‘2019 हे साल राष्ट्रवादीचं आहे,शरद पवारांचं आहे,पवारांच्या मनात जे आहे ते या सालात घडणार आहे’,असं भाकित ‘ज्योर्तिभास्कर’ प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केलं आहे.’जाणते राजे’ अजून दोन वर्षांनी देशाचे पंतप्रधान होणार हे जरी प्रफुल्लभाईंनी स्पष्टपणे सांगितलं नसलं तरी त्याचा मतितार्थ तोच आहे.भविष्यकार भविष्यात घटना काय घडणार आहेत हे सांगतात,त्या कशा किंवा कश्यामुळं घडणार हे सांगत नाहीत.त्याच प्रमाणे प्रफुल्ल पटेल यांनी हे कसं शक्यय हे सांगितलेलं नाही. उत्तर कदाचित त्यांनाही ठाऊक नसेल. पक्ष गल्लीपासून द्लिलीपर्यंत सतत पराभूत आणि सत्ताच्यूत होत आहे.अशा स्थितीत पक्षाकडं असलेलं एकमेव हुकमी कार्ड कसं वापरता येईल आणि त्यातून कार्यकर्त्यामध्ये आलेली मरगळ आणि निर्माण झालेलं नैराश्य कसं दूर करता येईल याचा विचार करून प्रफुल्लभाईंनी हे वक्तव्य केलं असल्याची जास्त शक्यता आहे.पटेल यांच्या वक्तव्याला राजकीय पंडितांनी फारसे गांभीर्यानं घेतलेलं नाही.कारण सर्वांंना माहिती आहे की,हे अशक्य आहे.शरद पवारांचा पक्ष एवढा छोटा आहे की,ते स्वतःच्या बळावर पंतप्रधान होऊ शकत नाहीत.तेव्हा तीन पर्याय उरतात.पहिला भाजप,दुसरा कॉग्रेस आणि तिसरा तिसरी आघाडी.यापैकी कोणाशी तरी हातमिळवणी करावी लागेल.आम्ही भाजपच्या जवळ जाणार नाही’ असं प्रफुल्ल पटेल यांनीच आपल्या भाषणात स्पष्ट केलं आहे.शिवाय ते जवळ गेले तरी भाजपचे किंवा भाजप पुरस्कृत पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकत नाहीत.2019 पर्यंत अशा काही घटना घडल्या आणि भाजपला बहुमत मिळालं नाही तर तडजोडीचे उमेदवार म्हणून शरद पवार याचं नाव येऊ शकतं असं ज्यांना वाटतं त्यांना भाजपचं राजकारण माहिती नाही असं म्हणावं लागेल.भाजपचे नेते शरद पवारांना कितीही गोड गोड बोलले तरी ते त्याना पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून स्वीकारणार नाहीत,अगदी कोणत्याही परिस्थितीत, हे तेवढंच खरं.
राहिला प्रश्न कॉग्रेसचा.प्रफुल्ल पटेल यांनी आपल्या भाषणात कॉग्रेसला चुचकारण्याचा प्रयत्न जरूर केला,पण कॉग्रेस एवढे शरद पवारांना कोणीच ओळखून नाही.कॉग्रेसमध्ये शरद पवारांचे काही हितचिंतक नक्की आहेत पण सोनिया गांधी आणि राहूल गांधींना पवार कधीच मान्य होणार नाहीत.सोनिया गांधीच्या परकीय मुळाचा विषय उभा करून शरद पवार यांनी कॉग्रेस फोडली याची सल सोनिया गांधींच्या मनात अजून कायम असणार.त्यामुळं त्या कोणत्याही स्थितीत त्या शरद पवारांना पंतप्रधान म्हणून स्वीकारणार नाहीत हे ही उघड आहे शिवाय आज आहेत त्यापेक्षा कॉग्रेसचे खासदार वाढतील अशी चर्चा आणि वातावरण तर देशात नक्कीच आहे.मोदींच्या गुजरातमध्ये जर भाजपला झटका बसला तर राहुल लाट देशात निर्माण होऊ शकते हे नक्की.पवारांनी कितीही प्रयत्न केले तरी त्यांचे महाराष्ट्रातून दोन आकडी खासदारही निवडून येणार नाहीत.अशा परिस्थितीत जेव्हा पंतप्रधानपदाचा मुद्दा येईल तेव्हा सर्वात मोठ्या पक्षाचा म्हणजे कॉग्रेसचा नेता पंतप्रधान होईल की,ज्या पक्षाचे खासदार दोन आकडयातही नाहीत अशा पक्षाचा ?
तिसरी आघाडी हा तिसरा पर्याय किंवा आशेचा किरण गृहित धरला तरी तेही शक्य नाही.कारण भाजप आणि कॉग्रेसला वगळून या देशात कोणीही सरकार स्थापन करू शकेल असे वाटत नाही .कारण या दोन पक्षांकडंच जास्त खासदार असणार आहेत.हे दोन्ही पक्ष वगळून देशात जे अन्य पक्ष आहेत त्याचं संख्याबळ 272 होण्याची सूतराम शक्यता नाहीते.कॉग्रेस आणि भाजप वगळून जे पक्ष एकत्र येऊ शकतात असं पटेलांना वाटतं ते तेवढं सोपं नाही.त्यांच्यात एवढे अंतर्विरोध आहेत की,ते एकत्र नांदणं शक्य नाही.म्हणजे महाराष्ट्रात सेना आणि राष्ट्रवादीचं जमनं शक्य नाही,तिकडे पश्चिम बंगालमध्ये कम्युनिस्ट आणि तृणमुल कॉग्रेस एका छत्राखाली येऊ शकत नाही.सपा आणि बसपाचं जमत नाही आणि नितीश – लालूही पुन्हा एकत्र येणार नाहीत.तो भैय्या बनोगे कैसे प्रधानमंत्री याचं उत्तर शोधूनही सापडत नाही.
देशाचं नेतृत्व करण्याची संधी शरद पवारांना मिळाली तर माझ्यासह तमाम मराठी माणसांना आनंदच होईल.त्यासाठी त्यांना प्रत्येक मराठी माणसाच्या शूभेच्छाही आहेत.आज तरी पवार हे एकमेव मराठी नेते असे आहेत की,ज्यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक आहे,आणि तेवढी पात्रताही.पवारांमध्ये सारे गुण जरूर आहेत पण या गुणांचा गुणाकार होऊनही आकडयांची बेरीज जमत नाही. या वास्तवाकडं दुर्लक्ष करूनही चालणार नाही.’इच्छा असणं आणि इच्छा प्रत्यक्षात येणं यामध्ये मोठं अंतर आहे.सध्या तरी दूर दूरवर इच्छापूर्तीची चिन्हं दिसत नाहीत.राजकारणात काहीही होऊ शकतं असे तत्वज्ञान सांगणारे चंद्रशेखर,देवेगौडा यांची उदाहरणं देतात,मनमोहन सिंग यांचंही उदाहरण दिलं जातं.ही सारी मंडळी अनपेक्षितपणे जरूर पंतप्रधान झाली पण गेली अनेक वर्षे स्पर्धेत असलेले शरद पवार तेव्हाही पंतप्रधान झाले नाहीत, याकडं दुर्लक्ष करता येणार नाही.याचं खरं कारण विश्वासार्हता हे आहे.दिल्लीच्या राजकारणात शरद पवारांवर कोणीच भरोसा ठेवत नाही हे कोणी मान्य करो अथवा न करो वास्तव आहे.नरसिंहरावांच्या वेळेसही याचा प्रत्यय आलाच की.. तेव्हा तर परिस्थिती अधिक पुरक होती.आज अजिबात तशी अनुकूल स्थिती नाही.उद्या गुजरातमध्ये राहूल गांधी जिंकले तर मग विषयचं संपला.स्वतः राहूल गांधी हेच पंतप्रधानपदााचे उमेदवार होऊ शकतात.गुजरात लाभात राहिले तर राष्ट्रवादीबरोबर युती करण्यास देखील कॉग्रेस तयार होणार नाही.राष्ट्रवादीही बुडती नौका आहे असं अनेकाचं मत आहे.अशा स्थितीत त्यांना बरोबर घेऊन जिवदान द्यायला कॉग्रेस राजी होईल हे अजिबात संभवत नाही.त्यामुळं प्रफुल्ल पटेल याचं वक्तव्याला तिसर्या,चौथ्या श्रेणीतलं स्थान दिलं गेलं.पटेलांच्या बातमीची हेडलाईन झाली नाही ती यामुळंच.फेरीवाल्यांवर हल्ला करणार्या मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केल्यानंतर राज ठाकरे म्हणाले,आपली सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेतले जातील.ज्या पक्षाचा मुंबई मनपात एक नगरसेवक आहे आणि विधानसभेत एकच आमदार आहे त्या पक्षाचा नेता सत्ता संपादनाची भाषा बोलत असेल तर या आत्मविश्वासाला दाद द्यावी लागेल.प्रफुल्ल पटेल यांची अवस्ता यापेक्षा काय वेगळी आहे.स्वप्नरंजनासाठी आणखी जीएसटी लावला गेलेला नाही.त्यामुळं प्रफुल्ल पटेलांना त्याचा आनंद मुक्तपणे घेत असलीत तर आपण विरोध करण्याचं कारण नाही.
एस.एम.देशमुख