कालचा दिवस अत्यंत वेदना देऊन गेला.पुणे जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष आणि आमचे मित्र लोणावळा येथील पत्रकार प्रविण कदम यांच्या दुःखद निधनाची बातमी सकाळीच साडेसातच्या सुमारास अंगावर येऊन आदळली.साधारणतः पंधरा दिवसांपुर्वीच प्रवीणची पुण्यात पत्रकार संघाच्या बैठकीत भेट झाली होती.त्यावेळी बैठकीत त्यानं भाषणंही केलं होतं.त्यानंतर दोन दिवसांपुर्वी त्याचा फोनही आला होता अन काल अशी अचानक त्याच्या निधनाची बातमी आली.विश्वास बसू नये असंच हे वृत्त होतं.
नेहमी प्रमाणं प्रवीण सकाळी उठला.सव्वा सहा वाजता त्यानं चहाही घेतला.थोड्याच वेळात छातीत जळजळ होतंयची तक्रार त्यानं केली अन काही कळायच्या आतच ह्रदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यात तो सर्वांना सोडून गेला.प्रवीणचं वय 46 वर्षांचं.हे काही मृत्यूचं वय नाही.त्यामुळं अचानक झालेला कदम कुटुबांवरचा हा आघात सर्वानाच शोकविव्हळ कऱणारा होता.प्रवीणच्या प त्नीचा आकांत तर मन हेलावून सोडणारा होता.सारं दृश्य अस्वस्थ कऱणारं होतं.
काही दिवसांपासून प्रवीणला कणकण जाणवत होती.पण दवाखान्यात आज जाऊ,उद्या जाऊ करीत त्यानं प्रकृत्तीकडं थोडं दुर्लक्ष केलं.साऱ्याच पत्रकारांची ही सवय आहे.दररोजची दगदग,नव नवी टेन्शन्स,अवेळी जेवण,या साऱ्यांमुळे प्रकृत्तीची वाट लागते.नियमित तपासणी कऱण्यासही बहुतेक पत्रकार टाळाटाळ करतात.याचा परिणाम ़शरीरावर नक्कीच होतो.प्रवीणचं देखील असंच झालं अन एक उमदा,धडपड्या,चळवळ्या आणि सर्वांना बरोबर घेऊन काम करणारा पत्रकार आपल्याला सोडून गेला.तो लोकसत्तासाठी काम करायचा.
प्रवीणच्या निधनानं पत्रकारांच्या प्रकृत्तीचा प्रश्न पुन्हा ऐऱणीवर आला.या निमित्तानं माझी मराठी पत्रकार परिषद, जिल्हा पत्रकार संघ आणि सर्वच पत्रकार संघटनांना विनंती आहे की,त्यांनी आपल्या गावात ,शहरात पत्रकारांसाठी आरोग्य तपासणी शिबिरंांचे आयोजन करून पत्रकारांच्या प्रकृत्तीची तपासणी करावी.स्थानिक पातळीवरचे अनेक डॉक्टर्स त्यासाठी मदत करायला तयार असतात.आपला पुढाकार हवा.सभा,समारंभ आणि भाषणं करण्यापेक्षा हा उपक्रम करण्याची अधिक गरज आहे.रायगड आणि पुणे जिल्हयात आम्ही असा प्रयत्न 15 ऑघस्टला करणार आहोत.आपणही आपल्या तालुक्यात.जिल्हयात हा उपक्रम राबवावा ही विनंती.शेवटी आपली प्रकृत्ती चांगली असेल तरच सारं ठीकय.नाही तर काहीच नाही..आपण आजारी पडलो तर दोन दिवस लोक भेटाायला येतात.पुन्हा आपली लढाई आपणासच लढावी लागते.मला वाटतं ही वेळ येणार नाही याची काळजी व्यक्तिगत पातळीवर पत्रकारांनी आणि सामुहिक पातळीवर पत्रकार संघटनांनी घेतली पाहिजे असं मला वाटतं.अनेक पत्रकार संघटनांनी पत्रकारांसाठी विमा योजना राबविलेल्या आहेत.त्याच धर्तीवर आरोगय तपासणी शिबिरं देखील दरवर्षी राबवावेत अशी विनंती आहे. अन्य कोणत्याही गोष्टीपेक्षा त्याची अधिक गरज आहे.असं मला वाटतं. ( एस.एम.)