पत्रकारांच्या नशिबी पुन्हा ‘लाल डबाच’…

2
2131
 महाराष्ट्रातील अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एशियाड,हिरकणी आणि लाल डब्यातून मोफत प्रवासाची शंभर टक्के सवलत आहे,म्हणजे अधिस्वीकृती पत्रिका ज्या पत्रकाराकडं आहे तो दरवर्षी आठ हजार किलो मिटरचा प्रवास एस.टी.नं अगदी मोफत करू शकतो.ही सवलत जेव्हा सुरू झाली तेव्हा ती केवळ लाल रंगाच्या एस.टी.पुरतीच मर्यादित होती.मराठी पत्रकार परिषदेने याचा पाठपुरावा करून अशोक चव्हाण परिवहन मंत्री असताना त्यांच्याकडून अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एशियाडची सवलत मिळवून घेतली होती.गेली अनेक वर्षे राज्यातील पत्रकार एशियाडनं प्रवास करीत होते.अलिकडं आलेल्या हिरकणीमध्येही ही सवलत दिली गेली होती.मात्र आता बहुतेक मार्गावर शिवशाही या वातानुकुलीत गाडया सुरू झाल्या आहेत.शिवशाही किंवा शिवनेरीत पत्रकारांना सवलत नाही.त्यामुळं अडचण अशी झालीय की,हिरकणी आणि एशियाड या गाड्या अऩेक मार्गावर बंद झाल्या आहेत आणि शिवशाही किंवा शिवनेरीत मोफत प्रवासाची सवलत नाही.त्यामुळं अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एक तर लाल डब्यातून प्रवास करावा लागतोय किंवा खिश्याला न परवडणारे शिवशाही किंवा शिवनेरीचे तिकीट काढून प्रवास करावा लागतोय.त्यामुळं अधिस्वीकृतीचा आता उपयोग राहिला नाही.लाल डब्यातून प्रवास करणे ही मोठीच शिक्षा असल्यानं त्यातून कोणी प्रवास करायला तयार नाही.त्यामुळं आता शिवशाही किंवा शिवनेरीमधून पत्रकारांना मोफत प्रवासाची सवलत मिळावी अशी मराठी पत्रकार परिषदेची मागणी आहे.असे झाले नाही तर या अधिस्वीकृतीचा काहीच उपयोग नाही.
यातली मेख अशी की,एस.टी.चा मोफत प्रवास पत्रकारांना करता येत असला तरी ही एस.टी.ची कृपा नाही.राज्यातील 2400 अधिस्वीकृतीधारक पत्रकारांचे प्रत्येकी 8000 किलो मिटरचे प्रवास भाडे सरकार एस.टी.ला देत असते.प्रत्यक्षात किती पत्रकार एस.टी.नं प्रवास करतात हा संशोधनाचा विषय आहे.म्हणजे पत्रकारांचे हे पैसे जवळपास एस.टी.ला फुकटच मिळतात.त्यामुळं या बदल्यात एस.टी.नं शिवशाही किंवा शिवनेरीमधून प्रवासाची सवलत दिली तर आकाश कोसळणार नाही.कारण नाशिक-मुंबई,नाशिक-ठाणे,मुंबई-पुणे,पुणे-कोल्हापूर,पुणे औंरागाबाद,पुणेःनाशिक या महत्वाच्या आणि वर्दळीच्या मार्गावर हिरकणी आणि एशियाड जवळपास बंद झाल्यातच  जमा आहेत.पुण्याहून स्वारगेट किंवा रेल्वे स्टेशन येथील बस स्थानकातून मुंबईसाठी गाड्या सुटतात.चार-पाच शिवनेरी किंवा शिवशाही गेल्यानंतर एखादी एशियाड सुटते.त्याला तुफान गर्दी असते.त्यामुळं या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेताच येत नाही.
आणखी एक मुद्दा असाय की,पत्रकारांसाठी 11 आणि 12 क्रमांकाचे सीट राखीव असते.मात्र या राखीव नंबरचे रिझर्व्हेशन अगोदरच दिलेले असते.त्यामुळं ऐनवेळी एखादा अधिस्वीकृतीधारक पत्रकार आला तर त्याला त्याच्यासाठी राखीव असलेले सिट मिळत नाही.अशा वेळेस वादावादी होते.त्यामुळं या सिटचे रिर्झ्व्हेशन  दिले जाऊ नये अशीही मागणी आहे.हे सर्व मुद्दे घेऊन मराठी पत्रकार परिषद लवकरच परिवहन मंत्री दिवाकर रावते यांची भेट घेऊन वस्तुस्थिती त्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे.या संदर्भात पत्रकारांच्या काही सूचना असतील तर त्याचेही स्वागत आहे.
( सोशल मिडिया सेल,मराठी पत्रकार परिषद,मुंबई ) – 

2 COMMENTS

  1. सर , नमस्कार !
    आपलं म्हणणं अगदी योग्य आहे . आपण शिवनेरी आणि शिवशाही बस सवलतीसाठी लवकरच पाठपुरावा करावा ही विनंती . तसंही या वातानुकूलित बसही रिकाम्याच धावत असतात .

  2. मुबई -नाशिक- शिर्डी या मार्गावर दिवसाला 3-4 शिवशाही धावत आहेत. प्रवासभाडे जास्त असल्याने सामान्य जण या बसमधून प्रवास करायला सहज तयार होत नाही. हिरकणी बंद करून या बस सुरू केल्या आहेत. डिझेल जाळत रिकाम्या धावणाऱ्या या बस मध्ये अधिस्वीकृती धारक पत्रकारांप्रमाणेच जेष्ठ नागरिकांनाही प्रवास करण्याची संधी दिली गेली पाहिजे असे वाटते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here