांची परंपरा लाभलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाला मुंबईतील पत्रसृष्टीत महत्त्वाचे स्थान आहे. आजवर अनेक नामवंत पत्रकारांनी संघाचे अध्यक्षपद भूषवले असून आपापल्या परीने संघाचा नावलौकिक वाढविण्यास मदत केली आहे. मात्र, गेल्या काही वर्षांत संघ हा राजकारणाचा आखाडा बनत चालल्याची खंत सजग पत्रकार व्यक्त करीत आहेत. यंदाची निवडणूकही त्यास अपवाद राहिलेली नाही. पत्रकारांवर होत असलेले हल्ले, वाढत्या ताणतणावामुळं त्यांची होणारी ससेहोलपट, त्यांचे आरोग्य अशा मूलभूत समस्यांची चर्चा करण्याऐवजी भलत्याच मुद्द्यांवरून चिखलफेक सुरू आहे. पत्रकार संघाचे सुशोभिकरण, मुदत ठेवी, संघाच्या प्रमुख सभागृहाच्या नामकरणापासून ते राजकारण्यांकडून मिळालेल्या देणग्यांचे व घोळाचे मुद्देच प्रचारात प्रमुख बनले आहेत. विरोधकांना ‘ठेचून’ काढण्याचे आवाहन करण्यापर्यंत काही उमेदवारांची मजल गेली आहे.

 निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या उमेदवारांनी कसलेल्या राजकारण्यांप्रमाणे ‘दारोदारी’ प्रचार सुरू केला आहे. संघाच्या सदस्यांच्या मेलचे इनबॉक्स आवाहन व विनंतीच्या मेलनी भरून गेले आहेत. मोबाइलवर मेसेजवरून मेसेज आदळत आहेत. याशिवाय, गेल्या पंधरावड्यापासून सदस्यांच्या घरच्या पत्त्यावर पत्रकांचा पाऊस पाडला जात आहे. त्यातून विरोधकांच्या कारभारावर कोरडे ओढले जात आहेत. पत्रकारांच्या या राजकारणाची चर्चा राजकीय व सामाजिक क्षेत्रातही चवीनं चघळली जात आहे.

उमेदवार हायटेक; संघाची साइट जुनाट!
मुंबई मराठी पत्रकार संघाच्या निवडणुकीत उतरलेले उमेदवार व्हॉट्सअॅप, फेसबुकसारख्या सोशल मीडियातून हायटेक प्रचार करत आहेत. प्रचाराचे नवनवे फंडे आजमावले जात आहेत. मात्र, ७५ वर्षांची परंपरा असलेल्या संघाची वेबसाइट आजही जुनाट अवस्थेत आहे. लोकांना अपडेट ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पत्रकारांच्या संघाची वेबसाइट धड अपडेट नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुका होऊन जवळपास वर्ष लोटले तरी मुंबईतील खासदार, आमदारांची यादी अपडेट करण्यात आलेली नाही. धक्कादायक म्हणजे, दिवंगत खासदारांचे नावही वेबसाइटवर खासदार म्हणून झळकते आहे.

प्रेस क्लब पुढं गेला, संघ तिथंच!

पत्रकार संघातील राजकारणाचा मोठा फटका संघाच्या प्रगतीला बसला असल्याचे मत एका ज्येष्ठ पत्रकाराने व्यक्त केले. पत्रकार संघानंतर जवळपास ३० वर्षांनंतर शेजारच्या इमारतीत स्थापन झालेल्या मुंबई प्रेस क्लब या पत्रकारांच्याच संस्थेने मात्र मोठी झेप घेतली आहे. गृह प्रकल्प, बातमी-फोटो फाइल करण्यासाठी हाय-टेक सुविधा, सदस्यांना आरोग्य विमा, पत्रकारांच्या प्रबोधनासाठी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय वक्त्यांना बोलवून विविध विषयांवर सेमिनारचे आयोजन या सारखे उपक्रम राबवून प्रेस क्लबनं पत्रसृष्टीत स्वत:चं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. पत्रकार संघाला यातलं काहीही जमलेलं नाही. अनेक मराठी पत्रकारांचा घरांचा प्रश्न केवळ आश्वासनाच्या पातळीवरच आहे.
समस्यांचा डोंगर
पत्रकार संघाचे सदस्य असलेल्या पत्रकारांच्या संघातील सुविधांविषयी अनेक तक्रारी आहेत. निवडणुकीच्या निमित्तानं काही पत्रकारांशी चर्चा केली असता पुढील समस्या समोर आल्या.
> संघात गेल्यास तिथं बसण्यासाठी हक्काची जागा नाही. त्यामुळं पत्रकार संघाचे अनेक पत्रकार संघात जाण्याऐवजी प्रेस क्बलमध्ये जाऊन बसणं पसंत करतात.
> एखाद्या पत्रकारास संघात जाऊन बातमी लिहायची असेल तर तशी सोय नाही.
> अल्पोपहार किंवा जेवणासाठी कँटिन सुविधेचा अभाव.
> सर्व प्रमुख मराठी वर्तमानपत्रे तसेच वृत्तवाहिन्यांच्या स्वतंत्र वेब आवृत्त्या असतानाही संघाकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी ऑनलाइन पत्रकारांचा विचार केला जात नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here