पत्रकार नंदकिशोर तोष्णीवाल यांच्यावर प्राणघातक हल्ला
हिंगोली ः मराठी पत्रकार परिषदेेशी संलग्न हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णिवाल यांच्यावर आज रात्री साडेआठच्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला.दोन मोटर साईकलवरून आलेल्या तिघा हल्लेखोरांनी पाठीमागून त्यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने त्यांच्यावर कळमनुरी येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेडला हलविण्यात आले आहे.नंदकिशोर तोष्णिवाल यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ जिल्हा पत्रकार संघाच्यावतीने उद्या कळमनुरी बंदचे आवाहन करण्यात आल्याची माहिती परिषद प्रतिनिधी विजय दगडू यांनी दिली आहे.पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती तसेच मराठी पत्रकार परिषदेने या हल्ल्याचा तीव्र शब्दात धिक्कार केला आहे.
आज सायंकाळी कळमनुरी नजिक असलेल्या मसोड येथील शेतातून दुध घेऊन परतत असताना रात्री साडेआठच्या सुमारास दोन मोटर साईकलवरून आलेल्या मारकर्यांनी त्यांची गाडी अडविली.दोघांनी रॉडने पाठीमागून हल्ला केला तर एकाने समोरून मारहाण केल्याने डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे.त्यानंतर त्यांना कळमनुरी येथे आणण्यात आले.तेथे प्राथमिक उपचार आणि टाके टाकल्यानंतर त्यांना नांदेडला हलविण्यात आले असून निरो सर्जन असलेल्या डॉ.ऋुतूराज जाधव यांच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल कऱण्यात आले आहे.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असला तरी मारेकर्यांचा तपास लागला नाही.अधाराचा फायदा घेऊन मारेकरी पसार झाले आहेत.सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री.आडे या प्रकऱणाचा तपास करीत आहेत.हल्ल्याचे कारण अद्याप समजू शकले नाही.
कळमनुरी बंदचे आवाहन
पत्रकार आणि सामाजिक कार्येकर्ते असलेले तोष्णिवाल व्यापारी असोसिएशनचेही पदाधिकारी आहेत.तोष्णिवाल यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोली जिल्हा मराठी पत्रकार संघाने उद्या कळमनुरी बंदचे आवाहन केले असून व्यापारी संघटनांनीही त्यास पाठिंबा दिला आहे.हा प्रकार मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या कानावऱ घातला गेला असून तोष्णिवाल यांच्या मारेकर्यास अटक करावी अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे.हल्लेखोर तातडीने पकडले गेले नाही तर कळमनुरी येथे मराठवाडयातील पत्रकारांचा भव्य मोर्चा काढण्याचा इशाराही मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख,किरण नाईक,अध्यक्ष सिध्दार्थ शर्मा,कार्याध्यक्ष गजानन नाईक आणि सरचिटणीस अनिल महाजन यांनी दिला आहे.