अलिबाग दिनांक 23 ( प्रतिनिधी ) मुंबई-गोवा महामार्गाच्या इंदापूर ते संगमेश्वर या दुसऱ्या टप्प्याच्या चौपदरीकरणाचे काम त्वरित सुरू करावे यामागणीसाठी कोकणातील पत्रकार बुधवार दिनांक 25 जून 2014 रोजी कशेडी घाट रोको आंदोलन करणार आहेत.या आंदोलनाचे नेतृत्व ज्येष्ठ पत्रकार आणि पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीचे प्रमुख एस.एम.देशमुख करणार असल्याची माहिती रायग़ड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय पवार आणि रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष नागेश कुळकर्णी यांनी एका संयुक्त प्रसिध्दी पत्रकाव्दारे दिली आहे.
मृत्यूचा महामार्ग बनलेल्या मुंबई-गोवा महमार्गाचे चौपदरीकरण करावे या मागणीसाठी कोकणातील पत्रकार 2008 पासून शांततेच्या मार्गाने आंादोलन करीत आहेत.धरणे,उपोषण,घेराव,रास्ता रोको,लॉंगमार्च,मशाल मार्च,मानवी साखळी अशा अभिनव पध्दतीने पत्रकारांनी आंदोलन केल्यानंतर पळस्पे ते इंदापूर या 84 किलो मीटरच्या मार्गाच्या रूंदीकरणाचे काम सुरू झाले.हे काम 33 टक्के पूर्णही झाले. वस्तुतः या कामाची देखील डिसेंबर 2014ची डेडलाईन होती.म्हणजे हे काम आता संपत यायला हवे होते.मात्र ते अजून केवळ 33 टक्केच झाले आहे.अशातच अपघातप्रवण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इंदापूर ते संगमेश्वर या दुसऱ्या टप्प्याच्या कामाच्या बाबतीत अजून शासकीय पातळीवर कोणतीच हालचाल नाही.या संदर्भात महामार्ग विभागाकडे वारंवार पाठपुरावा करून ही त्याला फारसा प्रतिसाद न मिळाल्याने आता आमच्यासमोर पुन्हा एकदा आदोलनाशिवाय मार्ग राहिलेला नाही असे रायगड प्रेस क्लबच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.संपूर्ण महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याशिवाय रस्तयावरील अपघात कमी होणार नाहीत अथवा वारंवार महामार्गावर होणारी कोंडीही संपणार नाही. कोकणातून जाणारा हा एकमेव महामार्गा पूर्ण झाल्यास तो कोकणाच्या विकासाचा महामार्ग ठरणर आहे.अगोदरच फार उशिर झाला आहे,आता अधिक उशिर होऊ न देता आणि निष्पाप नागरिकांचे बळी न घेता तातडीने या संपूर्ण महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम एकाच वेळी दोन्ही बाजुंनी सुरू करावे अशी पत्रकारांची मागणी आहे.त्यासाठी हे आंदोलन असल्याचे प्रसिध्दी पत्रकातत स्पष्ट करण्यात आले आहे.
25 तारखेला दुपारी बारा वाजता कशेडी घाटात हे आंदोलन केले जाणार आहे.रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील 200च्या वर पत्रकार आदोलनात सहभागी होतील अशी अपेक्षा आहे.या आंदोलनास रायगड जिल्हयातील अनेक सामाजिक संघटनांनी पाठिबा दिली असून या संघटनाही आंदोलनात सहभागी होणार आहेत.पत्रकारांच्या या अनोख्या आंदोलनात जास्तीत जास्त जनतेनं सहभागी व्हावे असे आ़वाहन एस.एम.देशमुख यांनी केले आहे.
संयुक्त महाराष्ट्राचा लढा पत्रकारांनी लढविला होता.त्यानंतर पत्रखारांनी एखादा महत्वाचा सामाजिक विषय हाती घेऊन सतत पाच वर्षे पाठपुरावा केला आणि तो प्रश्न मार्गी लावल्याचे मुंबई-गोवा महामार्गासाठीचे आंदोलन हे एकमेव उदाहणर आहे.समाजासाठी रस्त्यावर उतरून पत्रकार आंदोलन करीत असल्याने या आंदोलनात जनतेनं सहभागी व्हावे असेही आवाहन केले गेले आहे.