पत्रकार दिन आला,गेला, माहिती जनसंपर्कला खबरच नाही.
6 जानेवारी रोजी पत्रकार दिनाचा कार्यक्रम राज्यभर मोठ्या दिमाखात पार पडला.छोट्या छोटया शहरातही पत्रकार दिन कार्यक्रम साजरे झाले.विविध संघटनांनीही आपआपल्यापरीनं कार्यक्रम दणक्यात घेतले.अनेक पत्रकारांना सन्मानित केले.मराठी पत्रकार परिषद या मराठी पत्रकारांच्या पहिल्या संघटनेने ठाण्यात राज्यस्तरीय कार्यक्रम घेतला.दिनू रणदिवे आणि अन्य अकरा ज्येष्ठ पत्रकारांना उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.हे सारं घडत असताना सरकार आणि पत्रकार यांच्यातील दुवा म्हणून काम करणार्या माहिती आणि जनसंपर्क विभागाला पत्रकार दिन कधी आला आणि कधी गेला याची गंधवार्ताही नसावी हे संतापजनक आहे.6 जानेवारीला माहिती आणि जनसंपर्क विभागानं राज्यस्तरीय कार्यक्रम घ्यावा,त्यात मुख्यमंत्र्यांनी येऊन मार्गदर्शन करावे अशी मागणी आम्ही गेली अनेक वर्षे करतो आहोत.सरकारतर्फे पत्रकारांना जे पुरस्कार दिले जातात ते दरवर्षी 6 जानेवारीलाच दिले जावेत अशीही आमची मागणी होती.मात्र राजकारणग्रस्त झालेल्या या विभागाने 1 डिसेंबर रोजी पुरस्कार वितरण उरकून घेतले आणि 6 जानेवारीकडे पाठ फिरविली.या विभागाचा जनतेशी संपर्क राहिलेलाच नाही.आता पत्रकारांशीही देणे घेणे उरलेले नाही.गेल्या वर्षी पर्यंत किमान पत्रकार दिनाच्या शुभेच्छा जाहिरातीच्या माध्यमातून तरी दिल्या जायच्या पण यंदा ते ही घडलेले दिसत नाही.सरकारला एक वर्षे झाले तेव्हा 40 कोटी रूपये जाहिरातीवर खर्च केले गेले.( यात मोठा घोटाळा झाला आहे अशी चर्चा सुरू आहे.) मात्र पत्रकार दिनाची जाहिरात द्यायलाही या विभागाकडे निधी नाही अशी स्थिती आहे.हा विभाग आणि या विभागातले अधिकारी पत्रकारांच्या प्रश्नांबाबत गंभीर नाहीत,पत्रकारांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक ते दुर्लक्ष करतात,अधिस्वीकृती समितीत तडीपारीची कारवाई प्रलंबित असलेल्या व्यक्तिला हट्टाने ठेऊन सरकारची अब्रु ही मंडळी चव्हाट्यावर आणत आहे आणि आता त्यांना तर दर्पण दिनाचाही विसर पडला आहे.काही दिवसांनी कोण हे बाळशास्त्री असा प्रश्न या विभागातील काही महाभागांनी विचारला तर मला जराही आश्चर्य वाटणार नाही.पत्रकार दिनाबद्दल माहिती आणि जनसंपर्कने ज्या पध्दतीनं दुर्लक्ष केलं त्याची तक्रार आम्ही मुख्यमंत्र्यांकडं करणारच आहोत.( आम्ही पाठविलेली कोणती पत्रं मुख्यमंत्र्यांकडं पाठवायची हे देखील काही ‘नागपुरी संत्री’च ठरवत असल्याने आमची पत्रं देवेद्र फडणवीस यांच्यापर्यत पोहचवूच दिली जात नाहीत याची खबर आम्हाला असल्यानं आम्ही आता थेट मुख्यमंत्र्यांना भेटूनच सारं स्पष्ट कऱणार आहोत )