पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ले वाढले
एस.एम.देशमुख यांचा आरोप
मुंबई : पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवर होणारया हल्ल्यांमध्ये पुन्हा चिंताजनक वाढ झाल्याचा आरोप पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी केला आहे..
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पाठविलेल्या निवेदनात देशमुख यांनी म्हटले आहे की, पत्रकार संरक्षण कायद्याचे विधेयक २०१७ मध्ये मंजूर झाल्यानंतर त्यावर राष्ट्रपतींची स्वाक्षरी झाली.. २०१८ मध्ये महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा लागू झाला.. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले आणि एकमेव राज्य असल्याबद्दल सरकारचे कौतुक झाले.. कायदा झाल्यानंतर दोन वर्षे पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांत लक्षणीय घट झाली.. मात्र पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना पुन्हा एकदा वाढल्याचे वास्तव देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.. पत्रकारांवरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा असल्याने हल्लेखोरांना थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागते.. परंतू अनेक प्रकरणात असे निदर्शनास आले आहे की, हल्लेखोर हे राजकीय पक्षांचे कार्यकर्ते असल्याने पोलीस दबावाखाली पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हाच दाखल करीत नाहीत किंवा टाळाटाळ करतात.. त्यामुळे हल्ले करूनही पत्रकार मोकाट सुटतात.. परिणामतः कायद्याचं भय उरलं नाही.. पत्रकारावर हल्ला केल्यानंतरही काही होत नाही हे लक्षात आल्याने पत्रकारांना दमदाटया करणे, अर्वाच्च शिविगाळ करणे आणि पत्रकारांवर हल्ले करणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे.. मराठवाडयात गेल्या आठवड्यात पाटोदा, बदनापूर आणि धारूर येथे पत्रकारांना मारहाण झाली किंवा जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.. एकट्या जालना जिल्ह्यात गेल्या महिन्यात पत्रकारांवरील हल्ल्याच्या तीन चार घटना घडल्या आहेत.. राज्यात अन्यत्र देखील हीच स्थिती असल्याचे देशमुख यांनी निवेदनात स्पष्ट केले आहे..
पत्रकार संरक्षण कायद्याची कठोरपणे अंमलबजावणी करावी आणि पत्रकारावरील प़त्येक हल्ल्याची नोंद पत्रकार संरक्षण कायद्याखाली करावी तसे आदेश पोलिसांना द्यावेत अशी मागणी एस.एम.देशमुख यांनी केली.. या संदर्भात योग्य ती कारवाई न झाल्यास राज्यातील पत्रकार रस्त्यावर उतरतील असा इशाराही निनेदनात देण्यात आला आहे…