पंढरपुरात होतंय,सुसज्ज पत्रकार भवन
पंढरपूर येथील पत्रकार भवनाचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागला असून शनिवारपासून पत्रकार भवनातील सुशोभीकरणाच्या कामास सुरुवात करण्यात येणार असल्याचे नगरपालिकेच्या बांधकाम सभापती सविता मोहोळकर यांनी सांगितले.
पंढरपूर येथे विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी अनेक मंत्री व आमदार येत असतात. त्यांच्याशी वार्तालाप करण्यासाठी पत्रकारांना शासकीय विश्रामगृह व मंदिर परिसरात थांबावे लागत होते. यामुळे पंढरपूर येथे पत्रकार भवन असावे, अशी पत्रकारांची इच्छा होती. त्यानुसार आ. प्रशांत परिचारक, नगराध्यक्षा साधना भोसले, बांधकाम समितीच्या सभापती सविता मोहोळकर व सर्व नगरसेवकांनी सर्वसाधारण सभेमध्ये इंदिरा गांधी शॉपिंग सेंटरमधील ३० फूट लांबीचे व २० फूट रुंदीचे सभागृह देण्याचा विषय मंजूर केला.
बांधकाम समितीच्या सभापती सविता मोहोळकर यांनी या कक्षामध्ये पत्रकार कक्षासाठी सर्व सुविधा असाव्यात, अशी मागणी स्थायी समितीमध्ये केली. त्याप्रमाणे नगर अभियंता दिनेश शास्त्री यांनी या कामाचे अंदाजपत्रक तयार केले. त्यास मुख्याधिका-यांची मान्यता घेण्यात आली. या नियोजित पत्रकार कक्षामध्ये वेगवेगळ्या सुविधा, सुशोभीकरण, अभ्यागतांसाठी अद्ययावत रुम, सर्वसोयींनीयुक्त संगणक कक्ष आदी सुविधांसाठी ६ लाख रुपयांच्या कामाची निविदा देण्यात आली आहे. गुरुवारी या पत्रकार कक्षाची पाहणी मुख्याधिकारी अभिजित बापट, नगर अभियंता दिनेश शास्त्री, सत्यविजय मोहोळकर, नगरसेवक लक्ष्मण शिरसट यांनी केली.