पत्रकारांचा आवाज बंद कऱण्याच्या ना ना तर्हा
बघा सांगोला,उमरगा,माहूर,पुर्णेत काय घडलंय ते..
विविध माध्यमातून पत्रकारांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न होत असल्याच्या गा्रामीण महाराष्ट्राातील किमान चार घटना आज पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीकडे आल्या आहेत.उमरगा,पुर्णा,माहूर आणि सांगोल्यातील या घटना आहेत.
पुर्णाः पुर्णा येथील ज्येष्ठ पत्रकार शेख पाशा शेख फरिद यांना सध्या कारण नसताना पोलिसी अत्याचाराला बळी पडावे लागत आहे.घटना अशी घडली.दोन दिवसापुर्वी पुर्णेत एक बेवारस प्रेत मिळाले.त्याचा पंचनामा पोलिसांनी केला.त्यावेळी बातमी घेण्यासाठी तेथे उपस्थित असलेल्या शेख पाशा यांनी पंचनाम्यावर स्वाक्षरी करावी यासाठी पोलिसांनी त्यांच्याकडे आग्रह धरला .ते स्वाक्षरी करीत नाहीत म्हटल्यावर त्यांना दमदाटी आणि शिविगाळ केली.प्रकरण वरिष्टांकडे गेले तर त्यांनीही पोलिसी खाक्या दाखविला.यामुळे संतप्त पुर्णेकर पत्रकारांनी परभणीत जाऊन जिल्हा पोलिस अधीक्षकांना फौजदार रामराव गाडेकर आणि गणेश राठोड यांच्याविरोधात तक्रार दिली आहे.
उमरगाः उमरगा येथील पत्रकार आणि सुराज्य दैनिकाचे वार्ताहर तात्या लांडगे यांनाही अशाच एका प्रकरणात गोवून पोलिसांनी आज त्यांना अटक केली आहे.झालं असं,प्रशांत कांबळे नावाच्या व्यक्तीनं आपणास एका दुचाकीनं धडक दिल्याची तक्रार पोलिसांत दिली.त्यानं जो नंबर दिला तो तात्या लांडगे यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या गाडीचा होता.प्रत्यक्षात घटना घडली तेव्हा ती दुचाकी घटनास्थळावर नव्हतीच असं असतानाही पोलिसांनी पत्रकारास अटक करून त्याचा छळ सुरू केला आहे.
माहूर ः माहूर येथील ज्येष्ठ पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते नंदू संतान अशाच छळाचे बळी ठरले आहेत.त्यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणात संतान यांना जामिन मिळाला असला तरी घटना घडली तेव्हाचे संतान यांचे मोबाईल लोकेशन शोधण्यासाठी पोलिस प्रयत्न करीत नसल्याचे समोर आले आहे.
सांगोलाः युवक कॉग्रेसच्या एका कार्यक्रमाची बातमी एका स्थानिक वर्तमानपत्रात व्यवस्थित आली मात्र त्या बातमीत ‘कार्यक्रमास केवळ 30-35 लोकच उपस्थित होते,असं का घडलं याचं आत्मचिंतन संबंधितांनी करावं’ असा उल्लेख होता.या उल्लेखानं संतापलेल्या एका कार्यकर्त्यांनं पत्रकारास भररस्त्यात मारहाण केली.या संबंधिची तक्रार पोलिसात दिली गेली आहे.
अशा स्वरूपाच्या घटनांमधून ग्रामीण भागात पत्रकारिता किती कठीण झालीय हे वास्तव समोर येताना दिसतंय.