पत्रकारावर वेळ येते तेव्हा कोणीच त्याच्या पाठिशी नसते..ना सरकार,ना समाज,ना तो ज्या वृत्तपत्रासाठी काम करतो त्या पत्राचं व्यवस्थापन..तो एकाकी असतो.या वास्तवाचा प्रत्यय पुन्हा एकदा आला.परभणी जिल्हयातील पाथरी येथील सामनाचे प्रतिनिधी आणि आमचे मित्र माणीक केंद्रे यांच्या घरातील सिलेंडरचा स्फोट झाला.त्यात दोघेही पती-पत्नी जबर जखमी झाले.उपचारासाठी त्यांना औरंगाबादला हलविण्यात आले.रूग्णालयातला खर्च न परवडणारा होता.त्यामुळं संघटनेच्या काही मित्रांनी मुख्यंमंत्री सहाय्यता कक्षातून मदत मिळविण्यासाठी प्रयत्न केले.”भाजलेल्या व्यक्तीसाठी योजनेतून निधी देता येत नाही” म्हणत माणिक केंद्रे यांची फाईल दाखल करून घ्यायलाच नकार दिला गेला.परिणामतः मदत मिळालीच नाही.माहिती आणि जनसंपर्क विभागाच्यावतीने शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधी ही योजना चालविली जाते.गरजू पत्रकारांना दोन लाख रूपयांपर्यंत या योजनेतून मदत मिळते.मात्र केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारासच या योजनेतून लाभ मिळतो.राज्यात केवळ अडीच हजार पत्रकारांकडेच अधिस्वीकृती पत्रिका आहे.या अधिस्वीकृतीचे निमय एवढे जाचक आहेत की,ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृती मिळूच शकत नाही.स्वाभाविकपणे एम.ए. अर्थशास्त्र आणि बॅचलर ऑफ जर्नालिझमची पदवी घेतलेल्या माणिक केंद्रे याच्याकडंही अधिस्वीकृती नव्हती.त्यामुळं त्यांना शंकरराव चव्हाण कल्याण निधीतून मदत मिळण्याचा प्रश्न परस्पर निकाली निघाला होता..शंकरराव चव्हाण कल्याण निधी अधिस्वीकृतीशी लिंकअप करू नका अशी विनंती आम्ही वारंवार करूनही उपयोग होत नाही.या योजनेतील जाचक अटींमुळं सरकारी योजनांचा लाभ साडेतीन टक्के पत्रकारांनाही मिळत नाही। जे गरजू आहेत ते उपेक्षित राहतात आणि काही टोळभैरव मात्र या योजनेचा मलिदा लाटताना दिसतात.हे वास्तव दुर्लक्षिता येत नाही.मुख्यमंत्री स्वतः एका पत्राचे मालक आहेत..आमची त्यांना विनंती आहे की,अधिस्वीकृतीचा बाऊ आता बंद केला गेला पाहिजे..पत्रकार आहे की नाही ते जिल्हा माहिती अधिकार्यांना ठरवू द्या,त्यांना जिल्हयातील पत्रकार माहिती असतात.त्यांची शिफारस मिळाली की संबंधित पत्रकारास आर्थिक मदत द्या..नाही तर असे अनेक माणिक केंद्रे उपचाराअभावी आपणास सोडून जाऊ शकतात..
औरंगाबादला रूग्णालयाचा पंधरा दिवसांचा खर्च नऊ लाख रूपये झाला.हा खर्च भागविण्यासाठी त्यांच्या आईच्या नावे असलेली दोन एकर जमिन त्यांना विकावी लाागली.पुढील उपचारासाठी आणखी मदतीची गरज होती पण ती कोठुनच मिळण्याची चिन्हे दिसेनात म्हणून त्यांना सासरवाडीला अकोला येथे हलविण्यात आलं.तेथे खासगी रूग्णालायत उपचार सुरू असतानाच आज त्याचं निधन झालं. माणिक केंद्रे यांना कोठूनच मदत मिळाली नाही.पत्रकार संघटनांनी काही मदत जमा करण्याचा प्रयत्न केला .पण एवढी मोठी रक्कम जमा होण्यापुर्वीच माणिक केंद्रे यांची लेखणी कायमची थांबली..पाच-सात लाखांचा रूग्णालायाचा खर्च त्यांना करणे शक्य नव्हते.त्यामुळं त्यांना औरंगाबादेतून अकोल्याला जावं लागलं.या सार्या परिस्थितीत त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला आणि एक अभ्यासु, निर्भिड आणि सामाजिक बांधिलकी जपणारा पत्रकार कायमचा आपल्याला सोडून गेला.माणिक केंद्रे याचं निधन हे व्यवस्थेच्या नाकर्तेपणाचं आणि असंवेदनशीलतेचं उत्तम उदाहऱण आहे.कागदोपत्री योजना अनेक आहेत..प्रत्यक्षात त्याचा लाभ होताना दिसत नाही..मी स्वतः त्यांच्या कुटुंबाशी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाशी बोललो पण उपयोग झाला नाही….केवळ उपचारासाठी पैसा नसल्यानं एका पत्रकारावर अशी वेळ यावी हे वेदनादायक आणि संतापजनकही आहे..पत्रकारांकडून खंडीभऱ अपेक्षा ठेवणार्या समाजाला हे कधीच का दिसत नाही ? .पत्रकारांकडून अपेक्षा ठेवायला हरकतही नाही पण आमच्याही समाजाकडून काही अपेक्षा आहेत..पत्रकार जेव्हा अडचणीत असतो तेव्हा पत्रकाराकडून अपेक्षा ठेवणार्या समाजानं पत्रकाराला मदतीचा हात दिला पाहिजे अशी आमचीही अपेक्षा आहे.ते होत नाही म्हणून माणिक केंद्रे यांच्यासारखे पत्रकार उपचाराअभावी मृत्यूशी जवळीक साधतात.. ‘यापुढे प्रामाणिकपणाच्या,व्यावसायीक निष्ठेच्या,निःपक्षपातीपणाच्या निर्भिडपणाच्या अपेक्षा समाजानं आमच्याकडून करू नयेत असं सांगण्याची वेळ पत्रकारांवर येणार असेल तर ते लोकशाहीसाठी घातक ठरणार हे मात्र नक्की.
अशा प्रकारे आम्हाला आणखी किती पत्रकारांना श्रेध्दांजली वाहवी लागणार आहे याचं उत्तर कोणी देणार आहे काय ?
एस.एम.देशमुख