पत्रकार आणि उपहासात्मक लिखाणासाठी प्रसिद्ध असणारे,ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, भाजपचे माजी राज्यसभा खासदार श्रीनिवास अय्यर रामास्वामी ऊर्फ चो रामास्वामी यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. ‘तुघलक’ या राजकीय नियतकालिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्याशी त्यांची मैत्री होती. त्यांच्याशी त्या राजकीय सल्लामसलतदेखील करत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराची धुरा त्यांनी सांभाळली होती. मोदी त्यांना ‘राज गुरु’ असे संबोधत.
चो यांना २९ नोव्हेंबर रोजी फुफ्फुसाच्या विकारामुळे अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्येत ढासळल्याने त्यांना आयसीयुत हलवण्यात आले होते. याच वर्षी त्यांचा आजार बळावला होता तेव्हा जयललिता, तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदीही त्यांना भेटायला गेले होते.
मंगळवारी दुपारपर्यंत ते जयललिता यांच्या अंत्यसंस्कारांची बातमी टिव्हीवर पाहात होते. नंतर त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले होते. आज पहाटे ४ वाजचा त्यांचे निधन झाले. त्यांच्यावर आज एमआरसी नगर येथील राहत्या घरी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
चो यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३४ रोजी झाला होता. त्यांनी वकिलीचा अभ्यास केला होते. महाविद्यालयीन जीवनात ते एका नाटकाच्या ग्रुपमध्ये सक्रीय होते. तेथे त्यांची जयललिता यांच्याशी मैत्री झाली. त्या त्यांच्या आई संध्या यांच्यासोबत तालमीला येत असत.
चो यांनी मद्रास उच्च न्यायालयात सहा वर्षे वकिली केली. नंतर TTK ग्रुपचे विधी सल्लागार म्हणून काम पाहिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व अष्टपैलू होते. त्यांनी २०० सिनेमांत अभिनय केला आहे. २३ नाटके आणि १४ सिनेमाचे संवादलेखन केले आहे तर चार सिनेमांचे दिग्दर्शनही केले आहे. त्यांच्या ‘थेन्मोझियल’ नाटकातल्या पात्रावरून त्यांना ‘चो’ हे नाव पडले.
प्रत्येक ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र टाइम्सच्या फेसबुक पेजला लाइक
मटा ऑनलाइन वृत्त