काऱण चौथा स्तंभ आहोत आम्ही..

0
1135

मासा मारायला किमान पाण्यात जावं लागतं,

वाघ मारायला थेट जंगलात जावं लागतं

या शिकारी पेक्षा फारच सोपं असतं

भरदिवसा आम्हाला  रस्त्यावर मारणं,बदडणं…

 आम्हाला बदडणं फारच सोपं असतं

कारण..

 आम्हाला नसते झेड सेक्युरिटी,

आम्हाला  नसते कायद्याचं किंवा मालकांचंही संरक्षण,

शिवाय

आम्ही असतो नेहमीच उपलब्ध , रस्त्यावर,नाक्यावर…

कधीही…केव्हाही…अगदी रात्री-बेरात्रीही..

 आम्हाला बदडणं यासाठी सोपं असतं की,

आम्ही असतो एकटेच

नसत कुणी साथीला..

‘हम सब एक है’ , ‘पत्रकार एकजुटीचा विजय असो’ चे नारे

जरूर देेतो आम्ही

पण हे सारे एक नाहीत,

हे असतं गुंडांना,पुंडांना आणि सत्ताधाऱ्यंानाही नक्की माहीत…

पत्रकारावर हल्ला झाला की आम्ही म्हणतो, निषेध ,निषेध , निषेध..

फार तर करतो  निदर्शने, नाही तर  काढतो एखादा थोरला मोर्चा..

निषेध हा असतो आमचा ठेवणीतला शब्द,

तो ही आता एवढा गुळगुळीत झालाय की,त्याचंही तेज गेलंय हरपून

तरीही आम्ही  न विसरता तो वापरत असतो

तो वापरून झाला की, सुटकेचे सुस्कारे सोडत असतो…

या साऱ्यानं मुर्दाड सरकारचं काहीच बिघडत नाही..

शेअरबाजारही गडगडत नाही..

गावातही काही  घडत  नाही..

साधा हल्लेखोरही डरत  नाही…

तरीही हे सार करत असतो आम्ही..वारंवार करत असतो आम्ही..

कारण लोकशाही मानत असतो आम्ही…

गांधीवादी असतो  आम्ही..

धर्मान्ध शक्तीचे बुरखे फाडतो आम्ही,

राजकारण्यांना नागडे कऱतो आम्ही,

भ्रष्टाचाऱ्यांचे भांडे फोडतो आम्ही,

आणि अनेकदा सरकारही पाडतो आम्ही..

म्हणूनच

अनेकांना त्यांच्या मार्गातले काटे वाटतो आम्ही …

मग खेळले जातात “काट्यानं काटा” काढण्याचे जिवघेणे खेळ..

मात्र असे खेळ खेळणारे,

कुणाच्या तरी बोटावर नाचणारे

मारेकरी,हल्लेकरी आणि सरकारही हे विसरत असतं की,

आम्हाला मारणं,बदडणं ,आमच्यावर हल्ले करणं भलंही सोपं असेल

पण आम्हाला गप्प करणं,आमचा आवाज बंद कऱणं

कुणाच्या बापालाही शक्य नसेल …

काऱण

समाजाचे “वॉच डोॅग” आहोत आम्ही

“चौथा स्तंभ” आहोत आम्ही..

एस.एम.देशमुख

——————————————————————————————

(दाभोळकर आणि पानसरे यांची हत्या झाल्यानंतर अनेक कार्यकर्ते व्यथित झाले.त्यांच्या भावनांना वाट करून देणारी श्री.हेरंब कुळकर्णी यांची एक कविता साधनाच्या ताज्या अंकात प्रसिध्द झाली आहे. “कार्यकर्ता मारणं सर्वात सोपं असतं”  असं या कवितेच शिर्षक आहे.कार्यकर्ता आणि पत्रकारांची अवस्था जवळपास सारखीच असल्यानं हेरंब कुळकर्णी यांच्या कवितेत थोडा बदल करून पत्रकारांच्या भावना व्यक्त करण्याचा केलेला एक प्रयत्न.. SMDeshmukh )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here