ऑक्टोबर महिना राज्यातील पत्रकारांसाठी कमालीचा” तापदायक” ठरला.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे जी माहिती उपलब्ध झाली आहे त्यानुसार राज्यात ऑक्टोबर महिन्याच्या पंचवीस दिवसात पत्रकारांवरील हल्ल्याच्या 12 घटना घडलेल्या आहेत..त्यात पोलिसी खाक्याला बळी पडल्याच्याही काही घटनांचा समावेश आहे.मुंबईत दोन ज्येष्ठ पत्रकारांना पोलिसांच्या अरेरावीला सामोरे जावे लागले,तर एका पत्रकारावर गुंडांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. या शिवाय दौंड तालुक्यातील पाटस,परभणी जिल्हयातील असोला,पनवेल,वसई-विरार,मावळ,पुणे,रेवदंडा,जालना,येथील घटनांचा समावेश आहे.गेल्या वर्षभरात सर्वाधिक म्हणजे 90च्या आसपास पत्रकारांवर हल्ले झाले आहेत.हल्लेखोरांवर कारवाई झाल्याची एकही घटना समोर आली नाही.जालना येथील पत्रकार अच्युत मोरे यांच्यावर नुकताच हल्ला झाला असून ते रूग्णालायत उपचार घेत आहेत.त्यांचे मारेकरीही अद्याप मोकाट आहेत.पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीच्या उद्या मुंबईत होत असलेल्या बैठकीत यावर चर्चा होणार असून काही ठोस भूमिका घेतली जाणार आहे.