मराठी पत्रकार परिषद असेल किंवा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने नेटाने चालविलेल्या पत्रकार हितार्थ चळवळीला आता यश येताना दिसत असून राज्यातील पत्रकार तर आता एक झालेच आहेत त्याचबरोबर समाजही आता पत्रकारांच्या पाठिशी उभं राहू लागला आहे.हा बदल नक्कीच स्वागतार्ह आणि चळवळीतील सर्व पत्रकार मित्रांची उमेद वाढविणारा आहे.
सातारा जिल्हयातील खटाव येथील पत्रकार अरूण देशमुख यांचं तरूण वयात आकस्मात निधन झालं.कुटुंबं एकाकी पडलं.अशा वेळेस श्रध्दांजली वाहून मोकळं होण्याची आपली पध्दत.मात्र आता असं होत नाही.एखादा पत्रकार अडचणीत आला तर त्या त्या जिल्हयातील पत्रकार एकत्र येतात आणि निधी जमा करून त्याला किंवा त्याच्या पश्च्यात त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करतात.अरूण देशमुखचं निधन झाल्यानंतर हरिष पाटणे यांच्या पुढाकारनं सातारा जिल्हयातील पत्रकार एकत्र आले,त्यांनी अरूणच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी निधी जमविला.पत्रकारांनी आपल्या बांधवासाठी मदत देणं हे स्वाभाविक असलं तरी आता समाजही आपल्या पत्रकार बांधवांच्या मदतीला धावून येताना दिसतोय.सातारा जिल्हयातील जावळी तालुक्यातील सायगाव येथील कदम-आणि यादव या कुटुंबांनं आपल्या मुला-मुलीचा विवाह साध्या पाध्दतीनं पार पाडला आणि त्यातून जी रक्कम शिल्लक राहिली ती अरूण देशमुख यांच्यासाठी पत्रकारांनी जमा केलेल्या मदत निधीसाठी दिली.असं यापुर्वी कधी घडलं नव्हतं.पत्रकारांचे काही प्रश्न आहेत,त्यांच्या काही वेदना,काही दुःख आहेत हेच समाज मान्य करीत नव्हता.मात्र आता परिस्थिती बदलत चालली आहे.समाजही पत्रकारांच्या पाठिशी उभा राहतोय.सातारा जिल्हयातील कदम-आणि यादव कुटुंबानं त्या अर्थानं आदर्श घालून दिलाय.मी मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने या दोन्ही कुटुंबांना मनापासून धन्यवाद देत आहे.पत्रकार समाजासाठी लढत असतो,अशा स्थितीत समाजानं जेव्हा पत्रकाराला त्यांच्या मदतीची गरज असेल तेव्हा पुढं आलं पाहिजे ही भावना साताऱा जिल्हयातील कदम-यादव कुटुंबानं केलेल्या मदतीतून वृध्दींगत होणार आहे हे नक्की.पुन्हा आभार.( एस.एम.)