हल्ल्याच्या चौकशीसाठी समिती

0
941

नवी दिल्ली – वादग्रस्त स्वयंघोषित संत बाबा रामपाल याच्या “सतलोक‘ आश्रमाबाहेरील घटनांचे वार्तांकन करण्यास गेलेल्या पत्रकारांना पोलिसांनी केलेल्या मारहाण प्रकरणाची चौकशी करण्यासाठी प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाने चार सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन केली आहे.

नवी दिल्ली येथे मुख्यालय असलेली प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया ही शासनाची स्वायत्त संस्था असून माध्यमांचे स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी काम करते. याबाबत बोलताना कौन्सिलचे अध्यक्ष मार्कंडेय काटजू म्हणाले की, मंगळवारी पोलिसांनी काही पत्रकारांना मारहाण केली तसेच त्यांच्या वस्तूही फोडल्या. प्रथमदर्शनी ही बाब म्हणजे घटनेतील मुलभूत स्वातंत्र्याचा हक्क भंग असून कलम 19(1) भंग केल्याचे दिसून येत आहे. घटनेतील सत्यता तपासण्यासाठी सोंदिप शंकर (संयोजक), कोसुरी अमरनाथ, राजीव रंजन नाग आणि कृष्णा प्रसाद यांची चार सदस्यीय सत्यशोधन समिती स्थापन करण्यात आली असल्याचे ते म्हणाले. ही समिती हल्ला झालेले पत्रकार, माध्यम संस्था, माध्यम व्यवस्थापन तसेच संपादकांनाही भेट देईल. याशिवाय पोलिस प्रशासन आणि संबंधितांचीही समिती भेट घेईल. यासाठी हरियाना आणि चंदिगड प्रशासनाने समितीला सहकार्य करण्याचीही काटजू यांनी सूचना केली आहे.

मंगळवारी हिसार जिल्ह्यातील बारवाला येथे पोलिस आणि रामपाल यांच्या समर्थकांमध्ये झालेल्या झटापटीत अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेचे वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांनाही पोलिसांनी मारहाण केली होती. तसेच त्यांचे कॅमेराही तोडण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here