पत्रकार अधिवेशनाचे बिगुल वाजले…

0
902

मराठी पत्रकार परिषदेचं 40 वं अखिल भारतीय अधिवेशन
6 आणि 7 जून रोजी पिंपरी चिंचवड येथे होणार

देवेंद्र फडणवीस,शरद पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन तर
समारोप समारंभास अण्णा हजारे, डॉ.राजेंद्रसिंहजी,सदानंद मोरे प्रमुख पाहुणे

पुणे दिनांक 18 ( प्रतिनिधी) पंच्याहत्तर वर्षांची देदीप्यमान परंपरा लाभलेल्या मराठी पत्रकार परिषदेचं चाळीसावं व्दैवार्षिक अधिवेशन येत्या 6 आणि 7 जून रोजी पिंपरी-चिंचवड येथे होत असून मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अधिवेशनाचं उद्‌घाटन होत असून राष्ट्रवादीचे अध्यक्ष श्री.शरद पवार हे समारंभाचं अध्यक्षस्थान भूषविणार आहेत े.देशभरातून अडीच हजार मराठी पत्रकार अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत. भोसरी येथील अंकुशराव लांडगे सभागृहात संपन्न होत असलेल्या या अधिवेशनात दोन दिवस चर्चासत्र,परिसंवाद,मुलाखती असे विविध भरगच्च कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले आहेत.पत्रकारिता,सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवर अधिवेशनात विविध विषयांवर आपल्या भूमिका मांडणार आहेत अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे माजी अध्यक्ष तथा अधिवेशनाचे संयोजक एस.एम.देशमुख, यांनी येथे एका पत्रकार परिषदेत दिली.
मराठी पत्रकार परिषद ही महाराष्ट्रातील पत्रकारांची पहिली संघटना आहे.ज्ञानप्रकाशकार काकासाहेब लिमये यांनी स्थापन केलेल्या या संघटनेचं अध्यक्षपद ज.स.करंदीकर,न.र.फाटक,पा.वा.गाडगीळ,बाळासाहेब भारदे,आचार्य अत्रे,अनंत भालेराव,बाबुराव जक्कल,रंगाअण्णा वैद्य.प्रभाकर पाध्ये,दादासाहेब पोतनीस,नारायण आठवले,अनंतराव पाटील,ह.रा.महाजनी,दा.वि.गोखले,यांच्यासाऱख्या दिग्गज संपादक/पत्रकारांनी भूषविले आहे.महाराष्ट्रातील 35 जिल्हयात आणि 340 तालुक्यात परिषदेच्या शाखा असून दिल्ली,पणजी,हैदराबाद,बेळगाव आदि नजिकच्या राज्यातही परिषद कार्यरत आहे.देशभरात 8,500 पत्रकार परिषदेचे सदस्य आहेत.परिषदेचं अधिवेशन दर दोन वर्षांनी होते.2011मध्ये अधिवेशऩ रोहयात झालं होतं,2013मध्ये औरंगाबादला अधिवेशन आयोजित कऱण्यात आलं होतं.परिषदेचं दुसरं अधिवेशन 1941मध्ये पुण्यात झालं होतं.न.र.फाटक हे त्या अधिवेशानचे अध्यक्ष होते.त्यानंतर प्रथमच यंदा पुणे परिसरात हे अधिवेशन होत असल्यानं पत्रकारांमध्ये त्याबद्दल मोठी उत्सुकता आहे.परिषदेचे विद्यमान अध्यक्ष किऱण नाईक हे या अधिवेशनाचेही अध्यक्ष असणार आहेत.चंद्रशेखर बेहेरे हे विद्यमान कार्याध्यक्ष,संतोष पवार हे सरचिटणीस,सुभाष भारव्दाज आणि बंडू लडके हे उपाध्यक्ष आणि सिध्दार्थ शर्मा हे विद्यमान कोषाध्यक्ष आहेत.
दोन दिवस चालणाऱ्या या अखिल भारतीय अधिवेशनाचं उद्‌घाटन शनिवार दिनांक 6 जून 2015 रोजी मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस याच्या हस्ते होत असून उद्‌घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानीे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे असणार आहेत.उद्‌घाटनाच्या या कार्यक्रमास पालकमंत्री गिरीश बापट,ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत,आयबीएन-लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे,विशेष सरकारी वकील उज्जवल निकम,खा.शिवाजीराव अढळराव पाटील,खा.अमर साबळे,खा.श्रीरंग बारणे,आ.दिलीप वळसे पाटील,आ ,लक्ष्मण जगताप,आ.गौतम चाबूकवार,आ.महेश लांडगे, आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.यावेळी परिषदेच्या माजी अध्यक्षांचा सत्कार करण्यात येणार आहे.यावेळी स्मरणिकेचं प्रकाशनही श्री.शरद पवार यांच्या हस्ते कऱण्यात येणार आहे.
समारोप समारंभ 7 जून रोजी सायंकाळी 5 वाजता होत असून ज्येष्ठ समाजसेवक श्री.अण्णा हजारे जल बिरादरीचे मॅगेसेसे पुरस्कार विजते डॉ.राजेंद्रंसिंहजी,धुमान येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ.सदानंद मोरे,झी-24तास वाहिनीचे संपादक डॉ.उदय निरगुडकर,मी मराठी वाहिनीचे व्यवस्थापकीय संपादक तुळशीदास भोईट,शिवसेना नेत्या आमदार निलमताई गोऱ्हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.यावेळी डॉ.राजेंद्रसिंहजी यांचा त्यांना मिळालेल्या स्टॉकहॉल्म पुरस्काराबद्दल अण्णा हजारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे.
अधिवेशनात विविध कार्यक्रम आयोजित कऱण्यात आले आहे.उद्‌घाटनानंतर दुपारी 2 ते 4 या वेळात होणाऱ्या पहिल्या सत्रात मी अँकर या विषयावर चर्चासत्र होणार आहे.त्यात टीव्हीच्या पडद्यावर दिसणारे अँकर आपले अनुभव, गंमती-जमती आणि अँकर होण्यासाठीच्या पात्रता

यावर आपली मतं मांडणार आहेत.या चर्चासत्रात एबीपी माझाचे मिलिंद भागवत,आयबीएन-लोकमतचे अमोल परचुरे,झी-24 तासचे अजित चव्हाण,जय महाराष्ट्रच्या सुवर्णा जोशी,मी मराठीच्या वृषाली यादव आणि टीव्ही-9चे वैभव कुलकर्णी सहभागी होत आहेत.
पत्रकार संरक्षण कायदा या विषयावर परिसंवाद
दुपारच्या सत्रात 4 ते6 या वेळेत पत्रकारांना संरक्षण कायद्याची खरोखरच गरज आहे काय? या विषयावर परिसंवाद होत आहे.ज्येष्ठ पत्रकार भरतकुमार राऊत,विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम,ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित, टाइम्स ऑफ इंडियाचे वरिष्ठ पत्रकार प्रफुल्ल मारपकवार,एनडीटीव्हीचे पत्रकार प्रसाद काथे,विजय भोसले,नवी दिल्लीतील ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख आपल्या भूमिका मांडणार आहेत.
पत्रकारांना दैनंदिन वापराव्या लागणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आणि पत्रकार या विषयावर सकाळ माध्यम समुहातील तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख दिनेश ओक यांचे व्याख्यान होणार आहे.सायंकाळी 6.30 ते 7.30 या वेळात हा कार्यक्रम होईल.रात्री 9 ते 11.30 या काळात उदय साटम निर्मित प्रिय अमुचा महाराष्ट हा संास्कृतिक कार्यक्रम होईल.

7 जून रोजी सकाळी 9.30 वाजता माध्यमांना सामाजिक जबाबदारीचं विस्मरण झालंय काय? या विषयावर परिसंवाद होत आहे.त्यामध्ये शिवसेनेच्या प्रवक्त्या आ. निलमताई गोऱ्हे,राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे,कॉग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन,भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ.विश्वंभर चौधरी, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन,एबीपी माझाचे ज्येष्ठ पत्रकार प्रसन्ना जोशी,पुण्यनगरीच्या संपादिका राही भिडे,पुढारीचे निवासी संपादक अनिल टाकळकर आदि मान्यवर आपली मतं मांडतील.
दुपारच्या सत्रात 11.30 वाजता सोशल मिडियामुळं इलेक्टॉनिक आणि प्रिन्ट मिडियाचं महत्व कमी झालंय काय ? या विषयावर परिसंवाद होत आहे.यामध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील वृत्तपत्र विद्या आणि जनसंवाद विभागाचे प्रमुख डॉ.सुधीर गव्हाणे,ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ समीरण वाळवेकर, महाराष्ट्र टाइम्सच्या पुणे आवृत्तीचे निवासी संपादक पराग करंदीकर, माहिती आणि जनसंपर्क विभागातील उपसंचालक डॉ.गणेश मुळे,ज्येष्ठ पत्रकार संजय भुस्कुटे,ज्येष्ठ पत्रकार अरूण खोरे बोलणार आहेत.या परिसंवादानंतर दुपारी 2.30 ते 3.30 या वेळेत खुले अधिवेशन होणार आहे.
राजीव खांडेकर यांची मुलाखत
सायंकाळी 3.45 वाजता एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार असून ते पत्रकारितेतील आपले अनुभव,पत्रकारितेतील बदलते प्रवाह आणि सभोवतालच्या घडामोडींवर खांडेकर आपली मतं मांडतील.समीरण वाळवेकर राजीव खांडेकर यांची मुलाखत घेतील.
सायंकाळी पाच वाजता समारोप समारंभ सुरू होईल.यावेळी अधिवेशनात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा सत्कार कऱण्यात येणार आहे.
अधिवेशनास येणा़ऱ्या पत्रकारांची निवास आणि जेवणाच्या व्यवस्था आयोजकाच्यावतीनं कऱण्यात आली आहे.बाहेरून बस किंवा रेल्वेनं येणाऱ्या पत्रकारांसाठी शिवाजी नगर.स्वार गेट आणि पुणे स्टेशन येथून कार्यक्रम स्थळी जाण्यासाठी वाहन व्यवस्था कऱण्यात आली आहे.या शिवाय भोसरीकडे जाण्यासाठी बस सेवाही उपलब्ध आहे.अधिवेशनासाठी 100 रूपये नोंदणी शुल्क आकारण्यात येणार असल्याची माहितीही एस.एम.देशमुख यांनी दिली.
पत्रकार परिषदेस कार्याध्यक्ष चंद्रशेखऱ बेहेरे,उपाध्यक्ष सुभाष भारव्दाज, विभागीय चिटणीस डी.के.वळसे पाटील ,पुणे जिल्हा अध्यक्ष शरद पाबळे, पुणे जिल्हयाचे कार्याध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक बापूसाहेब गोरे, पिंपरी-चिंचवड पत्रकार संघाचे अध्यक्ष तथा अधिवेशन संयोजक बाळासाहेब ढसाळ ,पुणे शहर अध्यक्ष राजेंद्र कापसे आदि मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here