नगर मनपाचे पत्रकारांसमोर सपशेल लोटांगण
आयुक्त शंकर गोरे यांनी व्यक्त केली दिलगिरी
अहमदनगर :
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचा दणका आणि स्थानिक पत्रकारांचा रेट्यापुढे अहमदनगर मनपा प़शासन नरमले असून
मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल पत्रकारांकडे सपशेल दिलगिरी व्यक्त केली आहे..
सामनाचे पत्रकार मिलिंद देखणे यांना दिलेली नोटीस देखील मागे घेत असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.. पत्रकारांच्या एकजुटीचा हा विजय असल्याचे मत पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी व्यक्त केले आहे..
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारल्यामुळे आरोग्य विभागाचे अधिकारी पिसाळले आणि त्यांनी पत्रकार मिलिंद देखणे यांना थेट नोटीस पाठवून तीन दिवसात उत्तर देण्याची सूचना केली..हा तालिबानी फतवा असल्याची भावना माध्यम जगतात उमटली.. याचे तीव़ पडसाद राज्यभर उमटले.. पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती आणि मराठी पत्रकार परिषदेने हा विषय गांभीर्याने घेत मनपाने नोटीस मागे घेतली नाही तर राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल असा इशारा दिला होता.. याची दखल अखेर मनपा आयुक्तांना घ्यावी लागली..
नगरमधील सर्वच दैनिकांचे प़मुख, पत्रकार, छायाचित्रकार आणि वाहिन्यांचे प़तिनिधी, संघटनांचे प़तिनिधी अशा सर्वांनी आज जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांची भेट घेऊन आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या.. त्यानंतर मनपा आयुक्त शंकर गोरे यांनी दिलगिरी व्यक्त केली.. मनपाच्या संबंधित आरोग्य अधिकरयांनी पत्रकार मिलिंद देखणे यांच्याकडे माफीनामा सादर केला.. तसेच वादग्रस्त पत्र मागे घेत असल्याचे जाहीर केले..
पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे निमंत्रक एस.एम.देशमुख यांनी हा विजय पत्रकारांच्या एकजुटीचा असल्याचे मत व्यक्त केले आहे.. पत्रकारांचा आवाज दाबण्याचा कोणताही प़यत्न राज्यातील पत्रकार यापुढे खपवून घेणार नाहीत असा इशारा देखील एस.एम.देशमुख यांनी दिला आहे..