पत्रकारांच्या विधायक कामाने पत्रकारांविषयी समाजाच्या दृष्टीकोनात बदल होत आहे
जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या ऑनलाईन बैठकीत मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे प्रतिपादन
रत्नागिरी- ‘‘समाजामध्ये काही प्रमाणात पत्रकारांप्रती प्रतिकुल भावना व कपाळावर आठी दिसू दिसून येते. परंतु बीड, रोहा, रायगड, रत्नागिरीसह अ.भा. मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असणाऱ्या राज्यातील काही जिल्हा पत्रकार संघांनी कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील पुरग्रस्तांना केलेली तातडीची मदत ही अभिनंदनीय व कौतुकास्पद बाब असून अशा कामाने पत्रकारांप्रती समाजाच्या दृष्टीकोनात बदल व मतपरिवर्तन होण्यास मदतच होईल’’ असे प्रतिपादन अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी आज जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या महत्वपूर्ण ऑनलाईन बैठकीत मार्गदर्शन करतांना केले.
दीड तास चाललेल्या या बैठकीत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष गजानन नाईक, कार्याध्यक्ष शरद पाबळे यांच्यासह राज्यातील बहुसंख्य जिल्ह्यातील प्रसिद्धीप्रमुख सहभागी झाले होते.
जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना मार्गदर्शन करतांना एस.एम.देशमुख पुढे म्हणाले, 82 वर्षाची परंपरा असलेली मराठी पत्रकार परिषदेने नेमलेले जिल्हा प्रसिद्धी प्रमुख हे परिषदेचे कान व डोळे असून दिवसातून काही मिनिटे परिषदेला द्या, आपण पाठविलेली बातमी छापून आली नाही म्हणून खचून जावू नका, बातमी पाठवित रहा, प्रसारमाध्यमांशी सलोख्याचे संबंध ठेऊन संपर्कात रहा व त्यांना पत्रकारांसाठी करीत असलेल्या परिषदेच्या कामाची माहिती देऊन भूमिका समजावून सांगा. आपले काम लेटर पॅड, व्हिजीटींग कार्ड यापूरते मर्यादित न ठेवता विधायक कामात सक्रिय राहून एका जिल्ह्याचे काम दूसऱ्या जिल्ह्यात कळेल या दृष्टीने कार्यरत रहावे असे आवाहन करीत लवकरच 36 जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांना ओळखपत्र प्रदान करण्यात येतील व येत्या 3 डिसेंबर रोजी उत्कृष्ठ जिल्हा प्रसिद्धी प्रमुखाची निवड करण्यात येईल अशी घोषणा एस.एम.देशमुख यांनी समारोप प्रसंगी केली.
परिषदेचे मुख्य विश्वस्त किरण नाईक यावेळी मार्गदर्शन करतांना म्हणाले, प्रसिद्धी प्रमुखांनी प्रत्येक तालुक्याशी सतत संपर्कात रहावे. जनसंपर्क म्हणून काम करावे. परिषदेच्या माध्यमातून चांगले काम करतांना आपण सतत यशस्वी ठरलो आहोत. पुरपरिस्थितीबाबत परिषदेने केलेले कामाचे राज्यभर कौतुक झाले व परिषदेचा दराराही वाढला. आपण केलेल्या चांगल्या कामाची प्रसिद्धीबाबत कुठेही कमी पडता काम नये असे शेवटी किरण नाईक यांनी आवाहन केले. परिषदेचे अध्यक्ष गजानन नाईक मार्गदर्शन करतांना म्हणाले, परिषदेच्या प्रतिमेचा प्रभाव शासनावर पडला पाहिजे. पत्रकार हे समाज प्रबोधनाबरोबरच पुरग्रस्तांना मदत करून समाजकार्यातही अग्रेसर असतात हे आपण दाखवून दिले आहे. आपले शिस्तबद्ध काम वृत्तपत्रातून प्रकाशित व्हावे यासाठी प्रयत्नशील रहायला हवे. विशेष म्हणजे या बैठकीत परिषदेचे सर्व नेते व काही जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांनी आपल्या भाषणात खान्देशातील वृत्तपत्र, पोर्टल, व्हॉटस्ॲप ग्रुपवर परिषदेच्या वृत्तांना मिळणाऱ्या प्रसिद्धीबद्दल, परिषदेच्या वृत्तांना प्राधान्य देणाऱ्या खान्देशच्या पत्रसृष्टीचे कौतुक केले. या बैठकीत सर्व जिल्हा प्रसिद्धी प्रमुखांच्या अडचणी व शंकांचे परिषदेच्या नेत्यांनी निराकरण केले. मराठी पत्रकार परिषदेचे कार्याध्यक्ष शरद पाबळे यांनी जिल्हा प्रमुखांना केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले. बैठकीचे संचलन करीत शरद पाबळे यांनी आभार मानले.