राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल,
शरद पवारांना भेटणार
मराठी पत्रकार परिषदेच्या श्रध्दांजली सभेत निर्णय
सर्व पत्रकार संघटनांची मुंबईत लवकरच बैठक :एस.एम.देशमुख
मुंबई :कोरोनानं राज्यातील १३५ पत्रकारांचं निधन झाल्यानंतरही राज्य सरकार पत्रकारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याने आपले गाऱ्हाणे घेऊन राज्यातील पत्रकार लवकरच राज्यपाल तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि कॉग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेणार आहेत.. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज ही घोषणा केली..
मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दिवंगत पत्रकारांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ऑनलाईन श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते.. या सभेचा समारोप करताना देशमुख यांनी ही माहिती दिली.. सर्व संघटनांनी एकत्र येऊन सरकारवरचा दबाव वाढविला पाहिजे असा आग्रह सर्वच वक्त्यांनी धरल्यानंतर राज्यातील प्रमुख पत्रकार संघटनांची संयुक्त बैठक लवकरच मुंबईत बोलावण्याचा निर्णयही सभेत घेण्यात आल्याचे एस.एम.देशमुख यांनी जाहीर केले.. सरकार विरोधात न्यायालयात जावे अशा सूचना सातत्यानं केल्या जात आहेत त्याबाबतही वकिलांशी तसेच काही ज्येष्ठ पत्रकारांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल असे देशमुख यांनी स्पष्ट केले..
राज्यातील पत्रकारांचे सातत्यानं बळी जात असताना देखील सरकार पत्रकारांच्या किरकोळ मागण्या देखील मंजूर करीत नाही याबद्दल सर्वच उपस्थित पत्रकारांनी तीव्र संताप व्यक्त करीत सरकारच्या विरोधाविरोधात आक्रमक भूमिका घेण्याचा आग्रह धरला..
टीव्हीजेए चे अध्यक्ष विनोद जगदाळे म्हणाले, फडणवीस सरकारने पत्रकार पेन्शन, पत्रकार संरक्षण कायद्यासारखे काही महत्वाचे निर्णय घेतले मात्र विद्यमान सरकारने आपल्या कार्यकाळात पत्रकारांचा एकही प्रश्न सोडविला नाही हे संतापजनक आहे.. मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष मंदार पारकर म्हणाले, पत्रकारांच्या प्रश्नांवर आड येणारे एक झारीतील शुक़चार्य नाही सारी झारीच शुक्रचार्यांनी भरली आहे.. पत्रकारांनी निधी उभारून गरजू पत्रकारांना मदत करावी अशी सूचना त्यांनी केली.. बीयुजे चे सरचिटणीस इंदरकुमार जैन यांनी बीयुजेच्यावतीने गरजू पत्रकारांना उपचारासाठी तर दिवंगत पत्रकारांच्या नातेवाईकांना मदत दिली जात असल्याचे सांगितले..
पत्रकार अत्यावश्यक सेवेत नाहीत आणि जीवनावश्यक सेवेतही नाहीत.. पत्रकारांना जाणीवपूर्वक टाळलं जात आहे, पत्रकारांच्या प्रश्नांबाबत सरकार उदासिन आणि दिशाहीन असल्याचा आरोप नवशक्तीचे संपादक नरेंद्र कोठेकर यांनी केला.
नवराष्ट्रचे संपादक राजा आदाटे यांनी पत्रकार संघटनांचा एक फ्रन्ट बनवून सरकारवर दबाव आणावा अशी सूचना केली.. पत्रकारांनी एकत्र आलं पाहिजे अशी सूचना करीत जय महाराष्ट्रचे संपादक प्रसाद काथे यांनी बारा मंत्र्यांनी पत्रं लिहिल्यानंतर देखील सरकार जर निर्णय घेत नसेल तर सरकार बहुमताची कदर करीत नाही असे म्हणावे लागेल असा हल्ला केला.. लोकशाही बहुमताचा आदर करणारी हवी अवहेलना करणारी नको असे मत त्यांनी व्यक्त केले . माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर यांनी, पत्रकार संघटनांनी आपापसातील हेवेदावे विसरून एकत्र यावे आणि सरकारवर अवलंबून न राहता स्वतःचे लसीकरण करून घ्यावे अशी सूचना केली.. आजतकचे संपादक साहिल जोशी यांनी पत्रकारांनी एकत्र आले पाहिजे यावर भर दिला.. मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक यांनी सरकार पत्रकारांच्या
प्रश्नांकडे दुर्लक्ष करीत असल्याबद्दल संताप व्यक्त केला तर परिषदेचे विश्वस्त किरण नाईक यांनीही सर्व संघटनांनी एकत्र येत आक्रमक भूमिका घेण्याची गरज विषद केली..
पत्रकार परिषदेचे सरचिटणीस संजीव जोशी यांनी प्रास्ताविक केले तर परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी सूत्रसंचालन केले.. जान्हवी पाटील यांनी आभार मानले.. बैठकीस परिषदेचे पदाधिकारी, उपाध्यक्ष, विभागीय सचिव, जिल्हाध्यक्ष, परिषद प़तिनिधी असे ९० पत्रकार उपस्थित होते.. तब्बल दोन तास चाललेली ही सभा नियोजनानुसार ठीक सहा वाजता सुरू झाली.. ६ वाजून पाच मिनिटांनी सभेत उपस्थित असणारांनी तसेच राज्यातील पत्रकारांनी दोन मिनिटे उभे राहून दिवंगत पत्रकारांना तसेच ज्यांचे कुटुंबिय गेले आहेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली..सभेचे थेट प्रक्षेपण फेसबुकवर केले गेलयाने हजारो पत्रकारांनी सभा पाहिली आणि आपली मतंही व्यक्त केली..