राजकारणी,गुंड,माफिया आणि हितसंबंधी यांच्याकडून वर्षानुवर्षे पत्रकारांवर हल्ले होत असतात.हे हल्ले रोखण्यासाठी सरकारला आता कायदाही करावा लागला आहे.हे सारं असताना एखादा पुढारी जर म्हणत असेल की,आम्ही नव्हे तर पत्रकाराच आमच्यावर ह्ल्ले करतात तर त्याला काय म्हणावं,मराठी भाषेत याला चोरांच्या उलटया बोंबा असं म्हणतात.
अशाच उलटया बोंबा मारल्या आहेत बिहारचे उपमुख्यमंत्री तथा लालूप्रसाद यादव यांचे दिवटे चिरंजीव तेजस्वी यादव यांनी.हे यादव कुलोत्पन्न सध्या भ्रष्टाचारासह विविध आरोपात अडकले आहेत.त्याच संदर्भात बुधवारी रात्री ते मुख्यमंत्री नितीशकुमार यांना भेटायला गेले होते.बैठक आटोपून बाहेर पडल्यानंतर स्वाभाविकपणे मिडियानं त्यांना गराडा घातला आणि प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.अडचणीचे प्रश्न आले की,यांना तर ठोकूनच काढले पाहिजे अशी भाषा आपल्याकडंही वापरली जाते तसेच तेजस्वी यांदवही पत्रकारांवर चिडले.त्यांची चिडचिड पाहून त्यांचे अंगरक्षकांनी पत्रकारांना फटकवायला सुरूवात केली.हा सारा घटनाक्रम सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर तेजस्वी यादव यांनी पलटी मारत आम्ही नव्हे तर पत्रकारांनीच आम्हाला मारहाण केल्याचा टाहो फोडला.पत्रकारांनीच धक्काबुक्की केली,माझ्या सुरक्षा रक्षकांनी तर केवळ बचाव केला असे तारे त्यांनी तोडले आहेत.ते म्ङणाले,माझ्या आरजेडी पक्षानं नेहमीच पत्रकारांना सौजन्याची वागणूक दिलेली आहे.त्यामुळं आम्ही असं करणं शक्य नाही.आम्ही जेव्हा मिटिंग संपवून आलो तेव्हा पत्रकारांनी मला बाईटसाठी थांबविले.मी देखील थांबलो,पण नंतर वाहिन्यांच्या प्रतिनिधींमध्येच रेटारेटी,धक्काबुक्की सुरू झाली.त्यात आमच्या एका मंत्र्याला कॅमेराही लागला आहे.वास्तव असं आहे की,अंगरक्षक पत्रकारांना मारहाण करतानाची क्लीप व्हायरल झाली आहे.पत्रकारच धक्काबुक्की करणार असते तर सरकारला पत्रकार संरक्षण कायदा कऱण्याची गरजच भासली नसती.आमच्यापैकी अनेकजण म्हणतात की,पत्रकारांनी आपला बचाव करायला शिकले पाहिजे.बिहारच्या पत्रकारांची तशी तयारी झाली असेल तर त्याचंही स्वागत करावं लागेल.पण हे सत्य नाही.अडचणीत आले की,राजकाऱणी वाट्टेल ते करयाला आणि बोलायला मागे-पुढे पहात नाहीत त्यातला हा प्रकार आहे.