राजकारण्यांवर पत्रकार नेहमीच टिकेची झोड उठवत असतात.टीका करायच्या वेळेस ती केलीच पाहिजे पण राजकारण्यांचे चांगले गुणही पत्रकारांनी आत्मसात करायला काय हरकत आहे? ,तसं होत नाही.काऱण आपण स्वतःला सर्वज्ञानी समजत असतो.
एखादया राजकीय नेत्याचे निधन झाले तर त्याचे कुटुंबीय एकाकी पडणार नाही याची काळजी राजकीय पक्षांकडून घेतली जाते.त्यासाठी सारे मतभेद-रागलोभ बाजूला ठेऊन सर्व पक्ष एक होतात.ही बाब नक्कीच स्वागतार्ह आणि अनुकरणीय आहे.आर.आर.आबांचे अकाली निधन झाल्यानंतर त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या पत्नींना राष्ट्रादीने उमेदवारी दिली आहे.कॉग्रेस,आणि अन्य पक्ष आता त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणार नसल्याने ही निवडणूक बिनविरोध होईल अशी अपेक्षा आहे.सर्व राजकीय पक्षांना या भूमिकेबद्दल धन्यवाद द्यायला हवेत.गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले तेव्हा त्यांच्या लोकसभा जागेसाठी सर्वपक्षांनी मिळून त्यांच्या मुलीला खासदार केले होते.विलासराव गेल्यानंतर त्यांच्या मुलालाही मंत्री कऱण्यात आले.ही अलिकडची ठळक उदाहऱणे असली तरी त्या अगोदर देखील अशाच प्रकारे सर्व राजकीय पक्षांनी परिपक्वता दाखविल्याची अनेक उदाहरणे देता येतील.त्याबद्दल नक्कीच आनंद वाटतो.
राजकीय पक्षांना उठसुठ शिव्या देणाऱ्या पत्रकारांमध्ये मात्र अशी मानसिकता दिसत नाही,एखाद्या पत्रकाराचे अपघाती किंवा अचानक अजाराने निधन झाले तर मग त्याचे कुटुंबिय अगदी वाऱ्यावर फेकले जाते.अलिकडे माणगावात प्रकाश काटदरे,औंरगाबादेत रमेश राऊत यांचे निधन झाले.मात्र दोन्ही पत्रकारांच्या कुटुबासाठी आम्ही काहीच करू शकलो नाही.त्यांचे कुटुबिय कसे आहे याचीही फार कोणी काळजी घेतली नाही. साताऱ्यातील एका पत्रकाराचे निधन झाल्यानंतर त्याची पत्नी आता दुसऱ्याकडे भांडी घासणे आणि स्वयंपाक कऱण्याचे काम करीत आहे.हा सारा प्रकार सुन्न करणारा आहे.आयुष्यभर जगाची उठाठेव कऱणारे बहुतेक पत्रकार व्यवहारशून्य असतात.त्यांना भविष्याचे तरतूद कऱणेही जमत नाही.त्यामुळे उतारवयात किंवा पत्रकारांच्या मृत्यूनंतर अनेक पत्रकारांच्या कुटुंबाची वाताहत होते.पत्रकारांना वापरून घेणारा समाज त्यांच्यासाठी काही कऱण्याची शक्यातच नाही पण आम्ह पत्रकार देखील काही करीत नाही ही खरी शोकंातिका आहे.त्यामुळेच निवृत्तीनंतर पत्रकारांना किमान पेन्शन मिळाली पाहिजे ही मागणी घेऊन गेली वीस वर्षे आम्ही मंत्रालयाचे उंबऱठे झिजवत आहोत.त्यावर सरकार काही निर्णय़ घेत नाही कारण त्याला आमच्यातीलच काही सुखवस्तू किंवा ज्यांचे सारे भागले आहे अशी मंडळी विरोध करताना दिसते.सरकारकडे कश्यासाठी भिक मागता म्हणून आमच्या मागणीलाच अपशकून कऱण्याचा प्रय़न्त करतात पत्रकारांनी स्वाभिमानी असावं,आपला आत्मसन्मान कायम ठेवला पाहिजे हे आम्हालाही मान्य आहेच.पण या साऱ्या गोष्टी भरल्यापोटी चांगल्या वाटतात .ज्यांच्यावर वेळ आलीय त्यांना मदत करता आली तर करावी पण किमान स्वाभिमानाच्या गोष्टी सांगून त्यांच्या दुःखावर मीठ चोळू नये.राज्यातील पत्रकारांची अवस्था बघता आता काही तरी निर्णायक कऱण्याची वेळ आली आहे हे नक्की.